भारत सरकारने आयपीसी सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्ट मध्ये बदल करून स्वातंत्र्याचे स्वराज्यात रूपांतर करण्याची पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे.
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
नागरीकरुपी लोकशाहीच्या देवांनो, या लोकशाहीच्या यज्ञाने तुम्ही संतुष्ट व्हा आणि ही राज्यघटना तुम्हाला दिली त्याबदल्यात मला पसायदान द्या.
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
जे दादा भाई खंडणीखोर खून करणारे आणि करवणारे आहेत, त्या सर्वांना तुम्ही आयुष्यभर सत्कर्म करण्यासाठी पाठवून द्या, ती शक्ती तुम्हाला आता मिळालेली आहे. त्यामुळे सर्व जनता एकमेकांना मदत करीत आणि एकमेकांवर प्रेम करीत एकजीव होऊन राहील.
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
जे नागरीक लोकशाहीपासून दूर आहेत त्यांना लोकशाहीचे ज्ञान द्या आणि सर्वजण मिळून आपल्या कर्तुत्वसूर्याचे दर्शन घ्या. त्यामुळे सर्वांच्याच अपेक्षा आणि गरजा पूर्ण होऊन सर्वजण समाधानी होतील
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
हे एवढे केले तरीही तुम्ही सर्वजण मिळून येथे चिरकाळ टिकणाऱ्या मंगलमय लोकशाहीचे हस्तक म्हणून सदैव समरणात रहाल.
चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
सुंदर सुंदर कल्पना करून त्या प्रत्यक्षात उतरवणारे चालते बोलते कल्पतरू होण्याचे स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आता मिळालेले आहे, त्यामुळे तुम्ही चिंतामुक्त असाल आणि तुमचे विचार कल्याणकारी होतील ते विचारच तुमच्या वाणीतून बाहेर येतील तेव्हा अमृताचे समुद्र प्रकटल्याचेच अनुभवास येईल.
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
डाग रहित चंद्र आणि ताप रहित सूर्य यांच्याशीच तुलना होऊ शकणारे अत्यंत ज्ञानी आणि सज्जन लोक तुमचे नेते म्हणून तुम्ही निवडू शकाल, तेवढे ज्ञान आणि स्वातंत्र्य आता तुम्हाला मिळालेले आहे
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी, भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आपल्या आदीपुरुषापासून अखंडितपणे चाललेली आपली स्वराज्य आणि सुख मिळविण्याची धडपड आता पूर्ण करून घेणे तुमच्याच हातात आहे, स्वतंत्र आणि सुखी आयुष्याची किल्ली तुम्हाला आता मिळालेली आहे.
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥
या घटनारूपी ग्रंथातून मिळालेल्या आधिकारांमुळे आणि ताकतीमुळे, या विशेष लोकांत तुम्हाला दृश्य आणि अदृश्य संकटांवर सहजपणे मात करता येऊ शकेल.
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
येथे सर्व लोकांनी आम्ही हे पसायदान चिरकाळ देत राहू, हे वचन दिल्यामुळे ज्ञानदेव सुखी झाला आता आपण घटनाकारांना आणि माऊलींना दिलेले आपले वचन पाळण्याची योग्य वेळ आली आहे असे मला वाटते.
— विनय भालेराव.
Leave a Reply