सुलोचना शामराव चव्हाण म्हणजेच सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च १९३३ रोजी मुंबईत झाला. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव सुलोचना महादेव कदम असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी चौथी पर्यंत झाले. वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेली “सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची” ही लावणी सुलोचना चव्हाण लहानपणी वारंवार गुणगुणत असत आणि त्यासाठी आईकडून त्यांनी भरपूर ओरडाही खाल्ला होता. कारण मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असे त्यांच्या आईला वाटायचे. मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्या गायला लागल्या. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता “श्रीकृष्ण बाळमेळा.” याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले.
संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते “कृष्ण सुदामा.” पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. आपण गाणे रेकॉर्डिंगसाठी फ्रॉकमध्ये गेलो होतो अशी आठवण देखील त्या आवर्जून सांगतात. या नंतर त्यांनी मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांत पार्श्वगायन केले आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत सहगायक असत सी. रामचंद्र. पार्श्वगायन करताना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करियरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले.
वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या “भोजपुरी रामायण” गायल्या होत्या. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले आहेत.
त्यांचे गझल गायन ऐकून बेगम अख्तर यांनी सुलोचना चव्हाण यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती. सुलोचनाबाईंच्या आयुष्यातील आठवणींपैकी ही एक अतिशय महत्त्वाची आठवण.
सुलोचनाबाईंचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकून तर बेगम अख्तर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
पुढे मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या “हीच माझी लक्ष्मी” या चित्रपटात गायली. संगीतकार होते वसंत देसाई, आणि ही लावणी चित्रित झाली होते हंसा वाडकर यांच्यावर. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. आचार्य अत्रे यांनीच त्यांना “”लावणीसम्राज्ञी”” असा किताब दिला.
वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे पाहिले गाणे ध्वनिमुद्रित झाले, ते होते ‘ कृष्णसुदामा ‘ या चित्रपटासाठी. या चित्रपटास श्यामसुंदर पथक आणि भट्टाचार्य या जोडीने त्यांना प्रथम गायनाची संधी दिली. सुलोचनाबाईना कोणी गुरु नव्हता, सर्व काही उपजत होते त्या दहा वर्षाच्या असताना हानी, उर्दू, गुजराथी नाटकातून भूमिका करायला लागल्या. त्यांनी आधी हिंदी गाणी गायली. त्यांची १९४७ मधील ‘ मौसम आया है रंगीन ‘, किसी मजबूर का जलता हुआ घर देखते जाना ‘ या गाण्यांचे आजही रसिक दिवाणे आहेत.
एकदा त्यांना लखनौहून त्यांच्या पहिल्या गाण्यापासून म्हणजे १९४७ ते १९७५ पर्यंतच्या गाण्याची लिस्ट पाठवली होती, आणि त्याचे गीतकार कोण होते, संगीतकार कोण होते, गीतकार कोण होते त्याची ती लिस्ट होती. परत त्याच्याकडे ते गाणे रेकॉर्ड केलेले होते, प्रत्येकी ३०० रुपये देवून. असे त्यांचे चाहते सर्वदूर पसरले आहेत अगदी पाकिस्तानमध्येही. त्यांनी मुंबई, दिल्ली, इंदोर, काश्मीर भारतभर दौरे केले. बेगम अख्तरीबाई सारख्या महान कलाकाराला सुलोचनाबाईच्या गजल, भजनाने पार भरवून टाकले. त्यांच्या सुरांची जादू पाकिस्तानही पसरली.’ मेरे नसीबमें खुशिया नही जमानेकी। तुम्ही कहो ये बात क्या है भूल जाने की। या गजलांच्या रेकॉर्डस् आजही पाकिस्तानात आहेत, एच.एम.व्ही. ने त्या खास पाकीस्तानसाठी करून दिल्या होत्या.
पुढे डी.पी. कोरगावकर, वसंत पवार, राम कदम, बाळ पळसुले, तुकाराम शिंदे अशा अनेक संगीत दिग्दर्शकाच्या लावण्याची बरसात सुरु झाली. सुलोचना चव्हाण यांनी १९५३-५४ च्या सुमारास “कलगीतुरा” या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गायलेल्या काही लावण्या गायल्या. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव “एस. चव्हाण” होते. म्हणजेच श्यामराव चव्हाण, पुढे याच दिग्दर्शकाबरोबर सुलोचनाबाईंचे लग्न झाले आणि सुलोचना कदम या सुलोचना चव्हाण झाल्या. श्यामराव चव्हाण यांना संगीताची आवड तर होतीच ते तबलाही उत्तम वाजवत. त्यांनी सुलोचनाबाईनां लावणी गाण्याचे शात्रशुद्ध प्रशिक्षण दिले, म्हणून त्या आपल्या पतीनाच गुरु मानतात.या दरम्यानच “रंगल्या रात्री अशा” या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनीच गावी असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला आणि “नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची” या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यातूनच खर्या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणून सुलोचना चव्हाण पुढे आल्या. मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतून त्यांनी आपल्या ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. चपखळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातून ठसका व खटका देण्याचे काम सुलोचना चव्हाणांइतके कुणीच उत्तम करू शकलेले नाही. “पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरुवात ठसकेबाजच झाली पाहिजे” असे सुलोचना चव्हाणांचे ठाम मत होते आणि याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या लावण्यांतून येतोच.
त्यानंतर खेळात रंग बाई होळीचा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, सोळावं वरीस धोक्याचं, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, पाडाला पिकलाय आंबा,लाडे लाडे बाई करू नका अशा एकापेक्षा एक लावण्या त्यांनी गायल्या. पट्ठे बापूराव, होनाजी सगनभाऊ, अनंत फंदी, परशुराम रामजोशी त्यांच्या लावण्या सुलोचनाबाईमुळे जिवंत होत होत्या तर दुसरीकडे ग. दि. माडगूळकर, पी. सावळाराम, राजा बढे, जगदीश खेबुडकर या गीतकारांच्या लावण्या सर्वोतमुखी झाल्या.
सुलोचना चव्हाण यांनी समाजकार्यातही स्वतःला झोकून दिले आहे. कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनातील मोठा हिस्सा धार्मिक निधीसाठी एखादा मदतनिधी उभा करण्यासाठी वापरतात. त्यांना जे पुरस्कार मिळतात त्यातील काही भाग गरजूंसाठी उपलब्ध करून देतात.
काही वर्षापूर्वी माझा कार्यक्रम आणि स्वाक्षरी प्रदर्शन पार्ल्यातील ‘ मॅजेस्टिक गप्पा ‘ मध्ये होते तेव्हा त्यांनी माझ्या स्वाक्षरीच्या प्रदर्शनाला भेट दिली होती.
‘ मल्हारी मार्तंड ‘ या चित्रपटासाठी त्यांना लावणी गायिकेचा सन्मान मिळाला, पी. सावळाराम-गंगा जमना ‘ पुरस्कार, त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रातील अत्यंत मनाचा समाजाला जाणारा ‘ लता मंगेशकर ‘ पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. आजही त्यांची लोकप्रियता कायम आहे.खूप संकटे आली परंतु त्यांनी त्यांना तोंड दिले. जे कमवले ते पण अपघातामुळे गेले, स्वतःचे आजार चालूच आहेत, त्या मुंबईमध्ये गिरगाव भागात आपले आयुष्य तरीपण शांतपणे व्यतीत करत आहेत.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply