नवीन लेखन...

लोकशाहीर विठ्ठल उमप

विठ्ठल उमप यांचा जन्म १५ जुलै १९३१ रोजी मुंबईमधील नायगाव येथे झाला. उमप लहानपणापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. त्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांमध्ये लोकगीते आणि पदनाट्यांमार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होते.

१९८३ साली विठ्ठल उमप यांनी आयर्लंडमधील कॉर्क लोकोत्सव गाजविला होता.

लोकरंगभूमी, रंगभूमी, कव्वालीचे व्यासपीठ, काव्य संमेलने, रुपेरी पडदा, दूरचित्रवणीचा छोटा पडदा अशा अनेक माध्यमांमध्ये उमप यांचा सर्वत्र संचार होता. ‘आला कागुद कारभारणीचा’ ही लावणी, ‘ऐका मंडळी कान देऊनी तुम्हा सांगतो ठेचात कुडी आत्म्याचं भांडण झालं भारी जोरात’, ‘ भूक लागलीया पाठी कशासाठी पोटासाठी ‘, ‘ माझ्या आईचा गोंधळ ‘, ‘आईचा जोगवा ‘, ‘आरती श्रीगणेशा जगदीशा’, ‘ वादळ वारा तुफान येऊ द्या ‘, ‘ ये दादा आवर रे ‘, ‘ फाटकी नोट मना घेवाची नाय ‘, ‘ भाता मीठ नही टाक्या ‘ अशा वेगवेगळ्या लोकगीतांच्या गायनाने विठ्ठल उमप यांनी आपला स्वतंत्र ठसा लोकगीताच्या क्षेत्रात उमटविला. ‘ माझी मैना गावाकडं राह्यली ‘ या गाण्यानं तर अनेकांचे डोळे पाणावले. याशिवाय त्यांनी ‘माझी वाणी भीमाचरणी ‘, ‘ रंग शाहिरीचे ‘ अशी साहित्यनिर्मितीही केली आहे.

त्यांना राज्याचा सांस्कृतिक पुरस्कार इ.स. १९९६ साली मिळाला होता. इ.स. २००१ साली ‘ दलित मित्र पुरस्कार ‘ मिळाला होता. राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शाहिरी शिबिराचे ते चार वर्षे संचालक होते. शिवाय, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे सल्लागार, नभोवाणीचे परीक्षक अशा जबाबदाऱ्याही त्यांनी पेलल्या होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाशीही ते संबंधित होते.

विठ्ठल उमप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट) , विहीर , टिंग्या , गलगले निघाले , नटरंग, पायगुण , सुंबरान अशा ऐकून दहा चित्रपटांमधून त्यांनी कामे केली. त्याचप्रमाणे अबक, दुबक, तिबक , अरे संसार संसार , खंडोबाचं लगीन , जांभूळ आख्यान , दार उघड बया दार उघड , विठ्ठल रखुमाई या नाट्यकृतींमधून त्यांनी कामे केली तसेच त्यांचे प्रकाशित साहित्य जांभूळ आख्यान आणि फु बाई फु हे आत्मचरित्र आहे.

विठ्ठल उमप केवळ लोकगीत गायनापाशी थांबले नाहीत. त्यांनी लोकरंगभूमीसोबतच नागर रंगभूमीवर संचार ठेवला. ‘अरे रे संसार’, ‘अबक दुबक’, ‘विठो रखुमाय’, ‘खंडोबाचं लगीन’, ‘जांभुळाख्यान’ या चाकोरीबाहेरच्या नाटकांसोबतच ‘हैदोस ‘, ‘बुद्धम्‌ शरणम्‌’सारखी नाटके त्यांनी केली.

विठ्ठल उमप यांच्या नावावर एक हजाराहून अधिक लोकगीते आहेत. शाहिर उमप यांनी लोककलेच्या सर्वच कलाप्रकारांत लीलया संचार केला होता. त्यात पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी असे अस्सल मऱ्हाटमोळी कलाप्रकार होतेच परंतु कव्वाली आणि गझल गायनांतही ते आघाडीवर होते. ” उमाळा ‘ हा त्यांचा गझलसंग्रहही प्रसिद्ध आहे. आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले. त्यांनी सतत आपल्या गाण्यांतून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. ‘अबक, दुबक, तिबक’, ‘अरे संसार संसार’, ‘ खंडोबाचं लगीन ‘ आणि ‘ जांभूळ आख्यान ‘ ही त्यांची काही अविस्मरणीय नाटके आहेत.

अलीकडच्या काळात विहीर, टिंग्या या चित्रपटांमध्येही विठ्ठल उमप यांनी छोटेखानी भूमिका साकारल्या. लवकरच प्रदर्शित होणा-या गजेंद्र अहिरे यांच्या ‘सुंबरान’ या चित्रपटातही त्यांची भूमिका आहे. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातूनही त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडतं.

शाहीर विठ्ठल उमप यांच्याबद्दल खूप काही लिहिण्यासारखे आहे कारण त्यांची लोककलेच्या प्रांतांमधील तपस्चर्या खूप प्रदीर्घ आहे.

नागपुर येथे २६ नोव्हेंबर २०१० रोजी दीक्षाभूमीजवळ एका दूरचित्रवाहिनीचं लाँचिंग विठ्ठल उमप यांच्या प्रमुख उपस्थितीत होत होतं. त्यावेळी गौतम बुद्धांच्या मूर्तीला शाहिरांनी वाकून प्रणाम केला आणि विराट जनसागरासमोर ‘ जय भीम ‘चा जोरदार नारा दिला. तेव्हाच चक्कर येऊन ते व्यासपीठावर कोसळले. हे दृश्य पाहून सगळ्यांच्याच काळजात धस्स झालं. शाहिरांना तातडीनं उपचारासाठी नेण्यात आलं, पण तोवर त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांचं हे आकस्मिक निधन सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलं.

संपूर्ण आयुष्य समाजासाठी जगलेल्या या शाहिरानं शेवटचा श्वासही एका सामाजिक कार्यक्रमातच घ्यावा, हा योगायोगच म्हणावा लागेल. आता त्यांची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांचे चिरंजीव यशस्वीपणे पुढे चालवत आहेत हे फार महत्वाचे आहे.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..