नवीन लेखन...

लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर

सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. लावणीच्या इतिहासात आजही ठळकपणे समोर येणाऱ्या नावात सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी लावणीसाठी वा गायकीसाठी लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. वयाच्या १० व्या वर्षीच त्यांच्यातल्या संगीत कलेची जाणीव झाली. त्यांनी बालवयातच एकट्याचे लावणी सादरीकरण केले. त्यानंतरच्या काळात गोदावरीबाई पुणेकर यांच्या नेतृत्वाखालील लावणी गटात त्या सामील झाल्या. म्हणजे गोदावरीबाई या एका अर्थाने त्यांच्या प्रथम शिक्षिका व सहकारी ठराव्यात. तेथे त्या नृत्य, गवळणी, गझल या गोष्टीशी वकुबाने परिचित झाल्या. गझल काय असते ती कशी म्हणावी आदी बारकावे त्यांना इथे कळाले.

लावणीच्या गायनात त्यांचे गुरु म्हणून नारायणराव उत्पात, ज्ञानोबा उत्पात, दादोबा वैरागकर, मच्छिंद्र उत्पात, विठोबा ऐतवाडकर आणि रामभाऊ उत्पात यांचा उल्लेख होतो. गोदावरीबाई पुणेकर यांच्या गटात चार वर्षे काम केल्यावर त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि त्या घरी परत गेल्या. घरी परतलेल्या सत्यभामाचा नवीन प्रतिभाशाली आणि नवे रूप बघून त्यांच्या कुटुंबियांची मने बदलली. त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न झाले. त्यांच्यावरती कामाची सक्ती होऊ लागली. त्यामुळे सत्यभामाबाई पुन्हा पुणेकर मंडळींमध्ये परतल्या. परतल्यानंतर पेशवे काळात अनेक शाहिरी लावण्या त्या शिकल्या. हा काळ अठराव्या शतकाच्या उत्तररार्धाचा होता. त्यानंतर त्यांनी जे संगीत आणि अदाकारीचे सादरीकरण सुरु केले ते पुन्हा मागे वळून पहिलेच नाही. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी लग्न केले आणि स्वतःची संगीत बारी काढली.

सुरुवातीच्या काळात स्वतःच्या घराच्या दिवाणखान्यातच त्या लावणी सादर करू लागल्या. त्यातही बैठकीच्या लावण्या जास्त असत. पण पुढे या बैठकीच्या लावण्यांचा त्यांच्यावर शिक्का बसला. अनेक सामाजिक बंधने, स्त्रीत्वाच्या मर्यादा आणि तत्कालीन नैतिकतेचे संदर्भ पाहता सत्यभामाबाईंनी ज्या नेटाने आणि जोमाने आपली लावणीची सेवा अबाधित अखंड ठेवली त्याला तोड नाही. त्यांचे आयुष्य एका जिद्दी स्त्रीच्या कलासक्तीचे तेजस्वी प्रतिक आहे. मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत तेंव्हा घाबरलेल्या बालिकावधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन त्या घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत.

पंढरपूरच्या मंदिरात लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना दहावी अदा कोणती असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले व ही ‘दहावी अदा’ असे करून दाखवले होते. पंढरपूरी बाजाचे गायन, अदाकारीची लावणी ज्ञानोबा उत्पात आणि सत्यभाबाईंनी लोकप्रिय केली होती. ‘अबोल का होता धरिता सखया मजवरी`, ‘झाले तुम्हावरी दंग सखया`, ‘तुम्ही माझे सावकार` ‘बांगडी पिचल बाई`, ‘शहर बडोरे सांडून आले वर्स झाली बारा` ‘पाहुनिया चंद्रवदन` अशा अनेक पारंपरिक लावण्यांचा खजिना सत्यभामाबाईंकडे होता. जवळपास पाच दशके सत्याभामाबाईंनी रंगमंचाची आणि लावणीची सेवा केली. त्यांना महाराष्ट्र सरकार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह असंख्य पुरस्कार मिळाले. सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे ९ सप्टेबर १९९४ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..