आपल्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवताना, थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन, योग्य शिक्षण आणि अनुभवाची शिदोरी उपयुक्त पडते. त्याला विपुल वाचनाची जोड असेल तर यशाचे मार्ग अधिक सुखकर होतात. बहुधा रुपेरी-चंदेरी पडद्यावर वावरणार्या जगातील अनेक कलाकारांनी याचा अनुभव सुद्धा घेतला असेल. कारण कोणतीही भूमिका साकारायची असेल तर त्यासाठी अभ्यास ही महत्वपूर्ण ठरतो. तरच व्यक्तिरेखेला न्याय ही मिळतो. पण विविध विषयांवर साहित्याचं वाचन या पलिकडेही जाऊन अनेक कलाकार असे ही आहेत ज्यांनी स्वत: लेखणीच्या माध्यमातून अनेक वाङमयीन प्रांतात मुशाफिरी करत स्वत: मधील एका साहित्यिकाला सजग करुन समृध्द ही केलं आहे. मराठी कलाकारांची यादी तर यामध्ये खूपच मोठी आहे. बर्याचशा कलाकारांनी स्वत:चे आत्मचरित्र तसेच चित्रपट, नाटकांमधील अनुभव अनेक पुस्तकांमधून शब्दबद्ध केले आहेत. यामुळे निश्चितच काही प्रमाणात मराठी साहित्य विश्वात मोलाची भर पडली आहे.
महत्वाच्या कलाकारांचा उल्लेख करायचा म्हटला तर महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचं नाव अगदी अग्रक्रमावर राहील. कारण पुलंनी जसे अनेक एकपात्री प्रयोग केले तसे मराठी चित्रपटांमध्येही ते अभिनेत्याच्या भूमिकेत वावरताना दिसले.
ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि अभिनयाच्या कलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजेच दिलीप प्रभावळकर. त्यांचं साहित्य कृतींवर असलेलं प्रेम हे आपल्याला वेळोवेळी दिसून आलेलं आहे. म्हणून त्यांची बरीचशी नाटकं आपल्याला पुस्तकाच्या रुपात वाचायला मिळतात. यामध्ये ”बोक्या सातबंडे”, ”झुम”, ”कागदी बाणा”, ”हसगत”, ”गुगली”, ”हसवाफसवी” तर बालदोस्तांसाठी ”बालनाटिका आणि एकपात्रिका” सारखी पुस्तकं खुपच लोकप्रिय आणि वाङमयाचा उत्कृष्ट नमुना ठरली आहेत.
पर्यटनाची प्रचंड आवड असलेले मॉडेल, अभिनेते मिलिंद गुणाजींनी आपले अनुभव तसेच योग्य आणि माहितीपूर्ण विवेचन ”भटकंती”, ”माझी मुलुखगिरी”, ”गुढरम्य महाराष्ट्र”, ”चंदेरी भटकंती”, ”ऑफ बीट ट्रॅक इन महाराष्ट्र”, ”चला माझ्या गोव्याला” यासारख्या पुस्तकांमधून वाचकांपर्यंत आणले. यामध्ये महाराष्ट्रातील ट्रेकिंग स्पॉट्स्, गडकिल्ले, जंगलं, डोंगर-दर्या, लहान पाड्यांपासून ते मेट्रो शहरांवर केलेलं भाष्य अगदी हुबेहुबपणे डोळ्यासमोर तरळते. प्रवास वर्णनरुपी साहित्याची ही निर्मिती अनेक ठिकाणी भ्रमंती करणार्या मराठी माणसाला फायदेशीर ठरते.
१९८० आणि ९० व्या दशकातलं लोकप्रिय आणि नावाजलेली कलाकार म्हणजे प्रिया तेंडुलकर. प्रसिध्द साहित्यिक विजय तेंडुलकरांची ही कन्या मुळातच साहित्याचा वारसा आणि त्यासाठीचं प्रेम घेऊन अगदी अखेरच्या श्वासापर्यंत वावरली. कारण लहानपणापासूनच प्रिया तेंडुलकर यांना सतत काहीतरी लिहितं राहाण्याचं बाळकडू हे वडिलांकडूनच मिळालं. अनेक प्रकारे विविधपूर्ण विषयांची मांडणी नियतकालिक तसेच मासिकांमधून प्रियाजींनी केली तर ”असंही” हा ललितबंध, ”जावे तिच्या वंशा”, ”ज्याचा त्याचा प्रश्न”, ”जन्मलेल्या प्रत्येकाला” आणि ”पंचतारांकित” यासारख्या कथासंग्रहाला ‘महाराष्ट्र साहित्य पुरस्कार’, ‘दमाणी पुरस्कार’ मिळाले. प्रिया तेंडुलकर यांच्या कथांचा कानडी अनुवादही झाला. वास्तवपूर्ण आणि कल्पनेच्या पुसट रेषा प्रिया तेंडुलकरांच्या लेखनातनं हमखास जाणवायच्या.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अतुल कुलकर्णी यांनी पुस्तक विश्वाची ओळख आणि त्याच्याशी निगडीत अशा वैशिष्ठ्यपूर्ण वाङमयाचा परिचय करुन देणार्या, दूरचित्रवाणी वाहिनीवरील एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुद्धा केलं होतं. मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने महाविद्यालयीन जीवनापासून स्वत:तल्या कलाकाराला घडवण्यासाठी लेखनाचा पुरेपूर उपयोग केला. तिच्या स्तंभलेखनातून तिच्याकडे असलेलं शब्दसंपदेचं भांडार आपल्यासमोर उलगडलं जायचं.
याशिवाय ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम यांनी सौमित्र या टोपणनावानं कवितांची सुरेल बांधणी करत रसिक मनांवर आणि साहित्य प्रेमींवर जादुई शब्दांचा ठसा उमटवला.
अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटांतून अभिनय करत पुढे पुर्णत: साहित्यासाठी समर्पित केलेल्या गुरु ठाकुरची कारकिर्द आणि योगदानही कौतुकास्पद आणि दैदिप्यमान असंच आहे.
उल्लेख करता येतील असे अनेक नामवंत कलाकार मंडळी मराठी मनोरंजन विश्वाला लाभले ज्यांनी मराठी वाङमय कृतीचं अक्षरश: सोनं केलं. नवोदिल कलाकारांची संख्याही कमी नाही, बरं का !
एक गोष्ट तर नक्की, ज्या भाषेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिकतेचा समृध्द वारसा लाभलाय, अगदी सृजनशैली ज्यात दडली आहे, अशातच कलाकाराच्या आशयपूर्ण शब्दातून जेव्हा त्याची प्रतिभा समोर येते त्यालाच म्हणतात लालित्याचा अजरामर आविष्कार.
— सागर मालाडकर
Leave a Reply