जगावर कोसळलेले हे कोरोना महामारीचे संकट इतके भयंकर आहे, की अजून सहा महिन्यांनीच काय आठपंधरा दिवसांनी सुद्धा काय परिस्थिती असणार आहे हे कोणीच सांगू शकणार नाहिये! अजून किती दिवस हा लाॅकडाऊन चालू राहिल तेही कोणी सांगू शकणार नाही. जोपर्यंत त्यावरचे रामबाण औषध वा लस सापडत नाही तोवर हा विळखा असाच रहाणार आहे!
जेंव्हा कधी हे संकट दूर होईल तेंव्हा जग फारच बदललेले असेल! अर्थात आत्ता त्याची कल्पना पण आपण करू शकणार नाही. एवढे निश्चित की ह्याचा परिणाम साहित्य जगावरही होईल, पण माझ्यामते तो तात्पुरता फार तर एकदोन वर्षापर्यंतच राहिल, कारण,
“Public memory is short”
जेंव्हा जग ह्यातून बाहेर पडेल तेंव्हा लोक हे सगळे विसरून पुन्हा उत्साहाने आपापल्या कामाला लागतील, जगरहाटी सुरू होईल .अर्थात हे आवश्यक पण आहे, कारण जग कधीही कोणासाठीही थांबत नाही! पण कित्येकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत, आपले नातेवाईक गमावले आहेत त्यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, अश्यांकडे चांगल्या वाईट अनुभवांचा साठा असेल, त्याचा वापर काही संवेदनशील लेखक नक्कीच करतील .
ह्यानंतर येणाऱ्या आर्थिक संकटावर आधारीत काल्पनिक , सत्य ,अर्धसत्य अश्या अनेक कहाण्या लिहल्या जातील. ह्याच विषयावर सायंटीफिक फिक्शन पूर्वी पण लिहिली गेली आहेत. जगभरात अश्या साहित्याची लाटच येईल! जैविक शस्त्रास्त्रे हा विषय फार गुंतागुंतीचा आहे.त्याला अनेक कंगोरे आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय असे अनेक रंग आहेत ह्याला! बऱ्याच जणांचे म्हणणे आहे की कोरोना हा सुद्धा मानव निर्मित जैविक शस्त्रच आहे. त्यामुळे हा मध्यवर्ती विषय घेऊन बऱ्याच कथा कादंबऱ्या लिहल्या जातील.एवढेच नव्हे तर कविता , चारोळ्याही लिहल्या जातील!
खरतर हा विषय पुर्वी पण साहित्यात आलेला आहे व त्यावर आधारीत अनेक सिनेमे, सिरीअल्स पण आल्या आहेत , पण तेंव्हा ते सगळे काल्पनिक वाटत होते, पण आता ते खरच जेंव्हा प्रत्यक्षात आलेय तेंव्हा खुपच भितीदायक वाटतेय.
पण हा विषय सगळ्या साहित्यिकांना खुणावेल ह्यात संशय नाही.
आता सुद्धा सोशल मिडियावर रोजच त्याच्यावर लेख , कथा एवढच काय तर विनोदी साहित्य देखील प्रसिद्ध होतयं. ह्याला माणसांची विनोदबुद्धी म्हणायच का ह्या विषयाचं त्यांना गांभीर्य च कळत नाहीये म्हणायचे हा संशोधनातलं विषय होईल !
पण असं हे सगळं साहित्य अल्पजीवीच असते, काही मोजक्या लेखकांनी गांभिर्याने लिहलेल्या साहित्याचीच साहित्याच्या इतिहासांत नोंद केली जाईल , दखल घेतली जाईल.
पुर्वी देखील कित्येक नैसर्गिक अथवा मानव निर्मित संकटे पृथ्वीतलावर येऊन गेली आहेत. व प्रत्येक वेळी त्यावर आधारीत साहित्य निर्मिती झालेली आहे. पण हे कोरोनाचे संकट विश्वव्यापी आणि “न भुतो न भविष्यती” असेच आहे .
आपल्या अनुभवातून साहित्यनिर्मिती करणे हे फारच नैसर्गिक आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस “कोरोना” वरच्या साहित्याचा पूर येणार आहे.
प्रकाशन व्यवस्थेवर तर जसे e- साहित्य उपलब्ध व्हायला लागले तेंव्हापासूनच परिणाम व्हायलाच लागला होता, त्यामुळे ही जी साहित्य निर्मिती होईल त्याच्यामुळे काही फारसा फरक पडणार नाही, आता लोकांना प्रत्यक्ष पुस्तकापेक्षा ही e -पुस्तके वाचण्याचा सराव झालेलाच आहे.
वाचनालयांची अवस्था सुद्धा पुर्वी इतकी चांगली नाहीच आहे. लोकांना पुस्तके घेऊन वाचण्या इतका वेळ नाहीये आणि आवड सुद्धा राहिली नाहीये. ॲाडिओ बुक्स ऐकणे ही पुस्तकांची कमीतकमी वेळात आवड जोपासण्याचा राजमार्ग आहे. आणि आता ह्या संकटातून बाहेर पडल्यावर माणसाला सावरायला खुप वेळ लागणार आहे. आर्थिक घडी नीट बसवणे ह्याला सगळ्यांचे प्राधान्य राहील. ह्याचा पुस्तक प्रकाशन व्यवसायावर आणि त्या अनुषंगाने वाचनालयांवर निश्चितच परिणाम होईल
पण माझ्या मते ह्या दिवसात अफवा पसरवणारे लिखाण न करता सगळ्यांनी खरोखरच संयमित लेखन करण्याची गरज आहे!!
रेवती कुलकर्णी ,
बंगळुरू
Leave a Reply