लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते, हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. लक्ष्मण शास्त्री जोशी यांची ओळख मुख्यत: `मराठी विश्वकोषाचे शिल्पकार’ अशी असली, तरी ती ओळख अपुरी म्हणावी लागले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते थोर स्वातंत्र्य सैनिक, साहित्यिक, समाजसुधारक, हिंदू धर्माचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, अशी अनेक विशेषणे तर्कतीर्थांच्या नावापुढे लावणे शक्य आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे बिरुद म्हणजे त्यांना मिळालेली `तर्कतीर्थ’ ही पदवी!
हिंदू धर्माच्या अभ्यासासाठी ते वयाच्या चौदाव्या वर्षी घराबाहेर पडले आणि सातारा जिह्यातील कृष्णाकाठच्या वाई येथे स्थायिक झाले. त्यांच्या तारुण्यात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात होती. त्या काळातील संवेदनशील तरुणांच्या ज्या भावना असत, त्याच भावना तर्कतीर्थांच्याही होत्या. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत सक्रीय सहभाग घेतला. वयाच्या २९व्या वर्षी, म्हणजे १९३२ साली त्यांना तुरुंगात जावं लागलं. या वयापर्यंत तर्कतीर्थांनी संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवलं होतं. हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. चारही वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलायला लागले होते. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. आचार्य विनोबा भावे जेव्हा केवलानंद सरस्वती यांच्याकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाई येथे मुक्कामाला होते, तेव्हा तर्कतीर्थांचा विनोबाजींबरोबरचा सहवास वाढला. विनोबाजींनी त्यांना इंग्रजी शिकविले. त्याच दरम्यान एक घटना घडली. महात्मा गांधींचे पुत्र देवीदास यांचा सी. राजगोपालाचारी (स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल) यांच्या मुलीशी आंतरजातीय विवाह करण्याचा मनोदय होता. पण हिंदू पंडितांचा त्याला विरोध होता. हा पेच सोडविण्यासाठी तर्कतीर्थांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आपल्या तर्कबुद्धीची चुणूक दाखवून असे विवाह हिंदू धर्माविरुद्ध नाहीत हे पटवून दिले. त्यामुळे गांधीजींनी खूश होऊन त्यांनाच लठाचे विधी करण्याचा मान दिला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर तर्कतीर्थांना अनेक पुरोगामी बुद्धिवाद्यांचा सहवास लाभला. एम. एन. रॉय हे त्यांपैकीच एक. १९५१ साली सरदार वल्लबभाई पटेल यांनी सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. जीर्णोद्धारानंतर मंदिर अस्पृश्यांसहित सर्वांना खुले करण्यात येणार होते. नेमके याच गोष्टीमुळे काशीच्या कर्मठ पंडितांनी मूर्ती प्रतिष्ठापनेचे धार्मिक विधी करण्यास नकार दिला. या काळातही तर्कतीर्थांनी आपल्या तर्कशुद्ध बुद्धीने पंडितांना पटवून दिले की, असे करण्यात कोणताही धर्मलोप नाही, उलट हाच खरा हिंदू धर्माचा विचार आहे.
१९५१ साली त्यांनी पुणे विद्यापीठात सहा प्रदीर्घ व्याख्याने दिली. त्या व्याख्यानांवर आधारीत `वैदिक संस्कृतीचा विकास’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथाद्वारे त्यांनी भारतीयांना वैदिक धर्मावर आधारीत जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. भौतिक सुख आणि अध्यात्म यांच्या कात्रीत भारतीय समाज सापडला आहे. त्यामुळे तो गोंधळलाही आहे, असे त्यांनी अतिशय तर्कशुद्ध रितीने प्रतिपादन केले. हा ग्रंथ अतिशय प्रभावी झाला. १९५५ साली या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. अर्थातच त्यांचे विचार काही कर्मठ पंडितांना पटण्यासारखे नव्हते. त्यामुळे तर्कतीर्थांना अशा तथाकथित पंडितांच्या वर्तुळात स्थान नव्हते. पण महाराष्ट्राचे द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण यांनी मात्र तर्कतीर्थांच्या विचारांवर संपूर्ण विश्वास टाकला. १९६० साली दोन अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम तर्कतिर्थांवर सोपविण्यात आले. पहिला म्हणजे मराठी `विश्वकोषा’ची निर्मिती, तर दुसरा `धर्मकोषा’ची निर्मिती. ही दोन्ही कामे अतिशय अवघड अशी होती. `विश्वकोष’ आणि `धर्मकोष’ यांसारख्या ग्रंथांची निर्मिती करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले, त्याचे कारणही तसेच होते. त्यांनी त्याआधीसुद्धा अनेक महाकाय ग्रंथ लिहिले होते.
`शुद्धिसर्वस्वम्’ हा त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ संस्कृत भाषेत होता, आणि तो १९३४ साली प्रकाशित झाला. त्याच वर्षी त्यांनी `धर्ममोक्ष’ या ग्रंथाचे अठराशे पानांचे सहा अध्याय लिहिले. `हिंदू धर्माची समीक्षा’, `वैदिक संस्कृतीचा विकास’, `आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा’, इत्यादी अनेक उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती करून त्यांनी मराठी भाषेतील साहित्य समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांनी अठरा प्रमुख उपनिषदांचे मराठीत भाषांतरही केले. प्राचीन वैदिक धर्माचे समर्थक असूनही तर्कतीर्थ यांना वास्तवाचे भान होते. आधुनिक शास्त्रे, इंग्रजी भाषा, भारताची औद्योगिक प्रगती यांबाबत त्यांचे विचार अतिशय पुरोगामी होते. त्यामुळे तर्कतीर्थ हे अनेक जणांचे प्रेरणा स्थान राहिले. भारत सरकारने तर्कतीर्थांना १९७६ साली `पद्मभूषण’, तर १९९२ साली `पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी यांचे २७ मे १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नमस्कार! तर्कतीर्थ श्री लक्ष्मण शास्त्री जाेशी यांचे ‘विष्वकाेष’ (मराठी) संपूर्ण खंड मिळू शकतील काय ? कुठे मिळतील ?
धन्यवाद,
अनंत कित्तूर
बाेईसर.
अचानक हे संकेत स्थळ सापडले. निमित्त झाले तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना तर्कतीर्थ म्हणून का ओळखले जाते. आणखी जास्त तपशील शोधून काढली पाहिजे अशी आस लावून लेख संपला. धन्यवाद.