मनमोहन यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण लोककवी मनमोहन या नावानेच ते महाराष्ट्रला माहीत आहेत. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९११ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव या गावी झाला.
शब्दांच्या गोडव्याने गीताला मधाळ करणारा हा कवी. सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जीभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गाणी आजही ऐकायला ताजीतवानी वाटतात. मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला हे त्यांचं अतिशय गाजलेलं गाणं आजही नववधूला लाजवते. मा.मनमोहन नातू यांनी लिहिलेले हे गीत, मा.वाटवे यांची चाल आणि शब्द.
‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला..’
नववधूला स्त्रीसुलभ भावनेमुळे मैत्रिणींच्या गराडय़ात पतीचे नाव घेताना वाटणारा लज्जायुक्त संकोच या गीतात आढळतो. ही संकोचाची भावना कवी मनमोहनांच्या शब्दांत पुरेपूर दिसून येते. या गीतातल्या नानाविध प्रश्नांतून ती अभिव्यक्त झाली आहे. ही नववधू शालीन आहे. सुसंस्कृत घरातली आहे. हे गाणे म्हणजे तिने मैत्रिणींशी केलेले हितगूजच आहे..
‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला नका विचारू स्वारी कशी?
दिसे कशी अन् हासे कशी?
कसं पाडलं मला फशी?
कशी जाहले राजीखुशी?
नजीक येता मुहूर्तवेळा, काय बोललो पहिल्या भेटी
कसे रंगले स्वप्न पहाटी? कशी रंगली लाली ओठी?
कसा जाहला जीव खुळा? मैत्रिणींनो..
अर्थ उलगडे समरसतेचा, सुटे उखाणा संसाराचा
छंद लागला मजला त्यांचा,
धुंद बने बुलबुल जिवाचा
घरी यायची झाली वेळां, मैत्रिणींनो..’
राधे तुझा सैल आंबाडा, बापूजींची प्राणज्योती… ह्या त्यांच्या गाजलेल्या रचना. अतिशय साधं रहाणीमान असलेला हा कवी आपल्या कवितेत मनातील प्रतिबिब उभं करत असे. ते लिहितात, राजकीय पुरुषांची कीर्ती, मुळीच मजला मत्सर नाही । आज हुमायुन बाबरापेक्षा, गलिब हृदये वेधित राही । युगायुगांचे सहप्रवासी, अफुच्या गोळ्या, उद्धार, शिवशिल्पांजली हे त्यांच्या नावावर असलेले काव्यसंग्रह. मा.मनमोहन यांचे पुस्तक वा पुस्तिकारूपाने प्रसिद्ध झालेले अनेक काव्यसंग्रह आहेत. त्यातले ‘ताई तेलीण’, ‘सुनीतगंगा’, ‘कॉलेजियन’, ‘शंखध्वनी’, ‘अफूच्या गोळ्या’, ‘दर्यातील खसखस’, ‘कुहू-कुहू’, ‘शिव शिल्पांजली’ हे संग्रह प्रसिद्ध आहेत. ‘दर्यातील खसखस’ या पुस्तकाचे प्रकाशक आर. बी. समुद्र लिहितात- ‘उदयोन्मुख कविपंचकात मनमोहन या तरुण व प्रतिभासंपन्न कवीचे स्थान फार वरचे आहे. आपल्या प्रखर बुद्धीने आणि विशिष्ट मनोवृत्तीने काव्यरचना करून त्यांनी प्रचलित काव्यपद्धतीला विजेचे धक्के दिले आहेत. त्यांच्याइतकी सुंदर प्रेमगीते मराठीत दुसऱ्या कोणत्याही कवीला लिहिता आली नाहीत.’ कवी ज. के. उपाध्ये यांना गुरुस्थानी मानणाऱ्या कवी मनमोहनांची कविता स्वतंत्र होती. त्यांच्या कविता तर उत्तम होत्याच; परंतु ध्वनिमुद्रिकांमधील भावगीतांतून त्यांना जास्त नाव मिळालं. वाटवे यांनी त्यांच्या काही कविता स्वरबद्ध केल्या आणि ती गाणी लोकप्रिय झाली. सर्व विषयांना आपल्या कवितेत स्पर्श करणारे लोककवी पत्नीच्या निधनानंतर आपल्या भावना शब्दबद्ध करताना म्हणतात. वृंदावनातील तुळस जळाली, मागे उरल्या दगडविटा, त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे,‘कलेवर कवीचे जाळू नका हो,जन्मभर तो जळतच होता. फुले तयावर माळू नका हो,जन्मभर होत फुलतच होता’ यात ते स्वतःबद्दलच्या भावना हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त करताना ते दिसतात. मनमोहन नातू यांचे ७ मे १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply