
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक प्रसाद भिडे यांचा लेख…
एक काळ होता… जेव्हा दुरदर्शनवर ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्हीवर सायंकाळी साडेसात वाजता दिल्या जाणाऱ्या बातम्याही मोठ्या औत्स्युक्याने आणि विश्वासाने घराघरातून पाहिल्या जायच्या..
त्यावरच्या बातमीदारांना नावानिशी पक्के ओळखले जायचे.. त्यांची प्रत्येकाची ढब, शैलीचे कौतुक आणि अनुकरण केले जायचे.. मग त्या भक्ती बर्वे-इनामदार असोत वा रंजना पेठे… प्रदीप भिडे, अनंत भावे असोत वा विनायक देशपांडे… या सर्वांच्या बातम्या लक्षपुर्वक ऐकल्या जायच्या…
कदाचित या बातम्याही तत्कालीन शासननियंत्रित…. म्हणजे एडिटेड, सेन्सॉर्ड असतीलही… कोण जाणे… पण तरीही त्यातील विश्वासार्हतेचे एवढे अध:पतन झाले नव्हते जितके आजच्या प्रसारमाध्यमांच्या बाबतीत झालेले दिसत आहे.
साधारण 1983 नंतर राजीव गांधीच्या उदारीकरणाच्या धोरणानंतर सर्वच क्षेत्रात परकीय कंपन्या, माध्यमे यांचा शिरकाव झाला आणि त्याचबरोबर परकीय निधीचा बेसुमार ओघ सुरू झाला. पण त्याचबरोबर खुल्या अर्थव्यवस्थेमुळे स्पर्धाही प्रचंड वाढली.. आणि या स्पर्धेचा सगळ्यात घातक दृश्य परिणाम प्रामुख्याने चित्रपट वा सिनेसृष्टी आणि छोटा पडदा या दोन क्षेत्रात दिसू लागला.. एक भीषण गळेकापू चढाओढ आणि पर्यायाने काही प्रमाणात गुन्हेगारी, दादागिरीही सुरू या क्षेत्रात दिसू लागली..
याचेच पर्यवसान गुलशन कुमारांच्या हत्येपासून ते संगीतकार जयदेवच्या आत्महत्त्येपर्यंत दिसू लागले. यात असलेला प्रचंड नफा आणि ग्लॅमर यामुळे गुन्हेगारांचे लक्ष वळले नसते तरच नवल.. याचेच पर्यवसान दिव्या भारती, सुशांतसिंग यांसारख्या अनेक गुणी, होतकरू अभिनेते, अभिनेत्र्यांच्या नैराश्यपूर्ण आत्महत्त्येत दिसू लागले…
तर दुसरीकडे जनसामान्यांच्या जीवनात माहितीचा प्रमुख स्रोत म्हणून बातम्यांचे महत्त्व धूर्त, चतुर राजकारणी, गुन्हेगार आणि परदेशात राहून या देशात विघातक कार्य करू पहाणाऱ्या अतिरेकी गटांनी बरोबर हेरले आणि त्यानुसार आपल्या हिशोबाने जनमत तयार करण्यासाठी, भयगंड पसरवण्यासाठी, जाहिरातबाजी, स्टंट करण्यासाठी आणि दोन राज्य करणे सुकर जावे म्हणून दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी या चाणाक्ष पण देशद्रोही संघटना करत आल्या आहेत. त्यासाठी आखाती प्रदेशातील अनेक मुस्लीम अतिरेकी संघटना तसेच प्रगत राष्ट्रांतील बहुराष्ट्रीय कंपन्या हेतूत: आर्थिक लाभासाठी या प्रसार माध्यमांना मोठमोठे निधी पुरवून पुरस्कृत करू लागल्या.. आणि केवळ सवंग लोकप्रियता आणि हा मिळणारा वारेमाप पैसा यांच्या लोभापायी ही प्रसार माध्यमे विवेकबुद्धी, स्वाभिमान, नैतिकता, निष्ठा, समाजऋण या सर्वांना तिलांजली देत सर्रास खोट्या, अवास्तव, भडक, अतिरंजित बातम्या देऊ लागली आहेत.
बातम्या या केवळ माहितीचा स्रोत म्हणून त्याचे स्वरूप न राहता ज्ञान? आणि मुख्यत्वे मनोरंजनाचे साधन म्हणून लोकांसमोर येऊ लागल्या.. माहितीचा प्रसार सर्वदूर करण्यामागचा प्रमुख उद्देश हा लोकजागृती आणि ज्ञानवर्धन हा लोप पावून समाजात दुही पसरवणे.. आणि गुन्हेगारांचे, भ्रष्टाचाऱ्यांचे आणि सत्ताधींशांचे उदात्तीकरण आणि लांगूलचालन हेच जणू ध्येय बनले आहे.
हरामखोर एखाद्या पिडीत महिलेवर झालेल्या अत्याचारांचे… बलात्कारांचे डेमो? वारंवार स्क्रीनवर दाखवले जाऊ लागलेत.
एखाद्या तथाकथित डॉन, भाईची कृष्णकृत्ये महापुरुषांच्या चरित्राप्रमाणे सचित्र सादर करतात… एकीकडे भुकेकंगाल शेतकरी प्राणाला मुकताहेत… कष्टकरी, तळागाळातले श्रमिक आपल्या न्याय हक्कासाठी उन्हातान्हात भीक मागितल्याप्रमाणे शासनाकडे याचना करत आहेत आणि हे मिडियावाले गुंतलेत बेजबाबदार, बेधुंद अभिनेते आणि नेत्यांच्या समारंभांचे रसभरीत, मसालेदार वर्णन करण्यात… एखाद्या मंत्र्याच्या, नेत्याच्या मस्तवाल, बेताल लाडक्याचे / लाडकीच्या आचरटपणाचे कौतुक करण्यात मग्न आहेत.
समाजविघातक गुंड, डॉन यांची कृष्णकृत्ये तिखटमीठ लावून सादर करत त्यांची व्यक्तिचरित्रे नव्या पिढीला आदर्श म्हणून सादर केली जात आहेत. आणि सद्यस्थितीत नाकर्त्या राज्यकर्त्यांच्या सोयीसाठी रोज कुठल्या ना कुठल्या विषाणूप्रसाराच्या अवास्तव बातम्या आणि जुन्यापुराण्या क्लिप्स दाखवून जनतेत भयगंड निर्माण केला जात आहे जेणेकरून मेडिकल लॉबी, व्यापारी आणि राजकारणी यांची अभद्र युती सुरळीतपणे आपले इप्सित साधू शकेल.
आज बाहेरच्या शत्रूइतकीच समाजात राहून समाजविघातक कृत्यांना, एकसंधतेला आव्हान निर्माण करणाऱ्या या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवणाऱ्या प्रसार माध्यमांवर अंकुश ठेवण्याची नितांत आणि निकडीने गरज आहे आणि त्याहीपेक्षा या चॅनेल्सवर स्वत:ची विवेकबुद्धी गहाण ठेवून विश्वास ठेवणाऱ्या निर्बुद्ध, भरकटलेल्या जनतेला योग्य प्रबोधन करून मार्गावर आणून विचारशील बनविण्याची आवश्यकता आहे. अन्यथा सामाजिक, सांस्कृतिक आर्थिक आणि भौगोलिक सर्व दृष्टीने या भारतवर्षाचा ऱ्हास निश्चित आहे.
— प्रसाद भिडे
आमचे १००० Whatsapp ग्रुप आहेत आणि त्यावरून आम्ही कोणतेही खोटे खरे आहे हे पसरऊ शकतो हे भारताचे गृह मंत्री जाहीर पणे सांगतात.