नवीन लेखन...

लिव्ह इन रिलेशनशिप आणि भारतीय विवाह संस्था

भारत देश हा विविधतेने नटलेले राष्ट्र आहे. इथे जवळपास ८ पेक्षा जास्त प्रमुख धर्माचे लोक गुण्यागोविंदाने शेकडो वर्षापासून नांदत आलेले आहेत. तब्बल २२ पेक्षा जास्त भाषा बोलले जाणारे जगातील एकमेव राष्ट्र म्हणजे भारत. हे राष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये बाकीच्या राष्ट्रांपेक्षा हटके आणि सदैव एक पाऊल पुढे असते. भारत हे ‘सांस्कृतिक माहेर’ म्हणून जगभरात ख्यातनाम आहे. इथली संस्कृती आणि इथल्या लोकांचे राहणीमान, खाद्यसंस्कृती आणि इतर अनेक गोष्टी प्राचीन काळापासून परकीयांना आपल्याकडे आकर्षित करीत आलेले आहे. म्हणूनच फ्रेंच, डच्च, पोर्तुगीज, मुघल, कुतुबशाही, आदिलशाही आणि इंग्रज असे अनेक परकीयांनी व्यापाराचे निमित्त करून या मातीत पाऊल टाकले होते हे आपण जाणतोच.

इथे प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती, वस्त्र परिधान करण्याची पद्धती दुसऱ्या राज्यांपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. उत्खननाद्वारे समोर आलेली २५०० वर्षांपूर्वीची याच मातीतील सिंधू संस्कृती हि भारतीय सांस्कृतिक वारस्याची एक सशक्त प्रतिनिधी समजली जाते. ती संस्कृती भुयारी गटार बांधणीपासून ते व्यापार, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक या सर्व गोष्टींमध्ये “सर्वगुणसंपन्न” होती हे उत्खननामध्ये हाती लागलेल्या अवशेषांवरून कळून येते.

भारतीय संस्कृतिक वारसा इथे साजरा केल्या जाणाऱ्या विविध धर्मांच्या विविध सणांवरून उठून दिसते. इतकेच नव्हे तर इथली विवाह पद्धतीसुद्धा जगासमोर एक आदर्श ठरते. विवाह म्हणजे फक्त पुरुष आणि स्त्रीमधील संबंध नसून दोन वेगवेगळ्या वातावरणात जन्मलेले, वाढलेले कुटुंबाचं एक अद्भुत मिलन आहे. मागच्या पिढींपर्यंतचा विवाह आपण पाहिलो तर लग्नाच्या अगोदर वर आणि वधु एकमेकांशी बोलायचं तर लांबच, एकमेकांना पाहतसुद्धा नव्हते. पण काळ आता वेगाने बदलत चाललंय. आणि इथले पद्धतीही काळानुसार या बदलांमध्ये साहिभागी होत आहेत.

हिंदू संस्कृतीला हजारो वर्षांचा वारसा लाभलेला आहे. या हजारो वर्षांच्या प्रवासात या संस्कृतीमध्ये अनेक विकास आणि बदल होणे भागच होते. या विकासाचाच एक भाग म्हणून ‘विवाह संस्कृती’कडे आपण पाहू शकतो. माणूस जोपर्यंत एका ठिकाणी स्थिर होत नाही तोपर्यंत तो स्वतःमध्ये विकास किंवा बदल घडवून आणू शकत नाही. हि ‘स्थिरता’ फक्त प्रेम आणि विश्वासावर बांधल्या जाणाऱ्या मानवी बंधामुळेच शक्य आहे. लग्न किंवा विवाह हे एक असे बंधन आहे की जे आदर्श समाज बांधणीचा मूळ गाभा ठरते.

विवाह संस्थेच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण इतिहासाच्या पानांना चाळतो तेव्हा आपल्या लक्षात येते की विवाह संस्थेची सुरुवात वैदिक काळापासून झालेली आहे. वैदिक काळात अविवाहित माणसाला अपवित्र समजले जायचे आणि त्याला कुठल्याही धार्मिक विधींमध्ये भाग घेण्यास मनाई असे. त्या काळात लग्नाशिवाय मानवी जीवन अपूर्ण समजले जात असे. आजही घरात विविध शुभकार्यप्रसंगी पती आणि पत्नी दोघे एकत्रित बसून पूजा करीत असतात. हा कदाचित याचाच परिणाम असेल. काही वेळेस पत्नीच्या अनुपस्थितीत पतीच्या बाजूला विडा(पत्नीचे स्वरूप म्हणून) ठेऊन ते धार्मिक विधी संपन्न केले जाते. हि प्रथा आपण आजही न चुकता पाळतो. हे बाब आपल्याला मानवी जीवनात विवाहाला असलेले महत्व पटवून देते.

सध्याची भारतीय पिढी पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत वाढत आहे आणि त्या संस्कृतीच्या आहारी जात आहे. परकीय संस्कृतीच्या पावलांवर पाऊल टाकत असताना आपली पिढी अनेक वेळा अपयशी ठरताना दिसते आहे.

पूर्वी योग्य ‘वर किंवा वधु’ शोधण्याची संपूर्ण जवाबदारी मुलाच्या किंवा मुलीच्या आई-वडिलांवर असे. ‘बदल हा काळाचा नियम आहे’ असे म्हंटले जाते. त्याचप्रमाणे जसे परकीय संस्कृतीचा इथल्या संस्कृतीवर होत असलेले आक्रमण वाढत आहे आणि त्याच्या परिणाम इथल्या विवाह संस्थेवर सुद्धा होत आहे.

आधुनिक धावपळीच्या जीवनामध्ये वर शोधणे, लग्न करणे आणि त्यानंतरचे विविध विधी संपन्न करून मग आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करण्याइतकी सहनशीलता आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही. यांचं कस ‘चट मंगनी पट शादी’ असं आहे. मोठमोठ्या आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या पिढीचा हा ‘अनुकरण प्रवास’ ‘डिंक’ संस्कृती म्हणजे ‘डबल इन्कम, नो चाईल्ड’पासून सुरुवात होऊन ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ला येऊन थांबली आहे. दोन अविवाहित व्यक्ती एकत्रित राहणे म्हणजेच ‘लिव्ह इन रिलेशनशिप’. असे एकत्र राहत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचे बंधन नसतात जे विवाहित पती आणि पत्नीला नसतात. हि कल्पना मागील काही दशकांपासून पाश्चिमात्य देशांमध्ये खूपच वेग धरलेली दिसून येते. याचा परिणाम भारतातील मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये जास्त आढळून येत आहे.

या सामाजिक बदलावर आधारित लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘लुका छुपी’ हा हिंदी चित्रपट नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला. हे चित्रपट स्वतःच्या अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करणाऱ्या युवा पिढीवर आधारित आहे. यातील नायक विनोद शुक्ला हा रश्मी त्रिवेदीच्या प्रेमात पडतो आणि आपल्या पतीला लग्नाआगोदार समजून घेण्याच्या हट्टापायी रश्मीच्या सांगण्यावरून ते दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहतात. हा सगळा खटाटोप करत असताना त्यांना अनेक ‘जुगाड’ करावे लागतात. शेवटी जेव्हा नायिकेला भारतीय विवाह संस्था, मंगळसूत्र, सिंधुर या सगळ्यांचे महत्व कळते तेव्हा ते पुन्हा भारतीय विवाह प्रथेनुसार विवाहबद्ध होतात.

आपण कितीही शिकलो, प्रगती केली तरी आपले मूळ आपल्या संस्कृतीशी जोडलेले असायला पाहिजे. असा एक संदेश या चित्रपटामधून मिळतो.

माणूस प्रत्येक परिकल्पनेचा स्वीकार आपल्या सोयीनुसार करीत असतो आणि मूळ परिकल्पनेच्या उद्दीष्टापासून भरकटत जातो. त्यानुसार आजची पिढी लग्नाशिवाय शारीरिक संबंध ठेवणे म्हणजेच लिव्ह इन रिलेशनशिप असा गैरसमज मनात ठेवून या परिकल्पनेचा ‘अंधानुकरण’ करत आहे.

प्रेम आणि लग्न हे दोन पवित्र कल्पना आहेत. हे माणसाला दैहिक आणि ऐहिक जगाच्या पालिकडील सुख देण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये बाळगतात. या दोन्ही गोष्टींकडे फक्त लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचे माध्यम म्हणून पहिले जाते.

राधा-कृष्ण, दुष्यांत- शकुंतला, रोमियो-जुलीयेट, सलीम-अनारकली जर मनामध्ये कामभावना ठेवून आपले संबंध प्रस्थापित केले असते तर कदाचित आज आपण त्यांच्याकडे प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिलो नसतो. प्रेमाने जग जिंकता येते. कारण मृत्यूनंतर अजरामर राहणारी एकमेव गोष्ट म्हणजे “प्रेम”.

— प्रा. कमलाकर रुगे
मो. नं. ७३८५८१४१७५

Avatar
About कमलाकर रुगे 6 Articles
मी सध्या इंग्रजी प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. आतापर्यंत माझे लेख दिव्य मराठी मध्ये प्रकाशित झालेले आहेत. मी ब्लॉग वर माझे लेख प्रकाशित करीत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..