नवीन लेखन...

मराठीसाठी किमान एवढंतरी करुया…..

Let us Do at least this for Marathi

१ मे १९६० या दिवशी कागदोपत्री आस्तित्त्वात आलेल्या ‘मराठी माणसाच्या आणि मराठी भाषिक असण्याची अपेक्षा असलेल्या’ महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सवी सोहोळा वर्षभर दणक्यात पार पडला. कागदोपत्री म्हणण्याचं कारण एवढंच की भाषावार प्रांतरचनेनंतरही महाराष्ट्रावरील भाषांचं आक्रमण थांबलेलं नाही… अगदी पन्नास वर्षांनंतरही. मराठी पाट्यांसाठी, एफएमवरील गाण्यांसाठी, मराठी सिनेमांसाठी थिएटर मिळण्यासाठी आणि बेळगाव कारवारसाठीही आम्हाला अजूनही आंदोलनं करावी लागतात.

दरवर्षी महाराष्ट्र दिन, मराठी भाषा दिन यासारखे दिवस साजरे केले जातात. संकल्प केले जातात, सरकारी सिंहगर्जना होतात. मरणासन्न मायबोली मराठीला वाचविण्यासाठी पॅकेजेसच्या घोषणा होतात, कोटींची उड्डाणे होतात. दोन-चार दिवस नवलाई असते. नंतर सगळं सामसूम होतं आणि पुढच्या दिनापर्यंत तलवारी म्यान होतात.

मराठीची जोपासना व्हायलाच हवी, अस्मिता तर जपलीच पाहिजे. पण फक्त मराठी गाणी वाजवून आणि मराठी पाट्या लावूनच मराठी अस्मिता जोपासली जाणार आहे का? मराठी दिवस साजरे करुन आणि संमेलने भरवूनच मराठीचं संवर्धन होणार आहे का?

या सर्व मार्गांपेक्षा सर्वात आधी सवय करुया मराठीतून संगणकावर लिहिण्याची. आपल्यापैकी कितीजणांच्या संगणकावर मराठीत काम करण्याची सोय आहे? किती जण मराठीत इ-मेल आणि कागदावरील पत्रव्यवहार करतात? कितीजण फेसबुकवर मराठीत लिहितात?

मराठी माणसाने दुसर्‍या मराठी माणसाला इ-मेल फक्त मराठीतच पाठवावे असा संकल्प या दीपावलीनिमित्त करायला काय हरकत आहे? फेसबुकवर लिहिताना शक्यतो मराठीतच लिहायचे असाही संकल्प करायला काय हरकत आहे?

आपली इच्छा तर हे करण्याची असते. मात्र आपल्यापैकी बहुतेकांना न्यूनगंडानं पछाडलेलं असतं. आपल्याला भिती असते लोक काय म्हणतील, हसतील की काय याची? मराठीत बोलणं, लिहिणं म्हणजे मागासलेपणाचं लक्षण अशीही बर्‍याचजणांची भावना असलेली दिसते. मराठी गाणी डाउनमार्केट असतात असं म्हणणार्‍या एफ एम चॅनेल्सना सुद्धा मराठी गाणी वाजवावी लागलीच ना? मग एकानं, दुसर्‍यानं…. दहा जणांनी…. शंभर जणांनी…. शेकड्यांनी…. हजारोंनी मराठी माणसांनी फेसबुकवर मराठीत लिहायला सुरुवात केली तर कोणाची हिंमत आहे काही बोलायची किंवा हसायची? खरंतर हसणार्‍याना आणि टवाळकी करणार्‍याना, मग ते मराठी असले तरीही, चपराकच मिळेल. आणि अमराठी लोक बोलले, हसले तरी आपल्याला काय त्याचं? आपण त्यांचं काही घेउन खाल्लंय का?

आज मराठी इ-मेल करण्यासाठी अनेक वेबसाईटस उपलब्ध आहेत. मात्र यात एक अडचण आहे. प्रत्येक साईटवरच्या मराठी लिखाणासाठी किबोर्ड वेगवेगळा आहे. बर्‍याच वृत्तपत्रांच्या साईटसवरुन संपादकांना पत्र पाठवण्याची सोय असते. मात्र यातही म.टा., लोकसत्ता, सकाळ, लोकमत या वेगवेगळ्या साईटसवर वापरता येणारे किबोर्ड वेगवेगळे आहेत. त्यामुळे एका साईटच्या किबोर्डची सवय असलेल्याला दुसर्‍या साईटवर मराठीत लिहिताना अडचण येतेच.

मराठीत संगणकावर टाईप करण्यासाठीही सॉफ्टवेअरही मुबलक उपलब्ध आहेत. मात्र बरहामध्ये असलेला किबोर्ड आकृतीत नाही आणि आकृतीतला श्रीलिपीत नाही अशीही अडचण आहेच.

या सगळ्या अडचणींवर मात करुन, कोणताही किबोर्ड वापरुन, अक्षरश: कोणत्याही वेबसाईटवर, मराठीसह कोणत्याही भारतीय भाषेत काम करण्याची सोय देणारे फॉन्टफ्रीडम गमभन, मराठीत फोटोशॉप, पेजमेकर वगैरेमध्ये काम करण्यासाठीचे फॉन्टफ्रिडम वगैरेसारखी सॉफ्टवेअर असलेली `मायबोली’ ही मराठी मेगा-सीडी   www.fontfreedom.com येथे उपलब्ध आहे. ही सॉफ्टवेअर वापरुन आपण फेसबुकवर मराठीत लिहू तर शकालच पण फेसबुक आणि जीमेलवर चॅटसुद्धा करु शकाल.

इंग्लिश फोनेटिक, गमभन फोनेटिक, इन्स्क्रिप्ट, गुगल यासारख्या अनेक प्रकारच्या किबोर्डमध्ये काम करता येणारे हे सॉफ्टवेअर वापरुन एम एस ऑफिस वगैरेमध्ये मराठीत काम करता येते.

चला तर मग यापुढे आपण मराठीचा संगणकावर जास्तीत जास्त वापर करुया. मराठीतच इ-मेल लिहिण्याचा, पत्रव्यवहार करण्याचा आणि फेसबुकवरही मराठीत लिहिण्याचा संकल्प करुया. किमान दहा मेल्सपैकी एक आणि फेसबुकवरच्या दहा पोस्टपैकी एक एवढं तर आपल्या मायबोलीसाठी आपण करु शकतो ना?

निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

1 Comment on मराठीसाठी किमान एवढंतरी करुया…..

  1. नमस्कार.
    दिवाळीला मराठीत ग्रीटिंग कार्ड पाठवण्याची कल्पना छान आहे. अनेक जण ते करतातही.
    – कांहीं वर्षांपूर्वी मी गुढि पाडव्याला मराठीत ग्रीटिंग कार्ड पाठवत असे ( मुख्यत: जागतिक मराठी चेंबच्या मेंबर्सना).
    त्यांची रिएॅक्शन एनकरेंजिंग तर नव्हतीच ; पण ‘हें आडवेळेला कुठून ग्रीटिंग आलें असें आम्हाला वाटलें’ असें कांहीं मंडळींनी मला संगितलेही ! मराठी नव वर्षाबद्दल मराठी आंतरप्रेन्युअर्स व इंडस्ट्रीएलिस्टस् ना किती आस्था आहे !! शेवटी ३-४ वर्षांनंतर मी ती प्रॅक्टिस बंद केली. ( असा गोष्टींचा कंटाळा आला म्हणून ! ) .
    – सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..