लाय डिटेक्टर हे असत्यशोधक यंत्र आहे. या यंत्राला पॉलीग्राफ असेही म्हटले जाते.
जेव्हा एखादा माणूस खोटे बोलत असतो, तेव्हा त्याचे हृदय धडधडते किंवा त्याला श्वास लागतो. हे सगळे नकळत घडत जाते. शरीरातील हे बदल यंत्राच्या मदतीने टिपले जातात व त्यातून ती व्यक्ती खोटे बोलत आहे हे समजते.
एखादी व्यक्ती खोटे बोलताना घाबरते त्यामुळे तिच्या तळहाताला व तळपायाला घाम सुटतो. तज्ञ व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना हे सगळे प्रतिसाद मिळतात. यात सुरुवातीला काही नियंत्रित स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात व नंतर चौकशी सदृश्य प्रश्न विचारले जातात. सत्य शोधण्यासाठी पोलीस किंवा गुप्तहेर ही त्याचा वापर करतात.
जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलते, तेव्हा जो ताण येतो त्यातून तिला घाम येतो. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होते व त्वचेचा विद्युत रोध कमी होतो. तळहात व तळपायाला घाम जास्त सुटतो. इलेक्ट्रोडच्या मदतीने विद्युत वहन क्षमतेतील बदल टिपला जातो. त्यालाच गॅल्व्हनिक स्कीन रिस्पॉन्स असे म्हणतात.
पॉलीग्राफ म्हणजेच लाय डिटेक्टर चाचणी करताना छातीला एक पट्टा लावला जातो, आपल्या श्वासनानुसार हा पट्टा विस्तारतो व आकुंचन पावतो. रक्तदाब मोजण्यासाठी जो पट्टा वापरतात तो दंडाला लावला जातो तर बोटांना इलेक्ट्रोड लावले जातात. या सर्व यंत्रणांमधील जी निरीक्षणे असतात ती पोली ग्राफी यंत्रातील पॅन कडे जातात व त्यातून वेगवेगळ्या लहरींचे चित्र तयार होते. त्यात श्वसनाचा वेग, हृदयाच्या ठोक्यांचा द, इलेक्ट्रोडर्मल प्रतिसाद त्वचेतील विद्युतीय बदल यांचे प्रतिबिंब असते. जेव्हा व्यक्ती मानसिक दृष्ट्या विचलित असते, त्यावेळी या आलेखात आपल्याला काही टोकदार भाग दिसतात. जेव्हा ताण येतो तेव्हा हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे रक्तदाब वाढतो तसेच हृदयाचे ठोके वाढतात.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉक्टर जॉन लार्सन यांनी 1921 मध्ये पहिल्यांदा रक्तदाब व गॅल्व्हनिक प्रतिसाद दाखवणारे पॉलीग्राफ यंत्र तयार केले. 1972 मध्ये ॲलन बेल यांनी लाय डिटेक्टर यंत्रात अनेक सुधारणा करून सायकॉलॉजिकल स्ट्रेस इव्हॅल्युएटर हे मानसिक परिणाम शोधणारे यंत्र तयार केले. लाय डिटेक्टर चाचणी ही सर्वच न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातेच असे नाही. वैज्ञानिकांतही या यंत्राच्या मानवी भावनांचे मापन करण्याच्या क्षमतेबाबत बरेच मतभेद आहेत. खोटे बोलताना काही मानसिक व शारीरिक बदल होतच नाहीत व एखादा निर्ढावलेला गुन्हेगार तर असे कुठलेही परिणाम न दाखवता खोटे बोलू शकतो असा युक्तिवाद केला जातो.
संदर्भ : मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने – ‘कुतुहल’ या सदरामधील लेख
Leave a Reply