नवीन लेखन...

लवंगांच्या वृक्षांनी डवरलेले झांझीबार

झांझीबारहून निघालेले विमान पेम्बा बेटावर पोहोचते अवघ्या वीस मिनिटात.

पेम्बा झांझीबार बेटाच्या ईशान्य दिशेला ५० किमी अंतरावर आहे. बेटाची लोकसंख्या आहे सुमारे चार लक्ष. पण लोकसंख्येच्या दसपट म्हणजे चाळीस लक्ष लवंगेची झाडे आहेत. दरसाल ऐंशी हजार टनापेक्षा जास्त लवगांचे पीक निघते. जगाला लागणार्‍या ७५ टक्के लवंगा एकट्या पेम्बा बेटात होतात. बेटावर तीन कोटी मधमाशा आहेत.

 

डावीकडे लवंगांचे झाड

इ.स.पूर्वी तिसर्‍या शतकात चीनच्या ‘हाण राजवंशा’तल्या राजाने मोकळ्या श्वासोश्वासासाठी दवा आणण्याचे फर्मान काढले. लगेच प्रजाजनांनी त्याला लवंगा आणून दिल्या. मध्ययुगीन काळातले खलाशी मुस्लीम व्यापार्‍याबरोबर लवंगांचा व्यापार करत. धंदा तेजीत चालत असे. शास्त्रज्ञांना उत्खननात १७२१ सालच्या सुमारास सीरीयात लवंगांचा व्यापार चालत असल्याचे आढळले.

(डावीकडे) इब्न बतुताच्या (१३०४-१३६८) डायरीत आणि सिंदबादच्या सफर कथेत (उजवीकडे) लवंगांचा उल्लेख आला आहे.

लवंग प्राचीन काळात बकान, मकीयन, मोती, टर्नेट या मसाल्याच्या बेटांवर मिळायची. बेटांवरचे ‘अॅफो झाड’ सुमारे ३५०-४०० वर्षांपासून प्रसिध्द आहे. आता झांझीबार, मादागास्कर, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेत लवंगांचे भरघोस पीक निघते. लवंगांच्या मुखवासाची लोकप्रियता वरचेवर वाढत आहे. मात्र आता झांझीबार जगाला सर्वात जास्त लवंगा पुरवितो.

विक्रीसाठी तयार झालेल्या लवंगा

लवंगेचं झाड आठ ते बारा मीटर उंच वाढते. झाडाची पाने मोठ्या आकाराची असतात. फुलं फिकट रंगाची असतात. ती पुढे हळू हळू हिरवी होत जाऊन अखेर लाल भडक रंगाची होतात व खुडायला तयार होतात. लवंगा दीड-दोन सेंमी. आकाराच्या झाल्या की खुडतात. त्यावेळी लवंगेला लांब देठ असतो व चार मिटलेले बारीक पदर येतात. मध्यभागी एक टप्पोरा गोल तयार होतो. एके काळी लवंग सर्वात महागडा मसाला-पदार्थ होता. त्यामुळे इंडोनेशियातल्या डच राज्यकर्त्यांना चिक्कार महसूल मिळत असे.

हिंदुस्थानहून परततांना वास्को-द-गामांनी मुक्काम केला झांझीबारला .

पहिल्या आफ्रिका भेटीमध्ये त्यांचे बरेच हेतू होते. त्यातला एक होता, पोर्तुगीजांना लवंगांच्या बाजारपेठेचे द्वार खुले करायचे. त्यानुसार पोर्तुगीजांनी झांझीबारमध्ये ऑगस्ट १५०४ मध्ये सत्ता स्थापना तर केलीच पण पुढे चार वर्षांनंतर तेथे साम्राज्य स्थापन केले. ते नंतर दोनशे वर्षे टिकले. तिथे ते बरेच आक्रमक झाले व त्यांनी सर्वत्र चर्चेस बांधण्यास प्रारंभ केला. हेतू हा की त्यांना सर्व झांझीबारवासीयांना ख्रिश्चन बनवायचे होते. ते साध्य झाले नाही. अठराव्या दशकात पोर्तुगीजांची झांझीबारमधून हकालपट्टी झाली. मात्र तत्पूर्वी लवंगा व्यापारात पोर्तुगीजांनी चांगलाच चंचुप्रवेश साध्य केला आणि तब्बल दोनशे वर्षे आफ्रिकेत राज्य केले.

गामा साहेब हिंदुस्थानातून परततांना पूर्व आफ्रिकेच्या मालिंदी बंदरात सात जानेवारी १४९९ रोजी उतरले. तेव्हा त्यांचे अर्धे खलाशी वाटेतच मृत्यू पावले होते. पण आफ्रिकेला पोहोचण्याची त्यांची जिद्द कायम होती.

वास्तविक वास्को द गामा हिंदुस्थानला तीन वेळा (१४९८, १५०२ आणि १५२४ साली) येऊन गेले.

वास्को द गामाला हिंदुस्थानात व आफ्रिकेत बरीच लोकप्रियता मिळाली. त्याच्या निरोप समारंभाचे हे एक तैलचित्र.

फ्रेंच ‘पियरे पॉयव्हर’ या बहादर गड्याने मॉरीशसहून लवंगेची ‘अॅंफी’ रोपटी १७७० साली पळवून फ्रान्सला नेली. मग आपल्या देशात लवंगेची लागवड सुरू केली.

आता आशियात, आफ्रिकेत, मध्य पूर्व देशात स्वयंपाकात लवंग वापरून स्वादिष्ट जेवण बनते. लवंग मांसाहारी-शाकाहारी तिखट गोड जेवणात वापरल्याने खरी लज्जत येते. मेक्सिकन जेवणात लवंगेबरोबर वेलदोडा-दालचिनीही वापरतात. लवंगा स्वादाला जरा तिखटच. त्यामुळे त्यांचा वापर अल्प प्रमाणात होतो. रेड वाईनमधे पण लवंग घालतात. लवंगेचा स्वाद असलेल्या सिगारेट्स इंडोनेशियामधे लोकप्रिय आहेत. त्यांना आता युरोप, आशिया, अमेरिकेतही मागणी आहे. पण २००९ सालापासून अमेरिकेमध्ये अशा सिगारेटवर बंदी आणल्यामुळे त्या चिरूटात वापरल्या जाऊ लागल्या. लवंगेचा वापर मुंग्यानाशक म्हणूनही केला जातो.

भारतीय, चिनी आणि आता पाश्चिमात्य पारंपारीक आयुर्वेद शास्त्रात लवंगेला मानाचे स्थान लाभले आहे. विशेषतः दंतविज्ञान शास्त्रात दाताच्या दुखण्यावर लवंगेचा वेदनाशामक म्हणून सर्रास उपयोग होतो. त्यामुळे दंतदाह कमी होतो. पचनकारी औषधे-पेयात लवंगेचा उपयोग आलाच. चीन व भारतात मूत्राशयातील अस्वास्थ्य, पोटदुखी, तीव्र खोकला, अतिसार, ओकार्‍यांना प्रतिबंध यासारख्या अठरा दुखण्यांसाठी लवंगेचा वापर होतो.

कांद्याबरोबर किवा लिंबाबरोबर लवंगेचा अभिनव उपयोग केला जातो. दाताच्या फटीत लवंगेचे तेल वापरतात त्यामुळे दंतदाह कमी होतो. इतकेच काय नपूंसकत्व दूर करण्यासाठीही लवंग वापरली जाते.

पण लवंगेचा सर्दी, खोकला, अपचनाचा संदर्भ क्षणभर विसरा. सख्याच्या पसंतीचा विडा आणि त्यात खुपसलेल्या ‘लवंगे’चा बहारदार लावणीतला उल्लेख आठवा. मराठी सुंदरीला ‘चिकणी चमेली’ म्हणणे म्हणजे किती बुळबुळीत संज्ञा ! त्याऐवजी मराठी मर्दाची ‘लवंगी मिरची’ साद काय फक्कड ! या सादेत सुंदरीच्या सौंदर्याने घायाळ झालेल्या दिलात लवंगेसारखा दाह ओतलाय्.

— अरुण मोकाशी 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..