खाप्रुमामा ना त्यांची आई ‘खाप्रु’ असे म्हणत व तेच नाव पुढे रुढ झाले. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे काका सारंगीवादक रघुवीर पर्वतकर यांचेकडुन व तबल्याचे शिक्षण चुलते हरिश्चंद्र पर्वतकर यांच्याकडून घेतले. तसेच पखवाजाचे धडे आपल्या चुलत भावाकडुन घेतले. खाप्रुजींना लयकारीची दैवी देणगी होती. दिलेल्या लयीच्या कितीहीपट लय ते वाजवून दाखवू शकत असत. तसेच एखादा तालाचा ठेका धरुन त्याची कितिही भागात विभागणी करणेहि त्यांना जमत असे. त्यांचे काही ध्वनीमुद्रण त्या काळात प्रकाशित झाले होते, १९१९ साली पं. विष्णु पलुस्कर यांनी आयोजीत केलेल्या संगीत संमेलनात त्यांनी आपली कला त्या काळच्या अग्रगण्य संगीतकारांसमोर सादर केली. त्यांच्या अद्वितीय लयकारीमुळे अनेक दिग्गज संगीतकारांनी त्यांची प्रशंसा केली.
१९३९ साली संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांनी त्यांना एका समारंभात सन्मानपूर्वक ‘लयभास्कर’ हि पदवी दिली. तसेच गोव्यातील रसिकांकडून त्याना ‘तालकंठमणि’ हि पदवी देण्यात आली. त्यांना तबला, पखवाजाबरोबरच सारंगीवादन व गायन पण येत असे. त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य तबला, ताल व लयशास्त्र ह्यात घालविले. लयीच्या अद्भुत दैवी देणगीमुळे ते एकाच वेळी पाच वेगवेगळ्या तालांचा ठेके धरुन त्यांना एकाच वेळी समेवर आणू शकत. उदा. डाव्या हाताने त्रिताल (१६ मात्रा), उजव्या पायाने झपताल (१० मात्रा), उजव्या हाताने धमार (१४ मात्रा), डाव्या पायाने चौताल (१२ मात्रा) व तोंडाने सवारी (१५ मात्रा) असे पाच तालाचे ठेके धरुन समेवर आणणे त्यांना सहज जमत असे. त्यांनी अनेक नविन तालांची निर्मिती केली. त्यातला त्यांच्या खास आवडीचा म्हणजे ‘परब्रह्मताल’ (१५.७५ पावणेसोळा मात्रा). लय त्यांच्या जीवनात इतकी भिनली होती की झोपेतसुद्धा त्यांचे हात लयीत हलत असत.
लक्ष्मण पर्वतकर यांचे ३ सप्टेंबर १९५३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply