मी उत्सुकतेपोटी या विषयावरचे बरेच काही वाचले आहे. काही ज्येष्ठ माहितगारांकडून माहितीही घेतली आहे. अगदी रुपरेषेच्या स्वरूपात थोडे लिहितो आहे.
हिंदू धर्मातील मृत्यूनंतरचे जीवन आणि मोक्षाची संकल्पना अन्य कुठल्याही संस्कृतीत इतकी परिपूर्णपणे मांडलेली नाही. यासाठी फक्त हिंदू धर्मामध्येच प्रचलित असलेल्या पुनर्जन्म, कर्म सिद्धांत, पंचमहाभूतांनी बनलेला मनुष्य देह, यासारख्या गोष्टी मान्य केल्याशिवाय पुढची सर्व वाटचाल ही अगम्यच राहते.
पण या गोष्टी मान्य केल्या तर मग जन्ममृत्यू साखळीतील एकही गोष्ट अगम्य ( unsolved ) रहात नाही.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन याच्या उत्क्रांतीवादाच्या शोधाच्या हजारो वर्षे आधी हिंदूधर्माचे तत्वज्ञान हेच सांगते आहे. अगदी ढोबळमानाने एखाद्या एकपेशीय जीवापासून उत्क्रांती होत होत सजीव तयार झाले असा थोडक्यात सिद्धांत ! मग हिंदू धर्मातील तत्वज्ञान काय सांगते ? १ लक्ष ८४ हजार विविध जन्मांनंतर मनुष्य जन्म मिळतो. सप्तपाताळ, मानवलोक आणि सप्तस्वर्ग हे काय आहे ? डार्विनला फक्त देहाचीच उत्क्रांती सांगता आली. हिंदू धर्मात देहाबरोबरच त्याचे पूर्वकर्मफल, पापपुण्य अशा अनेक गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे. पुढे संशोधनच झाले नाही म्हणून, नाहीतर १ लक्ष ८४ हजार वेळा recycle म्हणजे इतके विविध जन्म घेतल्यावरच मनुष्य तयार होतो या आकड्याचाही काही संबंध असू शकेल. मनुष्य जन्मानंतरच्या उत्क्रांतीबद्दल मात्र विज्ञानाला काही सांगता आलेले नाही.
पण आपल्या धर्माने मात्र पुढे भू:, भुव, महा, जन , तप आणि सत्य लोक / स्तर असे उत्क्रांतीचे टप्पेही सांगितलेले आहेत. तेथील कामकाजाची माहितीही दिली आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह( कोष ) गळून पडला तरीही प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ज्ञानमय हे कोष तसेच राहून पुढे प्रगती करतात.मनुष्यदेहातील पाणी, वायू, अग्नी, आकाश या ऊर्जा (energy )असल्याने Law of Indestructibility of energy नुसार त्या नष्ट न होता अनंतात विलीन होतात म्हणजे एका मोठ्या कोषात ( Universal Reservoir ) खेचली जाते. शरीराचे material जळून पुन्हा ते अनेक materials मध्य रूपांतरित होते.
या बद्दलची अनेक पुस्तके माझ्याकडे आहेत. असेच एका पुस्तक म्हणजे – – -मेटा सायन्सचे श्री. जॉर्ज मिक यांनी लिहिलेले ” आफ्टर वुई डाय व्हॉट देन ?” नावाचे एक पुस्तक ! त्याचा मराठी अनुवाद ( ” मृत्यूनंतर होते तरी काय? अनुवाद- पद्मा कुलकर्णी) पुण्याच्या प्रसाद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. त्यात मिक यांनी या विषयावर जगभर केल्या गेलेल्या शेकडो वैज्ञानिक प्रयोगांची माहिती दिली आहे.यात आत्म्याची छयाचित्रेही दिली असून त्यात हिंदू तत्वज्ञानाचा पुसटसा उल्लेखही केलेला नसला तरी त्यांची सर्व अनुमाने ही हिंदू धर्मांतील या बाबतीमधील सर्वच्या सर्व १०० टक्के खऱ्या आहेत यावर शिक्कामोर्तब करतात.
ज्या ख्रिश्चन धर्मात पुनर्जन्मच नाही तो धर्म मानणारे शास्त्रज्ञ मात्र या विषयावर संशोधन करायला कचरत नाहीत. पण आपल्याकडे मात्र या सर्व गोष्टी भंपकपणा, अवैज्ञानिक, अंधश्रद्धा म्हणून आधीच फेटाळल्या जातात. असो.
(यात मी फक्त तत्वज्ञानासंदर्भात थोडेसे लिहिले असून कर्मकांडे, विधी, प्रचलित चालीरीती, त्यांची योग्य-अयोग्यता याबद्दल काहीही लिहिले नाही)
(हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा.)
— मकरंद करंदीकर
Leave a Reply