एकतीस डिसेंबर ची रात्र, नवी दिल्ली मधल्या ग्रीन पार्क भागातील त्या क्लब मध्ये तरुणाईचा उत्साह आणि धुंद शिगेला पोहोचली होती, संगीताच्या तालावर आणि मदिरेच्या डोलावर थिरकणारी पावलं नववर्षाच्या स्वागताला प्रचंड उत्सुक होती, घड्याळाच्या काट्यांनी बारा ची वेळ दाखवताच हा उत्साह आणि जल्लोष आता परमोच्च बिंदू वर पोहोचला … अजून एक तासभर असाच जल्लोष झाल्यावर कुलदीप ने बाकी चौघांना हातातील घड्याळ दाखवत ” चला! आता निघण्याची वेळ झाली ” असा इशारा केला आणि मोठ्या निरेच्छेने तोंड वेडीवाकडी करीत बाकी चौघे म्हणजेच संदीप, कुणाल, रणजित आणि बंटी त्या क्लब मधून बाहेर पडले, अगदी संध्याकाळी सात वाजल्या पासून सगळे त्या पार्टीची मजा लुटत होते तरीही ” अरे यार ! आत्ता तर खरी पार्टी सुरू झाली होती राव !” असे भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होते, पण जाणं भाग होतं कारण सगळे कुलदीपच्याच गाडीतून आले होते आणि कुलदीप ला घरी जायचं होतं म्हणल्यावर नाईलाज होता, तश्याच लडखडत्या अवस्थेत तारवटलेल्या चेहऱ्यानी सगळे गाडीत बसले …बाहेर प्रचंड थंडी होती, सगळीकडे अजून फटाके वाजत होते, सर्वांनी भरपूर दारू ढोसली होती .. आणि त्या शिवाय कुलदीपचं न ऐकता.. एक दोन बीयर च्या बाटल्या कुणाल आणि बंटी ने हातात ठेवल्या होत्या… आपल्याला कुलदीप सुखरूप घरापर्यंत पोहोचवेल याची इतर चौघांना खात्री होती …कारण या बाबतीत त्याचा स्टॅमिना सॉलिड होता , पार्किंग स्लॉट मधून सफाईदार वळण घेत बाहेर पडून त्याची गाडी आता मदन मोहन मालवीय रोडला लागली होती, बाहेरची थंडी हळू हळू डोक्यात भिनत होती, पहिला स्टॉप आला, मधुबन सोसायटीच्या गेट जवळ रणजित उतरला … तो सुखरूप गेट मधून आत गेलेला पाहून कुलदीप ने स्टार्टर मारला पुढे जे बी नगर जवळ संदीपला सोडलं… आता कैलाश कॉलनीत बंटी आणि कुणालला सोडलं की वीस एक मिनिटात कुलदीप त्याच्या वसंत विहार मधल्या पॉश बंगल्यात पोहोचणार होता …
टेपवर मंद संगीत लावून तो आता आरामात गाडी चालवत होता, अर्धवट शुद्धीत असलेले कुणाल आणि बंटी मात्र त्याची खेचण्यात आणि जोरजोरात खिदळण्यात मग्न होते …” अरे जरा इंग्लिश डिस्को गाणी लाव की…हे काय लावलय बोअरिंग !” ” आम्हाला सोडून घरीच जा रे …नाही तर जाशील दुसरी कडे सेलिब्रेट करायला…” पण तिकडे दुर्लक्ष करीत कैलाश कॉलनी ची कमान दिसताच त्याने शांत पणे गाडी साइडला घेतली आणि त्या दोघांना उतरायला सांगितलं..
” अरे यार आता रात्रीचे दिड वाजलेत… झोप की इथेच आमच्या फ्लॅट वर…!” गाडीतून उतरून अर्धी राहिलेली बीयरची बाटली घशात रिकामी करीत बंटी म्हणाला..
” नो वे…. मी घरी जातो डोन्ट वरी… तुम्ही व्यवस्थित जावा घरात… ” कुलदीप ने नम्रपणे नकार दिला..
” शुअर? ?… ओ के… हे घे ही बीयर घेऊन जा….!” असं म्हणत कुणाल ने त्याच्या हातातली बाटली कुलदीपच्या मांडीवर ठेवली…
” अरे नको रे … राहू द्या तुमच्या कडेच…!” असं म्हणत कुलदीप ती बाटली परत त्याच्या कडे देऊ लागला….
” गप रे साल्या… ठेव तुलाच … वन फॉर द रोड ! ” असं म्हणत बंटी ने ती बाटली कुलदीप च्या शेजारच्या सीटवर ठेवली आणि दोघे जोरजोरात खिदळत एकमेकाच्या आधाराने लडखडत कॉलनीत शिरले…
शांत पणाने हसून आता कुलदीप ने टेप रेकॉर्डर चां आवाज थोडा वाढवीत गाडी सुरू केली आणि निघाला … अपोलो जंक्शन चे सर्कल समोर दिसत होतं.. वळण घेऊन दहा एक मिनिटात घर येणार होतं, गाडीला फारसा वेग नव्हताच… अर्थात लवकर घरी पोहोचण्यात त्यालाही फारसं स्वारस्य नव्हतच .. कोण होतं घरी वाट पाहणारं? ? बिझनेसमन बाप आणि सोशल वर्कर आई च्या पोटी जन्मलेला एकुलता एक मुलगा होता तो ! बिझनेस ट्रीप च्या निमित्ताने वडिलांचे सतत देश विदेश दौरे सुरू असायचे आणि किटी पार्टी व सोशल क्लब च्या आहारी गेलेल्या आईला ही आपला मुलगा कुठे आहे? काय करतोय याची काळजी नव्हती .. आज रात्री देखील दोघे आपापल्या हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये गेले होते …कुलदीप साठी हवा तेवढा पैसा आणि सुख सोयी उपलब्ध होत्या पण परदेशी शिक्षण घेऊन आलेल्या आणि आता ” हा आपला बिझनेस पुढे सांभाळेल ” अशी व्यवहारिक अपेक्षाच लादलेल्या कुलदीपला आई बापाची खरी माया कधी मिळालीच नव्हती ! अश्याच विचारात असताना त्याच्या बी एम डब्ल्यू ने अपोलो जंक्शन च्या सर्कलला मोठ्या सफाईने वळण घेतलं आणि त्या चक्राकार वेगा मुळे त्याच्या शेजारच्या सीटवरची बीयरची बाटली घरंगळून खाली पडली … आणि तश्याच वेगात गाडी असताना तो ती बाटली उचलण्यासाठी डाव्या बाजूस खाली वाकला आणि पुन्हा वर उठला पण तेव्हढा अवकाश …..आणि ते निमिष … ! त्याची नजर समोरून हटली आणि त्याला एक जोरदार किंकाळी ऐकु आली व भानावर येत त्याने समोर पाहिले तर एक विशी बाविशी तील तरुणी त्याच्या गाडीची धडक बसून सुमारे दहा बारा फूट दूर फेकली गेली होती, आणि तिचे डोके फूटपाथच्या कडेवर आपटून तिथे साचलेले रक्ताचे थारोळे गाडीच्या प्रकशात त्याला स्पष्ट दिसले ….
चटकन गाडीचे इंजिन बंद करून तो खाली उतरून त्या तरुणी जवळ गेला…तिची अवस्था पाहून त्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत देखील त्याला दरदरून घाम फुटला.त्याने घाबरून इकडे तिकडे नजर फिरवली, रस्त्यावर काळ कुत्र देखील नव्हतं, सगळीकडे शुकशुकाट ! मधूनच लांबून जाणाऱ्या एखाद्या गाडीचा आवाज सोडला तर पूर्ण शांतता होती, खिशातून रुमाल काढून घाम पुसत तो विचार करू लागला…” ह्या तरुणीला आता उचलून हॉस्पिटल मध्ये पोहोचवणं आवश्यक होतं…
पण मग पोलिसांचा ससेमिरा मागे लागला तर? ?.. .जाऊ दे कोणी पाहिलं तर नाही ..असच पळून गेलं तरी काय हरकत आहे? ? ” असं विचारांचं काहूर मनात माजलं असतानाच त्याच्या डाव्या बाजूला रस्त्या पलीकडे असलेल्या चाळी वजा बिल्डिंग मध्ये काही खिडक्या मध्ये लाईट लागलेले त्याला दिसले .. बहुधा ते त्या जखमी तरुणी चे घर असावे… ! आता जर आतून लोक बाहेर आले तर आपली काहीं खैर नाही, कारण त्याला जमावाची मनोवृत्ती चांगलीच ठाऊक होती …एक तर आपण पिलेलो आहोत..त्यात गाडीत दारूची बाटली ! ” झटकन तो गाडीत बसला आणि समोरच रस्त्याच्या बाजूला असलेल्या समांतर कार पार्किंग मध्ये गाडी लावून इंजिन बंद केले व गाडीतूनच तो पाहू लागला…. त्या तरुणी बद्दल त्याला वाईट वाटत होतं पण नाईलाज ही होता, तेव्हढ्यात समोरून सायरन वाजवत एक ॲंब्यूलन्स…तिथे आली आणि कुलदीप बुचकळ्यात पडला . अपघात होऊन काही मिनिटेच उलटली होती आणि कोणीही न बोलावता ही ॲंब्यूलन्स इथे कशी काय आली? ?? ॲंब्यूलन्स त्या मुली जवळ येऊन थांबली, ….त्याच वेळी त्या चाळीतून काही माणसं बाहेर आली…ॲंब्यूलन्स मधून स्ट्रेचर घेऊन दोघं जण उतरले, आणि आत गेले…आतून एका मध्यम वयीन माणसाला त्या स्ट्रेचर वरून बाहेर आणण्यात आलं, एक दोन जण त्या तरुणीला उचलायला गेले, आता तिथे गोंगाट होऊ लागला होता ..रडारड ऐकू येत होती … हा सगळा प्रकार कुलदीप साठी अनाकलनीय होता.. त्या तरुणीला वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्याचं समाधान तर त्याला वाटत होतं पण मनात निर्माण झालेली अपराधी पणाची भावना त्याला प्रचंड अस्वस्थ करीत होती … काय करावं सुचत नव्हतं, तश्याच अवस्थेत त्याने काही विचार केला आणि रिव्हर्स घेत गाडी पटकन बाहेर काढली आणि त्या ॲंब्यूलन्स च्या मागे भरधाव सोडली.. ” लाईफ लाईन हॉस्पिटल ” च्या पोर्च मध्ये गाडी पार्क करून तो पटकन ” कॅज्युलिटी ” विभागा कडे धावला ! तो पर्यंत त्या तरुणीला आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला आत नेण्यात आलं होतं, तिथल्या एका बाकावर बसून एक स्त्री हमसून हमसून रडत होती, काही वेळात त्या रडणाऱ्या स्त्री भोवती काहीं लोक जमा झाले आणि तिचे सांत्वन करू लागले…”विद्या ताई .. अगं काय झालं हे सगळं अचानक? मालू ला काय लागलं? “एक जण विचारणा करू लागला, बहुधा त्या रडणाऱ्या स्त्री चा भाऊ असावा तो ! त्या तरुणी बद्दल काही माहिती मिळते का पाहू या विचाराने कुलदीप हळूच त्यांच्या जवळ गेला आणि खांबामागे उभा राहून त्यांच बोलणं ऐकू लागला.
” अरे काय सांगू रमेश ! “पदराने डोळे पुसत पुसत ती आता बोलू लागली ” रात्री एक वाजण्याच्या सुमारास तुझ्या भावजींच्या छातीत दुखू लागलं, घाम फुटला आणि अस्वस्थ वाटू लागलं तसं मालू ने ॲंब्यूलन्स ला फोन केला… अर्धा पाऊण तास उलटून गेला तरी ॲंब्यूलन्स काही येईना, इकडे हे अजुनच अस्वस्थ झाले, शेजारी पाजारी पण मदत मागितली पण काहीच उपयोग झाला नाही .शेवटी ॲंब्यूलन्स काही येईना म्हणून बाहेर रस्त्यावर एखादं वाहन किंवा टॅक्सी मिळते का पाहायला मालविका धावत गेली …पण तीही लवकर आत आली नाही आणि मग ॲंब्यूलन्स चा आवाज ऐकुन आम्ही बाहेर आलो तर ही रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली… कोणी तरी गाडी वाला धडक मारून पळून गेला बघ भाऊ ! आता इकडे मालविका आय सी यू मध्ये आणि दुसरीकडे तिचे बाबा पण अत्यवस्थ … हे नवीन वर्ष माझ्यावर कसली ही आपदा घेऊन आलंय देव जाणे !”
आता मात्र त्या काकूंचा बांध फुटला होता आणि मग त्यांच्या शेजारी बसलेल्या एक दोन जणी त्यांचं सांत्वन करण्यासाठी पुढे सरसावल्या ! त्या जखमी तरुणीचे नाव ” मालविका ” आहे हे कुलदीप ला समजले आणि एकंदरीत राहणीमान पाहून या मंडळींची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेम आहे हे ही त्याला जाणवलं..आणि मग त्याच मन त्याला खूपच खाऊ लागलं, अजाणते पणी का होईना या सर्व घटनेला आपण जबाबदार असल्याची भावना त्याला अस्वस्थ करू लागली, आता ‘ मालविका ‘ ला आपण कशी मदत करू शकतो? याचा तो विचार करू लागला. आणि विद्या ताईंच्या जवळच्या लोकांची जरा पांगापांग झाल्यावर तो हळूच त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला ” नमस्कार ! माफ करा पण कशी आहे आता मालविका, तिला…. ”
त्याच्या कडे आश्चर्याने पहात अनोळखी स्वरात त्यांनी उलटप्रश्र्नी विचारलं ” पण तुम्ही कोण? ? मी ओळखलं नाही, आमच्या मालू च्या कंपनीत काम करता का? ” ….. त्यावर थोडंसं अडखळत पण ठाम पणे तो नकळत उद्गारला ” अं ! हो हो … बरोबर, मी कंपनीत आहे तिच्याच, …आता कशी आहे ती? ”
त्यावर मात्र फारशी काही चौकशी न करता विद्या ताईंनी त्याला पुन्हा एकदा सगळी घटना सांगितली ..पण पुन्हा पुन्हा त्यांना रडूच येत होतं..
त्यांची ही आगतिकता पाहून कुलदीप आता आतून हलून गेला होता…
त्याने शांत पणे त्यांना धीर देत सांगितले की ” तुम्ही काही काळजी करू नका, ती लवकर बरी होईल आणि तिचे वडील देखील या आजारातून बाहेर पडतील ” हे संभाषण सुरू असतानाच आतून डॉक्टर लगबगीने बाहेर आले आणि त्यांना पहाताच मालविकाची आई, मामा वगैरे लोक चेहऱ्यावर चिंतातुर भाव घेऊन पुढे आले, गंभीर पणाने डॉक्टर बोलू लागले ” हे पहा मल्टिपल इंजुरी आहेत, डोक्याला मार लागल्याने ब्लड लॉस झाला आहे …आणि ….” डॉक्टरांचं हे तांत्रिक बोलणं या लोकांच्या डोक्याच्या वरून जात होतं, कुलदीपच्या लक्षात ही परिस्थिती आली आणि तो त्वरेने डॉक्टरांशी बोलायला पुढे आला ….त्याला डॉक्टरांकडून एव्हढ समजलं की मालविका च्या डोक्याला मार लागल्याने ती आत्ता बेशुद्ध आहे आणि जर रक्त स्त्राव लवकर थांबला नाही तर ती कोमा मध्ये जाऊ शकते किंवा ब्रेन डेड होऊ शकते, आणि तिला यातून वाचवण्यासाठी एक जीवन रक्षक इंजेक्शन द्यावे लागेल, पण हे इंजेक्शन खूप महाग म्हणजेच बेचाळीस हजाराचे आहे व ते या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध नसल्याने दुसऱ्या एका मोठ्या हॉस्पिटल मधून आणावे लागणार आहे . ..
हे सर्व ऐकुन तर मालविका च्या घरच्यांनी तर हायच खाल्ली, हे सर्व त्यांच्या आवाक्या बाहेरचं होतं…
डॉक्टरां कडून सर्व माहिती घेऊन आणि मालविकाच्या आईला धीर देऊन कुलदीप तिथून बाहेर पडला…अर्धा तास शोधाशोध करून अखेर त्याला ते इंजेक्शन एका हॉस्पिटल मध्ये मिळाले …. कुलदीप साठी पैसे महत्त्वाचे नव्हते तर काही ही करून मालविका चे प्राण वाचणे आवश्यक होते. ..
आपल्या निष्काळजी पणामुळेच मालविका आणि तिच्या कुटुंबावर ही वेळ आली आहे ही भावना त्याला प्रचंड अस्वस्थ करीत होती….
इंजेक्शन वेळेत मिळाल्याने मालविका चे प्राण तर वाचले होते पण अद्याप धोका टळला नव्हता … हे सगळं होई पर्यंत आता बाहेर रात्र सरू लागली होती, नवीन वर्षाच्या पहिल्या पहाटेची चाहूल वातावरणात जाणवत होती, कुलदीप सारख्या अनोळखी व्यक्ती च्या रूपाने जणू देवच आपल्या मदतीला धावून आल्याचे भाव विद्या ताई आणि इतर कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसत होते, कारण कुलदीप ने डॉक्टरांशी चर्चा करून मालविका आणि तिच्या वडिलांच्या उपचाराचा सगळा खर्च हॉस्पिटल मध्ये जमा करून टाकला होता ..
आपण केलेल्या अपराधाची काही तरी परतफेड व्हावी हीच त्याची भावना होती, हे सगळे जण असे वेगवेगळ्या अवस्थेत असतानाच डॉक्टरांनी कुलदीप ला आय सी यू च्या त्या खोलीत बोलावलं, तिथली ती सलाईन, ते इंजेक्शन व्हेंटिलेटर आणि या सर्व पसाऱ्यात इतक्या वेळात त्याला पहिल्यांदाच व्यवस्थित दिसली ती मालविका … गोरी गोरी… सडपातळ, धारधार नाक …आणि चटकन नजरेत भरणारे ते लांबसडक केस ! बेशुद्धावस्थेत … शांत पणे साखर झोपेत असल्या प्रमाणे भासत होती ती ! सगळ्यांवर तो नजर फिरवत असतानाच डॉक्टर त्याला म्हणाले ” मिस्टर कुलदीप … पुढचे तीन चार तास महत्त्वाचे आहेत, शी इज अंडर ऑब्जर्वेशन… हा मॉनिटर पहा …
” कुलदीप ने पाहिले तर त्या मॉनिटर वर कसले तरी बिंदू खाली वर पळत पळत रेषा उमटवित होते आणि त्या नुसार समोरील आकडे बदलत होते … त्यात काहीच उमगल नसल्याने कुलदीप ने डॉक्टरांना विचारलं ” डॉक्टर ..कसल्या लाईन आहेत या? ”
शांत पणाने डॉक्टर उत्तरले ” लाईफ लाईन ” अजून तीन एक तास हे आकडे आणि या लाईन अश्याच वेगाने पळत राहिले तर…आपण जिंकलो…नाही तर..!
लक्ष्य ठेव.. यंग मॅन … ” असं म्हणत त्याच्या खांद्यावर हलकेच थापटून डॉक्टर बाहेर पडले आणि कुलदीप त्या मॉनिटर वर ची ” लाईफ लाईन ” पाहू लागला.
सिमल्याच्या ” कानलोग पार्क” या उच्चभ्रू भागातील ” देविका विला ” हा बंगला आज एखाद्या नव्या नवरी प्रमाणे सजला होता …. दिवाळी पेक्षाही जास्त आकर्षक रोषणाईने बंगला व समोरील लॉन उजळून गेलं होतं, ” हॅप्पी बर्थडे देविका ” चे फुगे ..त्या रंगी बेरंगी रीबिन्स…. छान छान टोप्या, कार्टून ची सजावट आणि टेपवर वाजत असलेली गाणी यामुळे वातावरणात मोठी रंगत निर्माण झाली होती …. लॉन वरील सजवलेल्या टेबलवर ठेवलेला भला मोठा केक …..आजच्या उत्सव मूर्ती च्या म्हणजे ” देविका ” च्या प्रतीक्षेत होता . एखाद्या परिकथेतील राजकुमारी प्रमाणे सजलेली देविका हातात चाकू घेऊन केक कापण्यासाठी सज्ज होती… तेव्हढ्यात एका मिनी बस मधून ” उमंग ” या अनाथालयातील तिच्या पंधरा वीस समवयस्क मित्र मैत्रिणींची ” टोळी ” या पार्टी साठी आली आणि वातावरणात एकच जल्लोष सुरू झाला . देविका च्या चेहऱ्यावर हळूच एक छान हास्य उमटलं…सगळी बालगोपाळ मंडळी तिला गराडा घालून उभी राहिली आता .. केक कापला की पार्टी सुरू…पण अजून ही कोणाची तरी प्रतीक्षा होती. देविका ची नजर कोणाला तरी शोधत होती.. आणि तेव्हढ्यात तिच्या चेहऱ्यावर सुंदर हसू उमटलं आणि खुशीत येत ” पप्पा ! पप्पा ” म्हणत ती समोरून आलेल्या ‘ कुलदीप ‘ ला जाऊन बिलगली कुलदीप ने देखील तिला जवळ घेत नेहमी प्रमाणे गालगुच्चे घेतले आणि तिला उचलून केकच्या टेबल जवळ घेऊन आला .. सोबतच कुणाल, संदीप आणि बंटी हे त्याचे मित्र देखील होते. आता मात्र केक कापला जाईल या अपेक्षेने पुन्हा सगळी बच्चे कंपनी तिच्या भोवती जमा झाली ..पण अजून ही कोणी तरी येणं बाकी होतं.
” पप्पा ! मम्मी कुठाय? … ” शोधक नजरेने इकडे तिकडे पहात देविका ने विचारणा केली ! त्यावर हळूच स्मित करत कुलदीप ने बंगल्याच्या दाराकडे बोट दाखवलं ….. स्वतः च्या साडीचा पायात येणारा पदर एका हाताने सावरत ‘ मालविका ‘ येत होती ! अखेर लाडक्या ” मम्मी आणि पप्पांच्या ” मध्ये उभ रहात देविका ने केक कापला आणि वातावरणात एकच जल्लोष सुरू झाला… … मुलांनी गाणी …डान्स सुरू केला..आणि या सगळ्या गदारोळात नेहमी प्रमाणे कुलदीप च मन पुन्हा एकदा त्या एक जानेवारीच्या पहाटे च्या प्रहरात पोहोचलं…मालविका च्या डोक्याजवळ असलेल्या मॉनिटर वर चे बिंदू आणि त्या लाईफ लाईन सुरळीत झाल्या आणि ती आता या संकटातून सुखरूप बाहेर पडली ..आणि कुलदीपचा जीव ही भांड्यात पडला ! आता निर्धास्त पणाने घरी जाऊ या विचारात तो होता पण अजून ही नियती च्या मनात मात्र काही वेगळंच होतं.. मालविका हळू हळू शुध्दीवर येत असतानाच तिकडे तिच्या वडिलांच्या ह्रदयाची धडधड थांबली आणि त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली ! या विचित्र संकटात सापडलेल्या मालविका व तीच्या आईच्या दुःखाला आता पारावार उरला नाही ! आणि कळत न कळत या संकटातून त्यांना आधार देत देत कुलदीप चे त्या माय लेकींशी अनोखे ऋणानुबंध जुळले गेले . पुढे स्वतः च्या आई वडिलांचा विरोध सहन करत कुलदीप ने मालविका सोबतचे हे बंध लग्नाच्या गाठीत बांधून अधिकच घट्ट केले ! पण नशीब अजून ही परीक्षा पाहतच होतं…
लग्न झाल्यावर काही काळातच .त्यांना जाणीव झाली की.. त्या रात्री झालेल्या अपघाताने मालविका चा मातृत्वा चा हक्क हिरावून घेतला होता ! आणि हे दुःख …वेदना त्या दोघांसाठी त्या अपघाता ची तीव्रता कैक पटींनी वाढविणारं होतं ! पण कुलदीप ने अखेर त्यांच्या संसारातील ही उणीव भरून काढण्यासाठी सिमल्याच्या ” उमंग ” या संस्थेतून दिड वर्षाच्या ‘ देविका ‘ ला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला व सगळे ..या सगळ्या वातावरणा पासून दूर … सिमल्याला स्थायिक झाले आणि त्या दिवसा पासून या तिघांच्या जगात आजच्या या वाढ दिवसाच्या कार्यक्रमा सारखाच आनंद निर्माण झाला होता . इकडे तिकडे पहात हळूच कुलदीप ने डोळ्यावरील चष्मा काढला व खिशातून रुमाल काढून डोळे व चष्मा दोन्ही पुसले …. समोर सगळ्या मुलात मुल होऊन बागडणाऱ्या ‘ मालविका ‘ आणि ‘ देविका ‘ या त्याच्या दोन्ही लाईफ लाईन ‘ त्याला अधिकच स्पष्ट दिसू लागल्या होत्या.
Leave a Reply