लावण्यखणी ती भूलोकीची
निसर्गसखी कोकण दुहिता
रंगबावरी लाजलाजरी
इहलोकीची सुंदर कविता!
नागमोडी कितीक वळणे
खट्याळतेने वाट अडविती
पायघड्या अन् घाली सुंदर
लाल देखणी कोकणमाती
डोंगर माथ्यावरून खाली
अल्लड झरे झेपावत येती
पदन्यास ऐकून तयांचा
वेडी होते कोकण धरती!
समुद्र वैभव कोकणातले
भुरळ घाली मना-मनाला
पहाटवेळी शांत किनारा
देई विसावा जिवाशिवाला!
बहर हिरवा झाडे हिरवी
पाचूचे हिरवे अंगण
देवाजीने दिला कोकणा
असीम अद्भुत निसर्ग आंदण!
– गौरी कुलकर्णी, मुंबई
Leave a Reply