समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः।
प्रसन्नात्मेन्द्रिय मनः स्वस्थ इत्यभिधियते।
आयुर्वेदाने ‘निरोगी कोणाला म्हणावे?’ या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले आहे की; ज्याच्या शरीरात दोष, धातू आणि मल हे साम्यावस्थेत असतात. तसेच ज्याची इंद्रिये, आत्मा व मनदेखील साम्यावस्थेत असते ती व्यक्ती निरोगी असते. यातील दुसऱ्या ओळीतला उल्लेख अतिशय महत्वाचा आहे. ‘मनाचे आरोग्य’ हे निरोगी असण्याकरता महत्वाचे आहे असे आयुर्वेद मानतो. १० ऑक्टोबर रोजी ‘जागतिक मनःस्वास्थ्य दिन’ साजरा केला गेला. यावर्षी तर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Depression; let’s talk ही संकल्पना राबवली आहे. थोडक्यात; ‘नैराश्यावर बोलू काही’!!
आयुर्वेदाने केवळ शरीरच नव्हे तर मन हेदेखील रोगांचे अधिष्ठान मानले आहे. मनाला ‘नित्य द्रव्य’ अशी उपमा देत त्याला एक अत्यंत प्रमुख संकल्पना मानले आहे. केवळ आपल्या सभोवतालचे वातावरणच नव्हे तर आपण सेवन करत असलेल्या अन्नाचादेखील मनावर चांगला- वाईट परिणाम होत असतो असे आयुर्वेद सांगतो. गरोदर महिलेचे मन प्रसन्न असावे; तिचे डोहाळे पुरवले जावेत अन्यथा जन्माला येणाऱ्या बाळात काही दोष राहून जातात ही आयुर्वेदाची संकल्पना. आयुर्वेदात मनाचा विचार केंद्रस्थानी ठेवून ‘मानसिक प्रकृती’ या अनोख्या संकल्पनेबद्दल सविस्तर मत मांडले आहे. उन्माद, अपस्मार, अतत्वाभिनिवेश, संन्यास, मूर्च्छा यांसारखे मनाशी संबंधित कित्येक विकार आणि त्यांवरील उपचार यांचे वर्णनदेखील आयुर्वेदातच सापडते. थोड्क्यात; आरोग्याच्या दृष्टीने मनाला महत्वपूर्ण मानणारे आयुर्वेद हे पहिले चिकित्साशास्त्र होय. दुर्दैव पहा; असे असूनही आम्हा भारतीयांना ना या सत्याची जाणीव असते ना आमचे आमच्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष आहे.
WHO च्या आकडेवारीनुसार; २०१५ साली भारतात एकूण लोकसंख्येच्या ४.५ % लोकसंख्या नैराश्याचे रुग्ण होती. आकडेवारी काढल्यास हा आकडा पाच कोटींहून अधिक जातो. तर एकूण लोकसंख्येच्या ३ % लोकसंख्येला अन्य कोणत्या ना कोणत्या प्रकारचे मानसिक विकार जडलेले होते. आकडेवारीनुसार हा आकडा जवळपास चार कोटीला स्पर्श करतो. याच वर्षी २ लाख ८८ हजार भारतीयांचे आत्महत्या केल्याने मृत्यू झाले. तर कित्येकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र ते बचावले. आत्महत्येच्या दृष्टीने विचार करता हा दर जागतिक दराच्या १.५ % इतका आहे. २०१२ सालच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक आत्महत्या या भारतात झाल्या होत्या! आपला प्रवास नेमका कोणत्या दिशेने सुरु आहे?! ज्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे संकटांच्या छाताडावर उभे राहून यशस्वीपणे विजयी होणारे वीर जन्माला आले तिथे इतकी गंभीर स्थिती का असावी? केवळ शिवप्रभूच नव्हेत तर इतिहासात डोकावल्यास महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग, लाचीत बोडफुकन अशी कित्येक उदाहरणे सापडतील; ज्यांच्या आयुष्यात नैराश्याला थारा नव्हता. दुर्दैवाने हा इतिहास आमच्यापर्यंत पोहचू दिलाच जात नाही. आपला गौरवशाली इतिहास, परंपरा यांची माहिती नसणे हेदेखील या नैराश्यामागील एक महत्वाचे कारण असण्याची संपूर्ण शक्यता आहे. आपल्याकडील विविध सण आणि उत्सव हेदेखील मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. आज मात्र सण म्हणजे वादंग असे समीकरण रुजले आहे हे आमचे दुर्दैव. भारतीयांच्या नैराश्याच्या वाढत्या प्रमाणाचे कारण काहीही असले तरी त्यावर तातडीने उपाययोजना करणे ही अतिशय महत्वाची बाब आहे, यासाठी केवळ मानसोपचारतज्ज्ञच नव्हे तर तर प्रत्येक डॉक्टर/ वैद्यांनी; नव्हे नव्हे तर प्रत्येक नागरिकानेसुद्धा पुढाकार घ्यायला हवा. एखाद्याला नैराश्य भेडसावत असेल तर त्याला धीर द्या. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. कोणीही ‘आत्महत्या करेन’ असे म्हटले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कोणाच्याही बिघडलेल्या मानसिक स्थितीत हसणे, हेटाळणी करणे असे प्रकार करून भर घालू नका. त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना याबाबत तात्काळ कल्पना द्या. अशा व्यक्तींनी तातडीने वैद्यकीय मदत घेतल्यास त्यांची स्थिती वेळेत सुधारू शकते. लक्षात ठेवा…..It is OK not to feel ok!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
7 April 2017
Leave a Reply