नवीन लेखन...

‘लाय लाय लाय लाय लायेकरणी’ कोळीगीताच्या निमित्ताने

मुंबई पूर्वी सात बेटांची बनलेली होती आणि कोळी आणि आगरी येथील मूळ रहिवाशी होते. कोळी लोकांची एक वेगळी समुद्राशी (समुद्र जीवनाशी) निगडित अशी खास संस्कृती होती. त्यांची लोककला, संगीत, सण आणि ते साजरे करायची पद्धत, वेषभूषा, बोलीभाषा ह्या सर्वात एक वेगळेपण आहे.

वरळी कोळीवाड्यात आम्ही १९७२  च्या दरम्यान राहायला आलो. त्यावेळी कोळीवाड्यात बरीच कोळी वस्ती होती. कमरेला रुमाल लावलेले पुरुष आणि काष्टया नेसलेल्या कोळणी आगार बाजार, लोअर परेल, दादर, शिवडी बाजारात जाण्यासाठी टोपल्या घेऊन ( लाईन न लावता) बस स्टॉप वर उभे असायचे. आम्ही शाळेत जाणारी मुले पण बस स्टॉप वर पुढे उभे राहायचे, तेव्हा ” काय र – शाळेत शिकवला नाय काय तुम्हांना शिस्तीत राहायला” असे आम्हालाच उलटे विचारत. जणू कोळीवाडा हा त्यांचा गाव (एका अर्थाने खरेच होते ते) आणि आम्ही त्यांच्या गावात राहणारे परके. वरळी कोळीवाड्यात राहिल्याने कोळी लोकांची जीवन पद्धती जवळून न्याहाळता आली. माझे काही मित्र आगरी असल्याने त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना श्रीवर्धन, अलिबाग अशा ठिकाणी जाता आले आणि त्यांची “हळद” आणि “लग्ने” अनुभवता आली. राहिला “सरळ तर सूत (सुता सारखा सरळ) नाहीतर भूत” अशा एका वाक्यात आगरी किंवा कोळी जमातीचे वर्णन ऐकले होते. .

त्या काळात शाहीर बाळकराम वरळीकरांची बस कोळीवाड्याच्या नाक्यावर उभी असलेली पाहिल्याचे आठवते. कदाचित त्या काळी ती गाडी घेऊन त्या काळात छोट्या असणाऱ्या मुंबईत अनेक ठिकाणी आपली लोक कला आणि लोकगीते ते साजरी करत असत. त्यांची कोळीगीते खूप प्रसिद्ध होती. त्यावेळी हिंदी गीतांबरोबर अनेक कोळीगीते शाळेच्या पिकनिक मध्ये हमखास गायली जायची. “चांदण्यात चांदणं पिठभर चांदणं” हे गीत तर हमखास शिक्षक आणि विद्यार्थयांमध्ये पॉप्युलर होते. वात्रटपणा आणि चावटपणा नसल्याने आणि शुद्ध लोक गीत आणि साधी गेय (म्हणायला सोपी) अशी चाल असल्याने हि गाणी लोक मान्य झाली होती. शनिवारी दुपारी रेडिओ वर मुंबई ब केंद्रावर सकाळी ११०० वाजता कामगार सभेत वाजवली जायची आणि लहान थोर, म्हातारी कोतारी अगदी मन लावून ऐकायची. कोळी गीतांवर नाचताना भान हरपायला होते. कोळीगीतांचे आकर्षण असे कि “समिंदरा माझया समिंदरा” ह्या गाण्यात कोळी नृत्य करायचा मोह हेलन ला पण आवरला नाही

“लाय लाय लायेकरणी” हे असेच एक कोळीगीत. त्यात त्याकाळच्या वेगळ्या प्रदेशात राहाणाऱ्या कोळी बायकांच्या विशिष्ट वेषभूषेवरून, चाली रीती वरून, बोली भाषेवरून ती कोणत्या गावातील  आहे हे ओळखता यायचे. ह्या गाण्यात त्याचेच वर्णन केले आहे. नीट ऐकाल तर त्यावेळच्या मुंबईत असणाऱ्या गावांची नावे (वेसाव, भांडुप, वरळी, दांडा, मालवणी, कुलाबा, शिवडी, शिव, वसई, कर्जत माहीम वगैरे) आपल्या कानावरून जातील.

कालांतराने कोळी लोकांची मुले ऑफिसेस मध्ये कामाला लागली. परंपरागत मासेमारी व्यवसायापासून त्यांनी फारकत घेतली. जाळी विणणे सोडून लेखणी ने खर्डेघाशी करू लागली. त्या जुन्या वेषभूषेतले कोळी लोक दिसणे पण कमी झाले. कोळीवाड्यात आणि सी फेस वर दिसणारी कोळ्यांची जाळी आणि त्या जाळ्यांची दुरुस्ती करणारी माणसे हळू हळू दिसेनाशी झाली. सी फेस च्या कोपर्यावर सर्वकाळ सुकायला ठेवलेले बोंबील आणि बांगडे आणि कोलीम कमी कमी होत गेले. वरळी सी फेस वरून येणारा खारा वारा अजूनही वाहतो पण त्यात असणारा सुक्या मासळीचा वास आता कमी झाला आहे. ही जुनी कोळीगीते अजूनही कोळ्यांच्या गावांची, संस्कृतीची, वेशभूषेची आठवण करून देतात आणि मन पुन्हा भूतकाळात घेऊन जातात.

— प्रकाश दिगंबर सावंत 

प्रकाश दिगंबर सावंत
About प्रकाश दिगंबर सावंत 11 Articles
विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी. जन्म मुंबई चा. प्रवासाची आवड. विक्री विभागात अधिकारी असल्याने देश विदेशात प्रवासाची संधी प्राप्त. प्रवासादरम्यान लोकांचा स्वभाव आणि लोक परंपरा जवळून पाहण्याची संधी. सध्या मुक्काम पुण्यात. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. इतिहास, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..