लोककलावंत प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांचा जन्म ५ जुलै १९७७ रोजी जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे, झाला.
गणेश चंदनशिवे यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयातुन बी ए केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी नाट्यशास्त्र पदवी प्राप्त केली. त्यांचा ऐच्छिक विषय होता लोककला साहित्य. तर ‘लोक रंगभूमीवरील तमाशा सादरीकरणाचं बदलतं स्वरूप: एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून त्यांनी पीएचडी मिळवली. अध्यापन एम जे कॉलेज ,जळगाव येथे नाट्यशास्त्र विभागात हंगामी सहाय्यक प्राध्यापक पदी त्यांची २००३ साली तर पुढच्या वर्षी के .एस. के. महाविद्यालय, बीड येथे नाट्यशास्त्र विभागात हंगामी सहाय्यक प्राध्यापक पदी त्यांची नियुक्ती झाली. जानेवारी २००६ पासून ते मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीत सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आणि आज ते विभाग प्रमुख पदी कार्यरत आहेत.
अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांनी शोध प्रबंध सादर केले आहेत. विविध कार्यशाळेत भाग घेतला आहे.
“स्वातंत्र्यपूर्व तमाशा रंगभूमी वाटचाल :एक चिकित्सक अभ्यास” हा संशोधन प्रकल्प त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सादर केला.भारत सरकारच्या नागपूर येथील दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रात “तमाशा वगनाट्य ” हा संशोधन प्रकल्प पूर्ण केला.२००८ साली झालेल्या अखिल भारतीय लोककला संमेलनात “संत साहित्यात महिलांचे योगदान ” राज्यस्तरीय संशोधन परिषद ,दयानंद महाविद्यालय ,लातूर येथे “लोककलेचे अंतरंग” हा शोधनिबंध, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात शोधनिबंध ,ऑगस्ट २०१२मध्ये अखिल भारतीय महिला लोककला संमेलनात “लोककलेत महिलांचे योगदान” हा शोध निबंध, एस पी विद्यापीठ, गुजरात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात भारतीय लोकनाट्य या विषयात शोधनिबंध , २०१४ साली गुजराती लोक साहित्य विभाग यांनी एन.एस. पटेल आर्ट्स कॉलेज आनंद गुजरात येथे आयोजित केलेल्या भारतीय लोकसाहित्य परिषदेत शोधनिबंध , आय. आय. ए .एस. सिमला आयोजित “मिथक एक अनुशीलन ” या विषयावर राष्ट्रीय शोधनिबंध, जून २०१६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत शोध निबंध , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नाट्यशास्त्र विभाग आयोजित राष्ट्रीय परिषदेत “फंडामेंटल हुक आर्ट्स ” या विषयावर शोध निबंध, ऑक्सफोर्ड विद्यापीठ ,लंडन येथे २०१६ साली “लोककलेच्या माध्यमातून आदिवासी जनजाती शिक्षणाचे महत्त्व” या विषयावर शोधनिबंध,त्याच वर्षी एन. आय. एस .एस .आणि लोक साहित्य संशोधन केंद्र ,भारत सरकार आयोजित आंतरशाखीय संस्कृती संशोधन परिषदेत शोधनिबंध, जानेवारी २०१८ मध्ये “तमाशा-एक रांगडा खेळ” डिंपल प्रकाशन ,मुंबई प्रकाशित हा संशोधन ग्रंथ ,संगीत नाटक अकादमी ,नवी दिल्ली आयोजित भक्ती समर्पण राष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर केला. आदिवासी रंग महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय परिषदेत “आदिवासी समाजाचे वर्तमान “या विषयावर २०१८ मध्ये शोध निबंध असं त्यांचं सातत्याने संशोधन कार्य सुरू आहे.
चंदनशिवे सर विविध विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर आहेत. मध्य प्रदेशातील हरिसिंग गौर विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विभागाच्या नाट्यशास्त्र विभाग सल्लागार समितीचे सदस्य, बोर्ड ऑफ स्टडीज, लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ सदस्य, सहाय्यक अधिष्ठाता परफॉर्मिंग अँड फाइन आर्ट्स मुंबई विद्यापीठ ,सल्लागार सदस्य ,मराठी भाषा समिती महाराष्ट्र शासन सदस्य म्हणून ते योगदान देत आहेत. अध्ययन, अध्यापन,संशोधन या बरोबरच त्यांचा व्यावसायिक सहभाग मोठा आहे. “गर्जा महाराष्ट्र माझा ” हा माहितीपट, “ढोलकीच्या तालावर ” हा ई .टीव्ही वाहिनी वर रियालिटी शो, मराठी जागर देवीचा – आयबीएन लोकमत , हसत खेळत सिरीयल, डीडी १०वर धिना धिन मुलाखत, अनुराग कश्यप दिग्दर्शित हिंदी चित्रपट शैतान मध्ये पिंट्याची हंडी फुटली हे गाणे,संजय लीला भंसाली दिग्दर्शित बाजीराव मस्तानी चित्रपटातील गाणे त्यांनी गायले आहे . बाळकडू, शौर्य, मस्का ,बया रुद्र या चित्रपटांसाठी पार्श्वगायन , हृदयनाथ चित्रपटासाठी गोंधळ गीत, शंकर महादेवन यांच्या समवेत अल्बम , झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांच्यासमवेत संगीत मैफल,तोफिक कुरेशी द फॉरेस्ट अल्बम मध्ये सहभाग, माननीय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय रंगमंच ऑलम्पिक मध्ये लाल किल्ल्यावर लोककला सादरीकरण, एबीपी माझा वाहिनीच्या माझा कट्टा या सदरात एक तासाची प्रकट मुलाखत,जय महाराष्ट्र वाहिनीवर मुलाखत, अस्सल पाहुणे- इरसाल नमुने या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेत प्रकट मुलाखत ,चला हवा येऊ द्या या झी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राची लोककला हा कार्यक्रम, भारत सरकारच्या संस्थेद्वारे संजारी फेस्टिवल मध्ये महाराष्ट्राच्या लोक परंपरेवर सांस्कृतिक कार्यक्रम असा त्यांचा आविष्कार आहे. विच्छा माझी पुरी करा, गाढवाचे लग्न ,तीन पैशाचा तमाशा, जांभूळ आख्यान ,खंडोबाचे लगीन ,गोष्ट अकलेची, पुढारी पाहिजे, गावची जत्रा पुढारी सतरा या मराठी लोक नाट्यात त्यांचा सहभाग राहिला आहे. ए. आय. यु .द्वारे जबलपूर येथे विनोदी अभिनय या कला प्रकारात सहभाग घेऊन त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तुळजापूर महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक पुरस्कार, राज्यस्तरीय कंटक सेवाभावी संस्था परभणी ,कलारत्न पुरस्कार , राज्यस्तरीय शाहू फुले आंबेडकर जयंती उत्सव समिती जाफराबादतर्फे समाजभूषण पुरस्कार ,भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पातळीवरील उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषद बोरीवली कलारंग पुरस्कार , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन पुणे द्वारा कलारत्न पुरस्कार, राज्यस्तरीय बालगंधर्व परिवार पुणे द्वारा लोक गंधर्व पुरस्कार, अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंती उत्सव समिती कल्याण द्वारा साहित्य रत्न पुरस्कार,एकता कल्चरल फाउंडेशनचा विठ्ठल उमप स्मृति लोकरंग पुरस्कार , यशवंत प्रतिष्ठान, अंबड जालना येथील राज्यस्तरीय यशवंत पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. स्वतःपुरतंच जगण्याच्या आजच्या काळात प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे लोक कला, लोक कलाकार यांच्या प्रगतीसाठी झटत आहेत,हे त्यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply