संत नरहरी सोनार हे ‘शैवपंथी’ होते , ते केवळ शंकराची भक्ती करीत. एका सावकाराने पुत्रप्राप्तीसाठी विठ्ठलाला नवस केला. विठ्ठल नवसाला पावला आणि सावकाराला पुत्रप्राप्ती झाली. नवस फेडण्यासाठी विठ्ठलाच्या कमरेच्या मापाची सोनसाखळी बनवावी म्हणून तो नरहरी सोनाराकडे आला. शंकर सोडून इतर कोणत्याही देवाचे तोंड न पहाणार्या नरहरींनी सावकाराच्या ऐकले परंतू डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या कमरेचे माप घेण्याचे ठरविले.
नरहरी माप घेऊ लागले तर स्पर्शाने ती मुर्ती शंकराची भासली म्हणून त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली , पहातात तर दोन्ही हात कटेवर असलेली विठ्ठलाची मुर्ती.
त्यांनी पुन्हा पट्टी डोळ्यावर बांधली आणि मुर्ती चाचपून पाहीली तर मुर्तीच्या गळ्यात सर्प तर मस्तकी जटा.
नरहरींनी ताबडतोब डोळ्यावरची पट्टी सोडली आणि पाहीले तर समोर तीच सावळ्या विठाईची हसरी मुर्ती.
तेव्हा शिव व सावळा हरी हे दोन नसून एकच असल्याची नरहरींना प्रचिती झाली व ते विठ्ठल भक्त झाले.
तसा मला अध्यात्माचा फारसा अभ्यास नाही आणि तितकासा रस ही नाही.. पण माझे बाबा विठ्ठल भक्तांच्या कथा सांगत. .. त्यात वारांगणाची कन्या संत कान्होपात्रा
.. कधिही पंढरीला न गेलेला सावतामाळी. . विठ्ठलाने जिचे दळण दळून दिले ती संत जनाबाई. . पंजाब पर्यंत भागवत धर्माची पताका फडकवणारे संत नामदेव. . प्रत्यक्ष भगवंताने पाठविलेल्या विमानातून वैकुंठास जाणारे संत तुकाराम. या साऱ्या संताच्या कथा ते तल्लीन होऊन सांगत.
हि सारी संत मंडळी म्हणजे विठुरायाची लेकरे… म्हणूनच विठ्ठलाला ‘लेकुरवाळा ‘ म्हंटले असावे… जणू या सर्व संतांचे लाड कौतुक करण्यासाठी विठ्ठलाने हा अवतार घेतला असावा.
बोला पुंडलिक वरदा ..हारी विठ्ठल. .
श्री ज्ञानदेव. . तुकाराम .. !!
— सोमाई —
आम्ही साहित्यिक या फेसबुक ग्रुपवरील #महाचर्चा_आषाढी_पंढरी या महाचर्चेचा भाग असलेला लेख.
Leave a Reply