नवीन लेखन...

लोककला आणि कलावंतांना राजाश्रयाचा प्रश्न..

जीवन ही एक कला आहे. मानवी जीवनात कला नसेल तर औदासिन्य , दैन्य असेल. कलाकार आपली कला जीव ओतून सादर करत असतो.रसिक त्यास प्रतिसाद देतात. रसिकांचा प्रतिसाद हा कलाकारांचा खरा आनंद असतो. कलाकाराच्या दृष्टीने कला हे त्याच्या जगण्याचे आणि इतरांना आदर्शवत जगवण्याचे माध्यम असते. चित्रकार रंगरेषांच्या, गायक आवाजाच्या, वादक वाद्यांच्या तर लेखक लेखनीच्या माध्यमातून आपली कला सादर करत असतो. कला त्याच्यासाठी जीव की प्राण असते. तो कलेत रमतो.कला जगतो.कला जोपासतो. कला परंपरेने आणि आवडीने त्याचबरोबर कौशल्याने साध्य होते. कलेच्या साधनेसाठी कठिण परिश्रमाची गरज असते.तरच ती अवगत होते.

लग्नकार्यात गायक गातात. वर्हाडीमंडळीचे मनोरंजन करतात. सनई ,चौघडा, बासरीबरोबर ढोल आणि बँडवादनही होते. किर्तनात पकवाज, टाळ, हार्मोनियम अशी वाद्ये असतात तर गायक , वादक , किर्तनकार सहभागी असतात. लोककलेतही तमाशामध्ये ढोलकीवादक, नृत्यकला, अभिनय कला असते. जागरण गोंधळामध्ये संबळ, ढोलकी , तुणतुणे या वाद्यांसह वाघ्या-मुरळी हे कलाकार असतात. देवीच्या मंदीरात आराधी आपली कला सादर करतात. कवड्याच्या माळा, ज्योत आणि एकासुरात लोकगीते म्हणणारी कलावंत मंडळी येथे असते.चित्रपट, नाटक यांतूनही कलाच आविष्कृत होते.त्याचबरोबर पोतराज, मसनजोगी, कुरमुडेवाले, नंदीबैलवाले यांचेसह असंख्य लोककला  जोपासणारे कलाकारच असतात. त्यांचे जीवनमान आज कसे आहे ? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जागतिकीकरणाच्या आणि आधुनिकतेच्या स्पर्धेच्या युगात नुसती भागंमभाग चालू आहे. रस्त्यावरचा डोंबार्याचा खेळ पाहण्यात कोणालाही रूची नाही. कलाकार जीव ओतून, मेहनतीने कलेचे सादरीकरण करत असतो. ज्याच्या कलेला समाजाचा आधार मिळाला तो कलावंत यशस्वी होतो. यश, प्रसिध्दीच्या जोरावर अर्थप्राप्ती होते. सिनेतारका , सिनेकलावंत यांच्यासाठी पायघड्या घातल्या जातात. टीआरपीवाढीसाठी चढाओढ लागते. झगमगाटी दुनिया असते.अशा कलाकारांचा वेगळा समुह होतो. आज लाखो कलावंत असे आहेत की कला सादरीकरणासाठी त्यांना संधी नाही.मंच नाही.जी व्यवस्था आहे ती कमकुवत आहे. आराधी, गोंधळी किंवा इतर लोककलावंताना चरितार्थ चालविण्याचे साधन त्यांचेकडे नसते. एकतर समाजाचा आधार संपुष्टात येत असताना उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने अनेक कलावंत खितपत पडलेले आहेत. तमाशातील वगामध्ये राजाचे पात्र करणारे कलावंत स्वतःच्या जीवनाचा तमाशा करून बसले आहेत!  कलेच्या माध्यमातून जे काही मिळते त्यातून उपजिवीका न भागल्याने कित्येक कलावंतांनी एकतर ती कला सोडून दिली किंवा स्वतः नैराश्याच्या गर्तेत गेलेले आहेत. काहींनी व्यसनाला जवळ केले आहे.

प्राचिन काळात कला जाणिवपुर्वक जोपासली जायची. राज्याच्या सांस्कृतिक वैभवात त्यामुळे भर पडायची. युग बदलले. यांत्रिकीकरणामुळे पोटाचेच प्रश्न निर्माण झाले.गतीमान युगात नवनवे शोध लागत गेले तसा लोककलेचा वारसा कमी होत गेला. पुढील पिढीत हे गुण उतरत नाही. त्यासाठी प्रयत्न झाले नाहीत अथवा कालौघात दुर्लक्षित झाले. त्यामुळे झाले काय की जी वैभवशाली परंपरा आपण निर्माण केली होती.जी बाब समाजाच्या जडणघडणीमध्ये खूप मोलाची भर टाकत होती. सुसंस्कृत समाजासाठी ज्याचा मोठा हातभार होता अशा कला लोप पावत चालल्या आहेत.  एकेकाळी रसिकजनांनी डोक्यावर घेतलेली कला नावापुरतीच राहीलेली आहे. जत्रा, यात्रा, उत्सव , बाजार असे समाजसमुहाचे उपक्रम कमी होत आहेत तसा या कलांची र्हासाकडे वाटचाल सुरू आहे. शिवकालात याच लोककलेने महत्वाची भूमिका बजावलेली आहे.तमाशा, पोवाडा, भजन किंवा कोणतीही लोककला असो आता समाजमान्यता कमी होतेय. राजमान्यतेच्या बाबतीतही तेच आहे. त्या कलावंतासमोर आज खूप अडचणी आहेत. त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील. किंवा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल ते सोडविण्यासाठी कुणालाही त्यात रस नाही.कितीतरी वृध्द कलावंत जर्जर आजाराने त्रस्त आहेत. त्यांना विमाकवच नाही कि सुरक्षाकवच नाही. जोपर्यंत कलावंताच्या अंगात रग आणि धग आहे तोपर्यंत धरपड करण्यातच त्याची कला संपते. सिनेमा,ऑडिशनच्या , चित्रपटात काम देण्याचा स्वप्नापायी कितीतरी कलाकाराची फसवणूक होऊन जीवन बरबाद झालेले आहे. त्यासाठी आज काहीतरी उपाययोजना करावीच लाजेल.. हजारो स्वप्न उराशी घेऊन आलेले तरूण कलाकार गैरमार्गास गेलेले आहेत. हे वास्तव स्वीकारण्यावाचुन पर्याय नाही.

वृध्द कलावंताना व्यवस्थेकडून मानधन मिळते . कितीतरी वर्षापासुन त्यात वाढ झालेली नाही. कितीतरी कलावंत अजुनही मानधनापासुन वंचित आहे. ‘क’ दर्जाच्या कलावंताला दरमहा दीड हजार इतके मानधन मिळते. ते त्याच्या उपजिविकेसाठी पुरते का ? निवड प्रक्रिया किती पारदर्शक होते हेही महत्वाचे असते. बँकेच्या दारात मानधनासाठी तासन् तास ताटकळत बसणार्या कलावंताला मिळणारी वागणूक आश्चर्यचकित करणारी आहे. तालुक्यातून दरवर्षी फक्त तीन चारच प्रस्तावाची शिफारस होते. यातून काही अडाणी दुर्गम भागातील लोककलावंत पुढे येत नाहीत किंवा त्यांच्या कलेचे मुल्यमापन करण्याचे कोणतेच परिमाण उपलब्ध नाही. संगणक क्रांतीमुळे या लोककला लोप पावत चालल्यात. तसे काही वृद्ध कलावंताचा तर मानधन न मिळताच मृत्यूही झालेला असतो.

लोककला असो की इतर कला असो ही जाणिवपुर्वक जोपासायला हवी. तिचे संगोपन, संवर्धन हे शासन आणि समाजव्यवस्थेने केले पाहिजे. सुसंस्कृत समाजासाठी ते गरजेचे आहे. कला, क्रिडा क्षेत्रात नैपुण्य मिळवार्या विद्यार्थ्यांसाठी पंचवीस गुण देण्याचा निर्णय असताना खूप मुलं त्यापासून वंचित राहतात किंवा ज्यांचे पालक सुशिक्षित आहेत अशांचीच दखल घेतली जाते. लोककला सादर करणार्या विद्यार्थ्यांचा या गुणवाढीसाठी काही उपयोग नाही. लोककला जतन झाल्या. तिचे संगोपन झाले तर समाजजीवनात  रस निर्माण होईल. मान्यताप्राप्त कलावंताच्या पाल्याला नोकरी आणि शिक्षणात सवलती देता येतील.

पुण्यनगरी
विठ्ठल जाधव
शिरूरकासार,जि.बीड
संपर्क-9421442995

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..