महाराष्ट्राची लोकधारा’चा पहिला कार्यक्रम मी पाहिला, तो चारुदत्त आफळेने टिळक स्मारक मंदिरात सादर केलेला. त्या कार्यक्रमात प्रवीण सूर्यवंशी नावाचा एक उत्साही कलाकार, वासुदेवाची भूमिका करायचा. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याच्याशी आमचा परिचय झाला.
एके दिवशी प्रवीण आमच्या ऑफिसवर आला. स्वभावाने तो अतिशय मनमोकळा आणि बोलण्यात विनम्रता असल्यामुळे अल्पावधीतच त्याच्याशी आमची मैत्री झाली. काही दिवसांनी त्याने त्याच्या नवीन कार्यक्रमाचे डिझाईन करायला दिले. जाहिरातीच्या मजकूरासोबत त्याने त्याच्या उजव्या कानावर भिकबाळी घातलेला, लाल फेट्यातील एक फोटो दिला. प्रत्येक जाहिरातीत, हॅण्डबिल, पोस्टरमध्ये तोच फोटो वापरल्यामुळे तो फोटो त्याच्या लोकधाराचा ‘ब्रॅण्ड’ झाला. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ अशाच नावाने तो कार्यक्रम करु लागला. गणेशोत्सव, नवरात्रीच्या सीझनमध्ये त्याला भरपूर कार्यक्रम मिळू लागले. अनेक वर्षांच्या अनुभवातून, त्याने या कलेच्या क्षेत्रात नाव कमावले. दरम्यान त्याचं लग्न झाले. पुण्यातील विविध संस्थांनी त्याच्या या योगदानाबद्दल त्याला वेळोवेळी पुरस्कार दिले.
प्रवीण, वेंकटेश्वरा हॅचेरीजमध्ये नोकरी करुन लोकधारेचे कार्यक्रम करीत होता. लोकधारेसाठी वीस पंचवीस कलाकारांना सांभाळून घ्यावे लागते. एखादा कलाकार, वादक आयत्यावेळी आला नाही तर तातडीने दुसऱ्याची व्यवस्था करावी लागते. या सगळ्या अडचणींना तोंड देत त्याने कार्यक्रम चालू ठेवले. एका गणेशोत्सवाचे निमित्ताने त्याने आमच्याकडून त्याने एक ब्रोशर करुन घेतले. त्या ब्रोशरमध्ये वासुदेव, पोतराज, वारकरी, मंदिर अशी चित्रं होती. साधारणपणे अशीच चित्रे लोकधारेसाठी वापरली जातात. त्याच वेळी मोरे नावाच्या निर्मात्याचेही लोकधारेचे ब्रोशर आम्ही केले. ही चित्रे दोन्ही ब्रोशरला वेगवेगळ्या प्रकारे वापरलेली होती. दोघांनाही तो जॉब दिल्यावर, प्रवीणने, मोरेंचे ब्रोशर पाहिल्यावर त्याला आमचा राग आला. त्याने आम्हाला माझी चित्रं, मोरेंसाठी का वापरली याचा जाब विचारला. आम्ही समजावून सांगूनही उपयोग झाला नाही. तो संतापला होता. त्यावर उपाय म्हणून मोरेंना आम्ही पुन्हा प्रवीणच्या चित्रांशिवाय केलेले नवीन ब्रोशर छापून दिले. या घटनेनंतर प्रवीणचे आमच्याकडे येणे कमी झाले. साततोटी चौकात त्यांच्या वडिलांचे दुकान होतं. तिथे तो एकदा भेटला होता. त्याचे कार्यक्रम अधूनमधून चालू असायचे.
महाराष्ट्राच्या लोकधारेचे सर्वात जास्त कार्यक्रम शाहीर दादा पासलकर यांनी केले होते. ‘रंग नवा, ढंग नवा’ या नावाने बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य रंगमंदिर इथे हे कार्यक्रम नेहमी हाऊसफुल्ल गर्दीत व्हायचे. महाराष्ट्राची लोकधारा करणारे इतरही निर्माते डिझाईन करुन घेण्यासाठी आमच्याकडे येत होते. त्यामध्ये रविंद्र चौधरी नावाचा एक शिक्षक होता. आपली शिक्षकाची नोकरी सांभाळून त्याने ‘लोकधारे’चे अनेक कार्यक्रम केले. त्याच्या मागणीनुसार त्याला स्टेजवरील सेटचे डिझाईन मी फ्लेक्स स्वरुपात करुन दिले.
विजय तावरे नावाचा एक हरहुन्नरी मित्र देखील ‘फुलोरा’ नावाने लोकधारेचे कार्यक्रम करीत असे. त्याच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण हे त्याने सादर केलेले समईनृत्य असायचे. हे नृत्य करतानाच तो जमिनीवर पडलेली नोट तोंडाने उचलत असे. त्याचीही डिझाईन, पोस्टर्स, हॅण्डबिल करुन दिली. अशाच प्रकारचा कार्यक्रम ज्येष्ठ गायिका दामिनी पवार करायच्या. त्यांच्याही कार्यक्रमाचं पोस्टर आम्ही केलं होतं. या कार्यक्रमांच्या निमित्ताने नवनवीन निर्माते, नृत्य दिग्दर्शक, कलाकार, गायक, वादक, संगीतकार यांच्याशी आमचा परिचय होत राहिला.
मुंबईतून चौरंग संस्थेतर्फे अशोक हांडे निर्मित व पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘मंगलगाणी दंगलगाणी’ हा कार्यक्रम लोकधारेचाच एक उत्कृष्ट आविष्कार होता. कितीही वेळा पाहिलं तरी पुन्हा पुन्हा पहावासा वाटणारा हा एकमेव कार्यक्रम होता! असाच मुंबईचा अजून एक प्रयोग होता, ‘मांगल्याचं लेणं’! या प्रयोगात महाराष्ट्रातील सर्व सणांचं व लोककलांचं सर्वोत्तम सादरीकरण केलेलं होतं. सिनेअभिनेत्री भारती पाटील ही प्रयोगाचं, खास आकर्षण होती.
अशाप्रकारे महाराष्ट्राच्या लोकधारेच्या कार्यक्रमाचे औत्सुक्य काही वर्षे टिकले. नंतर हळूहळू कमी झाले. कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षी थिएटर, उत्सव, यात्रा, उरुस बंदच होते. या वर्षी दुसऱ्या लाटेने पुन्हा ‘लॉकडाऊन’ झाले. त्यामुळे सगळे निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ घरात बसून आहेत. काही महिन्यांनंतर सर्वकाही पूर्वपदावर येईलही, मात्र ते पहायला प्रवीण सूर्यवंशी नाहीये, यांचं फार वाईट वाटतंय. काही महिन्यांपूर्वी प्रवीण या लोकधारेच्या रंगमंचावरुन कायमचा विंगेत निघून गेला.
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
२-६-२१.
Leave a Reply