पुरातन काळापासून
खांद्यावर ओझे वाहणे
हाच एककलमी कार्यक्रम
समाजातील सामान्यांसाठी !
त्यावेळी पालखीत बसलेले
मंदिरातील देव होते,
सरदार होते , दरकदार होते !
संत होते , महंत होते, पंडित होते !
आज सजलेल्या पालखीत
खासदार आहेत, आमदार आहेत ,
मंत्री आहेत , संत्री आहेत
त्यांचे काटेचमचेपळ्या आहेत !
ओझे वाहणारे भोई मात्र
तेच आहेत, समाजातील सामान्य
विवेक विकलेले, पिचलेले,
पिढ्यान पिढ्या जोपासलेला
खांद्यावरील जू व कासरा
स्वतःहून सांभाळणारे
ओझ्याचे बैल !
त्यावेळी चाबूक आणि
तलवारीच्या धाकात जगणारे
आज लाचार लोकशाहीच्या
व आभासी मतदानाच्या
खुळखुळ्याच्या नादाला
नादावले आहेत !
पळताहेत आपले ,
नेते म्हणतील तिकडे
पक्ष नेतील तिकडे !
आणि डोईतील वळवणाऱ्या
टोचणाऱ्या मेंदूचा विवेकीदाह
कमी होण्यासाठी किंचाळताहेत
बेंबीच्या देठापासून …..”जय हो !!”
राजवाड्यातील राजे होते ,
-आनंद बावणे.
१४ ऑगस्ट २०२३.
मोजक्या ओळीत लोकशाहीचे विदारक वर्णन केले आहे