नवीन लेखन...

जीवनवाहिनी एक्सप्रेस (LifeLine Express)

भारतीय रेल्वेवरील जीवनवाहिनी एक्सप्रेस म्हणजेच रुळांवर चालणारं एक फिरतं रुग्णालय. अशी गाडी सुरू करण्याचा पहिला मान भारताकडे आहे. १९९१ सालात खलारी या बिहारमधील गावापासून ही सेवा सुरू झाली व गेली २४ वर्षे तिच्या मार्गावरील, भारताच्या कानाकोपऱ्यांतील छोट्या गावांपर्यंत ही गाडी जात असते.

चार डब्यांची संपूर्ण हॉस्पिटल असलेली ही गाडी साधारणपणे २५ दिवस भारताच्या दुर्गम प्रदेशात जाते, तिथे आरोग्य सेवा पुरविते. या गाडीत ५ ऑपरेशन टेबल्स, ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णांना झोपण्यासाठी उत्तम बेडस्ची सोय व औषधपेढी अशा सोयी आहेत. छाती व पोटाची छोटी-मोठी शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, कानाच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया, दातांची देखभाल, हाडाच्या शस्त्रक्रिया, या एक्सप्रेसमध्ये पार पाडतात. डॉक्टर व नर्सेस यांची जेवणा-खाण्याची, राहण्याची सोय उत्तम असते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने ६०० मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया, जवळजवळ ६०० ते ७०० रुग्णांना चाकाच्या खुर्च्या व कुबड्या यांचं वाटप व २४ दिवसांच्या एका कँपमध्ये ७००० रुग्णांना वैद्यकीय उपचार, हे ‘जीवन वाहिनी’त मोफत केलं गेलं. हे बहुमोलाचं काम ‘इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशन’च्या वतीनं अखंड चालू आहे. गेल्या २४ वर्षांच्या कालावधीत १ लाखाच्यावर शस्त्रक्रिया आणि ९ लाखांच्यावर रुग्णांना औषधं व इतर उपयुक्त वस्तू मोफत मिळालेल्या आहेत.

आज संपूर्ण भारतभर फिरणारी ही एकमेव गाडी आहे. भारताच्या अनेक राज्यांनी आपल्याकरता अशा स्वतंत्र गाडीची मागणी केलेली आहे, पण दुर्दैवाने पैशांबाबत ठोस पावलं कोणीच उचलत नसल्यामुळे ती योजना कागदावरच राहिली आहे.

चीन देशाने भारताची ही योजना उचलून धरली व अशा धर्तीवर त्यांच्या देशात ४ गाड्या सुरू आहेत, पण चीनमध्ये फक्त मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. याच धर्तीवर आफ्रिका व बांगला देशातही गाड्या सुरू केलेल्या आहेत. कंबोडियात नदी व कालवे यांत ‘फिरती बोट रुग्णालये’ बनविली गेलेली आहेत.

या योजनेमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डॉक्टरांनी नि:शुल्क सेवाही दिलेली आहे, पण या जीवनवाहिनी एक्सप्रेस उपक्रमाचा खर्च प्रचंड असल्यामुळे खाजगी कंपन्यांनी संयुक्त सामाजिक जबाबदारी (Corporate Social Responsibility) म्हणून आर्थिक भार उचलण्याची गरज आहे.

‘जीवनवाहिनी एक्सप्रेस’ हा भारतीय रेल्वेने आखलेला प्रकल्प जगाने वाखाणलेला आहे. त्या प्रकल्पाची वाढ निधीअभावी रखडणे ही देशासाठी कमीपणाची गोष्ट नाही काय?

-डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..