नवीन लेखन...

मुंबईचा सिंह – फिरोजशहा मेरवानजी मेहता

फिरोजशहा मेरवानजी मेहता एल्फिन्स्टन कॉलेजमधून एम्.ए. होऊन इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले. तेथील चार वर्षांच्या वास्तव्यात त्यांच्यावर दादाभाई नौरोजींचा प्रभाव पडला. ते बॅरिस्टर होऊन १८६८ मध्ये हिंदुस्थानात आले आणि मुंबईस त्यांनी वकिली सुरू केली. १८६९ साली त्यांनी दादाभाईंच्या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा म्हणून बाँबे असोसिएशन मुंबईत सुरू केली. गोऱ्या लोकांच्या मिरासदारीविरुद्ध त्यांनी प्रभावी प्रचार केला.

सुरतच्या आंदोलनातून उद्भवलेल्या दंगल केसमध्ये आरोपींच्या वतीने समर्थपणे उभे राहून फिरोझशहांनी कीर्ती मिळविली. कित्येक प्रश्न हाती घेऊन त्यांनी वकिलीबरोबर राष्ट्रीय जागृतीचेही कार्य केले. १८७२ च्या मुंबई महानगरपालिका विधायक कायद्यावर फिरोझशहांच्या सूचनांची पूर्ण छाप होती. यामुळे त्यांना ‘मुंबईतील नागरी शासनाचे पिता’ हे सार्थ नाव मिळाले. त्यांना आयुक्त करण्यात आले (१८७३). १८७८ ते १८८० या तीन वर्षांत वृत्तपत्रांची गळचेपी करणारा व्हरॅ्नक्युलर प्रेस ॲक्ट आणि ब्रिटिश कापडाला हुकमी बाजारपेठ चालू राहावी, यासाठी आयातकरातून देण्यात आलेली सूट, या दोन प्रश्नांवर फिरोझशहांनी सनदशीर मार्गांचा अवलंब केला. इल्बर्ट बिलाला पाठिंबा देण्यासाठी फिरोझशहा आदी राष्ट्रवाद्यांनी गोऱ्यांविरुद्ध प्रतिआंदोलन उभारले.

फिरोझशहांची मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली (१८८४–८५). या पदावर १९०५ मध्ये त्यांची फेरनिवड झाली. बाँबे असोसिएशनचे बाँबे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये रूपांतर झाले (१८८५), त्यावेळी तिचे फिरोझशहा, न्यायमूर्ती तेलंग आणि दिनशा वाच्छा हे पहिले सरचिटणीस झाले. याच वर्षी मुंबईस भरलेल्या पहिल्या काँग्रेस अधिवेशनात फिरोझशहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिरिरीने भाग घेतला. त्यांची राष्ट्रीय नेत्यांमध्ये गणना होऊ लागली.

काँग्रेसच्या सहाव्या अधिवेशनासाठी फिरोझशहा मेहतांची अध्यक्षपदी निवड झाली (१८९०). तत्पूर्वी मुंबईच्या कायदेमंडळाचे ते सदस्य झाले होते (१८८६). पुढे ते इंपीरियल कौन्सिलचे सदस्य म्हणून निवडले गेले (१८९२).  तेथे त्यांनी शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी विविध उपाय सुचविले तसेच लष्करी व शासकीय खर्चात कपात करावी, यासाठी आग्रह धरला. कर्झनच्या युनिव्हर्सिटी बिलाला त्यांनी कडाडून विरोध केला. विश्वविद्यालये स्वायत्त असावीत, त्यांवर शासकीय दडपण असू नये, अशाही मागण्या केल्या.

इंपीरियल कौन्सिलमध्ये किंवा नंतर मुंबई कौन्सिलमध्ये फिरोझशहांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका समर्थपणे बजावली. १९०४ साली त्यांच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा पडली. यावेळी जहाल-मवाळ संघर्ष उग्र बनत चालला होता. शेवटी १९०७ मध्ये सूरत अधिवेशनाचे वेळी काँग्रेस दुभंगली आणि तिच्यावर मवाळांची पूर्ण पकड बसली.

स्वदेशीच्या प्रचारार्थ त्यांनी आणि तेलंगांनी स्वदेशी साबण कारखाना काढण्याचा उपक्रम केला. त्यांच्या पुढाकाराने सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाची स्थापना झाली (१९११). १९१३ मध्ये बाँबे क्रॉनिकल हे इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी मुंबईला सुरू केले. मुंबई महानगरपालिकेचे तर ते प्रथमपासून अनिभिषिक्त राजेच होते.

१९१५ साली मुंबई विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच वर्षी त्यांना विश्वविद्यालयाने एल्एल्.डी ही मानद पदवी देण्याचे ठरविले. त्यांच्या प्रयत्नाने १९१५ चे काँग्रेस अधिवेशनही मुंबईत भरले. १८९४ मध्येच ब्रिटिश सरकारने त्यांना सी. आय. ई. हा किताब दिला. तेव्हापासून ते सर फिरोझशहा म्हणून विख्यात झाले.

जन्म : ४ ऑगस्ट, १८४५

मृत्यू : ५ नोव्हेंबर १९१५

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..