नवीन लेखन...

लिहावेसे वाटले म्हणून

परवा सहज विचार करत होतो, मोठे होता होता खरंच काय काय गमावलं आपण ?

नायिकेच्या वाढदिवशी, शार्क स्किनचा सुट किंवा ( गरीब असल्यास ) पांढरा धुवट शर्ट घालून, आपली नायिका ( सहसा ) खलनायकाच्या खांद्यावर हात टाकून नाचत असतानादेखिल विचलित व बेसूर न होणारा, मेहेबूबखानने आम्हाला वारशात दिलेला, पियानो छेडणारा धीरोदत्त नायक आम्ही गमावला.

अडीच तास पडदाभर चिवचिवाट करणारी, केसांचा फ्लॉवरपॉट केलेली, तंग पंजाबी ड्रेस घातलेली, नायकाच्या गुणांवर ” गंगाजल की तरह पवित्र ” प्रेम करणारी, शक्ती सामंता व नासीर हुसेन यांनी रुजवलेली नृत्यनिपुण नायिका आम्ही गमावली.

पहाता पहाता सीन खिशात टाकणारा, सहनायिकेच्या प्राप्तीची माफक अपेक्षा बाळगणारा, जॉनी वाँकर व मेहमूद यांच्यासारखा हरहुन्नरी व राजेंद्रनाथ व जगदीपसारखा आचरट विनोदवीर आम्ही गमावला.

दिवसाच्या कोणत्याही वेळी नाईटसुट घालून घरभर फिरणारा, बेकार नायकासमोर ब्लॅक चेक फेकून त्याची द्विधा मनस्थिती करणारा आणि कमवायची काडीची अक्कल नसलेल्या नायकासोबत प्रेमरंग उधळणाऱ्या मुलीला ” खानदान की इज्जत ” वाचवायला घराबाहेर काढायला न कचरणारा, मुराद व सप्रूसारखा कणखर बाप आम्ही गमावला.

नायकावर चोरुन प्रेम करणारी, सुब्रमण्यम स्वामींपेक्षाही जास्त रहस्ये पोटात दडवणारी, बिजलीसारखी थिरकणारी व बहुदा खलनायकाच्या गोळीला बळी पडणारी, बिंदु व हेलनसारखी अस्सल कॅब्रे डान्सर आम्ही गमावली.

डबल ब्रिस्टेड सुट घालणारा, हवाना सिगार पिणारा, केसांना पोमेड लावणारा आणि कृष्णकृत्य करतानादेखिल आपली खानदानी अदब न सोडणारा प्राण आणि अजितसारखा उच्चभ्रू खलनायकदेखील आम्ही गमावला.

दहा रुपयांच्या फाटक्या नोटेच्या भरवशावर, एका विजेरीच्या अंधुक प्रकाशात, वर्सोवा बिचवर, खुशाल पन्नास लाखाचे सोने सुधीर व मॅकमोहनच्या हवाली करणारे, सफेद कँप व गळ्यात तांबडा रुमाल बांधलेले बेदरकार दर्यावर्दी आम्ही गमावले.

घटनास्थळी उशीरा पोहोचणारे का होईना पण इफ्तिकार व जगदीश राजसारखे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व निस्पृह पोलिस अधिकारीसुद्धा आम्ही गमावले. अजून बरंच बरंच काही गमावलं आम्ही.

दादर चौपाटीच्या वाळूसारखे मुठीतून निसटून गेलेले, रुपेरी पडद्याला साक्षीला ठेऊन, स्वतःच्या घरापेक्षाही जास्त आपलेपणा वाटणाऱ्या अंधाऱ्या थिएटरमध्ये अनुभवलेले ते मंतरलेले क्षण आम्ही कायमचे गमावले.

– संदीप सामंत.

Avatar
About संदीप सामंत 10 Articles
संदीप सामंत हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक आहेत.

2 Comments on लिहावेसे वाटले म्हणून

  1. वाचायला आवडले म्हणुन असेच लिहीणे चालू ठेवा.
    सिनेजगतातील सुवर्णकाळातील अनेक सर्वस्पर्शी व्यक्तिरेंखाची पुन्हा आठवण दिल्या बद्दल लाख लाख शुक्रिया.

  2. सिनेमा सुरू झाल्यावर सेन्सॉर सर्टिफिकेटची पाटी डोळ्यासमोर यावी आणि पापणी लवताच दि एन्ड ची पाटी समोर यावी इतपत छोटा लेख झालाय. पण खुसखुशीत आणि खमंग झालाय हेही खरं.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..