प्री सी ट्रेनिंग झाल्यावर पहिल्याच जहाजावर जाण्यासाठी पहिल्यांदाच विमानात बसायला मिळाले होते. पहिल्याच वेळेस तीन विमाने बदलून जहाजावर काम करण्याकरिता पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. तेव्हापासून आजपर्यंत वर्षातून सरासरी कमीत कमी आठ विमानातून प्रवास घडू लागला. प्रत्येक वेळी जहाज ज्या पोर्ट मध्ये असेल तेथील लहान मोठ्या शहरात कनेक्टिंग फ्लाईट असल्याने येताना किंवा जाताना कमीत कमी दोन विमानं बदलायलाच लागतात.
पहिल्या वेळेस विमानात बसताना जी भिती होती ती अजूनही तशीच असते. विमान बिघडले आणि अचानक खाली पडले तर, तीस पस्तीस हजार फूट उंचीवरून उडत असताना बहुतेक वेळा विमानात झोपच लागत नाही. टेक ऑफ घेतल्यापासून लँडिंग होईपर्यंत नुसती धाकधूक त्यात नॅशनल जिओग्राफी चॅनेल वर एअर क्रॅश इन्वेस्टीगेशन कार्यक्रम बघत राहिल्याने विमान अपघातातील भयानकता आणि वास्तव बघून अजूनच धास्ती वाढते. ऐरोफ्लोट या रशियन विमान कंपनीच्या इस्तंबूल ते मॉस्को या प्रवासात जरा जुने विमान मिळाले होते. विमानात येणारा आवाज ऐकून आणि व्हायब्रेशन्स बघून मॉस्को ते दिल्ली फ्लाईट पकडायला जिवंत पोचतोय की नाही अशी शंका मॉस्कोला उतरेपर्यंत होती. सोबत असणाऱ्या चीफ ऑफिसरने एयर होस्टेस कडून परस्पर माझ्यासाठी व्हिस्कीचा पेग मागून घेतला , स्वतःचा आणि मला घ्यायला लावलेला असे दोन पेग लावून त्याने मस्त ताणून दिली होती. पुढे मॉस्को ते दिल्लीचे त्याच कंपनीचे विमान जरा सुस्थितीत आणि नवेकोरे असल्याने टेन्शन कमी झाले होते. पुढे मग दिल्लीत उतरून इमिग्रेशन आणि लगेज कलेक्ट करून एअर इंडियाची दिल्ली मुंबई फ्लाईट पकडून इस्तंबूल ते मुंबई व्हाया मॉस्को आणि दिल्ली असा उलटा सुलटा प्रवास एकदाचा पूर्ण केला होता.
विमानात लाईफ जॅकेट असतात पण विमानाने इमर्जन्सी मध्ये समुद्रात किंवा पाण्यावर कसबस लँडिंग केले तर त्याचा उपयोग. इतर वेळी इमर्जन्सी मध्ये लाईफची गॅरंटी काय म्हणून समजायची. जहाजावर कितीही वादळ आले किंवा हवामान खराब असले तरी जीवाची भिती वाटत नाही. प्रत्येक जहाजावर एक किंवा दोन लाईफ बोट असतातच. प्रत्येकाच्या केबिन मध्ये प्रत्येकासाठी एक लाईफ जॅकेट असते, ज्याला एक शिट्टी आणि फ्लॅशिंग लाईट असते. ही लाईट समुद्राचे पाणी लागले की आपोआप चालू होते.
लाईफ बोट दोन प्रकारच्या असतात फ्री फॉल आणि डेव्हीट लाँच टाईप. इमर्जन्सीमध्ये मग जहाजावर लागलेली आग असो किंवा जहाज बुडत असेल अशा परिस्थितीत कॅप्टन अबँन्डड शिप म्हणून घोषणा करतो आणि सगळे जण जाऊन लाईफ बोट मध्ये बसतात. लाईफ बोट खराब हवामानात हलू नये, खाली पडू नये म्हणून जहाजावर विशिष्ट पद्धतीने हुक आणि सेफ्टी सिस्टिम लावून अडकवून ठेवलेली असते.
लाईफ बोट मध्ये बसण्यापूर्वी प्रत्येकजण त्याच्या पूर्व निर्देशित ड्युटी प्रमाणे सेफ्टी सिस्टिम आणि हुक काढून बसतात. सगळे आत बसल्यावर कॅप्टन किंवा अजून एखादा जवाबदार अधिकारी लाईफ बोट मधून काढावा लागणारा शेवटचा हुक काढतो ज्यामुळे लाईफ बोट जहाजावरुन पाण्यात उतरवली जाते. फ्री फॉल लाईफ बोट पाण्यात उतरवली जात नाही, ही जहाजाच्या सगळ्यात मागील भागात असते. तिचा हुक आतून रिलीज केला की सुमारे चाळीस फुटांवरून जहाजावरील संपूर्ण क्रू सह ती खाली पाण्यात पडते. सगळ्यांसह उंचावरून पडून पाण्यात डुबकी मारून पुन्हा वर यावी अशी तिची रचना असते. सगळे दरवाजे आणि खिडक्या बंद असल्याशिवाय ही लाईफ बोट रिलीज करता येत नाही. डेव्हिट लाँच वाल्या लाईफ बोट जहाजाच्या दोन्ही पोर्ट आणि स्टारबोर्ड बाजूला असतात. जहाजाच्या बाहेर येऊन त्या वायर रोप म्हणजे लोखंडी दोरांनी बांधलेल्या असतात, वायर रोप एका ड्रम वर गुंडाळलेले असतात ज्याला एक ब्रेक असतो. सगळे जण लाईफ बोट मध्ये बसल्यावर हा ब्रेक लाईफ बोट मधून एका वायर च्या साहाय्याने ओढला जातो आणि मग लाईफ बोट हळू हळू खाली पाण्यात उतरवली जाते. ऑइल टँकर जहाजावर लाईफ बोट बंद स्वरूपाच्या असतात ज्यांच्यावर समुद्रात जहाज बुडताना पाण्यावर तरंगणाऱ्या ऑइल ला आग लागली तरी लाईफ बोट वर पाण्याचा फवारा मारून आगीच्या बाहेर निघण्यासाठी वॉटर स्प्रिंकलर यंत्रणा असते.
प्रत्येक महिन्यात लाईफ बोट ड्रिल म्हणजेच इमर्जन्सी मध्ये लाईफ बोट खरोखर वापरायची वेळ आलीय अशी संभावित परिस्थिती निर्माण करून त्याप्रमाणे वागण्याचा सराव करायला लागतो. प्रत्येक तीन महिन्यातून एकदा लाईफ बोट पाण्यात उतरवून तिची ट्रायल घ्यावी लागते. प्रत्येक शनिवारी लाईफ बोटचे इंजिन सुरु करून व्यवस्थित चालते की नाही ते बघावे लागते. लाईफ बोट मध्ये सगळ्यांना काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा तसेच खाण्याचे सामान आहे की नाही, मुदतबाह्य आहे की कसे ते पण तपासावे लागते. लाईफ बोट मध्ये असणारी इंधनाची टाकी भरलेली आहे, गियर ऑइल, इंजिन ऑइल आणि सर्व लाईट चालू आहेत की नाही हे सगळं तपासावे लागते. बिघाड झाला तर टूल बॉक्स, जहाज बुडाल्यावर मदत मिळेपर्यंत वेळ जावा आणि बोट मधील राशन संपल्यावर खायला म्हणून मासे पकडायचे हुक, इंधन संपल्यावर बोट वलव्हवण्यासाठी लाकडाच्या फळ्या किंवा वल्हव, टॉर्च, सर्च लाईट, ईशारा म्हणून रात्री आकाशात जाणारे रॉकेट आणि लाईट फ्लेअर्स असा सगळा साठा लाईफ बोट मध्ये आधीच करून ठेवलेला असतो त्यामुळे इमर्जन्सी मध्ये कोणी हे घ्यायला विसरला किंवा सापडले नाही अशी वेळ येऊ नये म्हणून. लाईफ बोट इंजिन चालू करण्यासाठी कमीत कमी दोन यंत्रणा असतात, बॅटरी द्वारे, हायड्रोलीक स्टार्टर किंवा हाताने हॅन्डल मारून अशा कोणत्याही दोन प्रकारे चालू करता येण्याची व्यवस्था असते. लांबून दिसायला शक्य होण्यासाठी लाईफ जॅकेट सह लाईफ बोट चा रंग गडद तांबडा असतो ज्यामुळे सर्च आणि रेस्क्यू करणाऱ्यांना त्याचा उपयोग होतो.
शिपिंग इंडस्ट्रीचे एक भयानक वास्तव हेही आहे की, लाईफ बोट मुळे आपत्कालीन परिस्थिती किंवा इमर्जन्सी मध्ये जेवढे जीव वाचवले गेले नसतील त्यापेक्षा जास्त खलाशांचे लाईफ बोटचे रुटीन टेस्टिंग किंवा ट्रायल घेताना झालेल्या अपघातात आजवर प्राण गेलेले आहेत.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर.
B.E.(mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply