नवीन लेखन...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

देशाच्या घटनेचे आणि प्रगतीचे,
एक प्रभावशाली शस्त्र म्हणजे,
वाङ्मय (साहित्य) हे होय…

                                आचार्य प्रल्हाद केशव अत्रे.

 

मराठी साहित्याचा इतिहास हा फार पुरातन आहे. मराठी साहित्याची नेमकी मुहूर्तमेढ कोणी आणि कशी रोवली याबद्दल नेमके कदाचित कोणीच सांगू शकणार नाही.

कधी कधी विचार करताना एक बाब जाणवते की मराठी साहित्याचा केवळ इतिहासच नव्हे तर त्याचा विस्तार देखील प्रदीर्घ आहे.

किती तरी संत, शाहीर, कवी, लेखक, नाटककार, कथाकार, यांनी आपापल्या परीने साहित्य समिधा अर्पण करून, हा सारस्वतांचा (सरस्वतीचे पुत्र किंवा कन्या) साहित्य यज्ञ नेहमीच चेतवत ठेवला आहे. फार मागे न जाता अगदी मागील शतकाचा जरी आढावा घेतला तरी त्यामध्ये देखील सारस्वतांची मांदियाळीच या महाराष्ट्रात होऊन गेलेली आढळते.

स्वातंत्र्य संग्राम असो किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, क्रांतीकारकांचे मनोबल वाढवण्याचे कार्य साहित्यीक मंडळींनी नेहमीच केलेले दिसते.

कोणतीही चळवळ जनमानसामध्ये घेऊन जाण्यासाठी जशी एखाद्या कुशल नेतृत्वाची आवश्यकता असते तशीच संवेदनशील साहित्यिकाची देखील आवश्यकता असते असे माझे स्पष्ट मत आहे. सर्व सामान्य जनतेच्या मनातील शल्य, त्यांचे प्रश्न समाजापुढे आग्रहाने मांडण्याचे महत्कार्य; एक झुंझार लेखणीचा साहित्यिकच करू शकतो असे मला वाटते. अश्याच झुंझार साहित्यिकांमधील एक अविस्मरणीय नाव म्हणजे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ” .

अण्णाभाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगांव (ता. वाळवा, जि. सांगली) येथे एका मातंग कुटुंबात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव तुकाराम होते असे म्हटले जाते परंतु ते अण्णाभाऊ या नावानेच सगळीकडे प्रसिद्ध झाले. वालुबाई साठे आणि भाऊराव साठे हे त्यांचे माता-पिता.

त्यांचा जन्म झाला तो काळ मातंग समाजाकरिता आर्थिक, सामाजिक, धार्मिक एवढेच नव्हे हरएक प्रकारे जिकिरीचा होता. त्यामुळे शालेय शिक्षण हा प्रकार अण्णांच्या वाट्याला फारसा आला नाही.

पण प्रतिभा ही शिक्षण, समाज, जात यांच्याशी बांधील नसते; त्यामुळे फारसे शिक्षण नसणाऱ्या अण्णाभाऊंनी आपल्या अभिजात प्रतिभेच्या जोरावर साहित्याचा महामेरू निर्माण केला.

अण्णाभाऊंनी आपल्या अंदाजे २५ वर्षाच्या साहित्यिक जीवनामध्ये; ३५ कादंबऱ्या, १३ कथा संग्रह, ८ प्रवासवर्णने,

१० लोकनाट्ये,  ३ नाटके, १५ हुन अधिक पोवाडे आणि लावण्या (अर्थात ही संख्या ढोबळमानाने दिलेली आहे ) ई कलाकृती निर्माण केल्या, जनमानसात रुजवल्या.

शोषित, पीडित, अन्यायग्रस्त समाजघटक हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा गाभा म्हणावा लागेल.

पण असे असूनही त्यांच्या साहित्यातील नायक किंवा नायिका ही उदास, निष्क्रिय, केविलवाणा, दयेची भीक मागणारा असा मुळीच नाही. तो नेहमीच लढाऊ वृत्तीचा, बाणेदार, नीतीवंत आणि न्यायप्रिय असाच आहे.

जग बदल घालुनी घाव । साांगून गेले मला भीमराव ।

गुलामगिरीच्या या चिखलात । रुतून बसला का ऐरावत

अंग झाडुनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।।

असे घाणाघाती, बंडखोर विचार हे त्यांच्या साहित्याचे वैशिठ्य म्हणावे लागेल.

वाचकांनी एक बाब लक्षात घ्यावी की अण्णाभाऊंचे साहित्य जरी बंडखोर वृत्तीचे असले तरी हे बंड न्याय्य हक्काच्या लढाईचे आहे. त्यात कोणाचाही द्वेष, नालस्ती नाही. आपल्या साहित्याची निर्मिती करत असताना त्यांचा प्रमुख कथाविषय असणारा उपेक्षित, शोषित वर्ग हा सूडाच्या चक्रात न अडकता, आपल्या उन्नतीच्या मार्गाकडे जाऊ शकेल याचे भान अण्णाभाऊंनी निश्चितच राखले होते.

वंचितांचे प्रश्न साहित्य माध्यमातून मांडताना तो समाज त्या साहित्यातून सकारात्मक असेच धडे घेऊन आपले संघर्षमय जीवन अंततः उन्नतीकडे कसे नेईल याची काळजी देखील त्यांनी घेतली होती. हेच त्यांच्या साहित्यातील मूल्य म्हणावे लागेल. त्यामुळेच आपल्या कथा कादंबऱ्यांतून चितारलेला नायक हा अन्यायाविरुद्ध लढणारा परंतु स्वतः कोणावरही अन्याय न करणारा असाच चितारारलेला आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यात जातीय विद्वेष, जातीय अभिनिवेश अश्या प्रकारांना कधीच जागा नव्हती. त्यांच्या साहित्याबद्दल लिहिताना श्री.अर्जुन डांगळे म्हणतात;

अण्णाभाऊ हे एका विशिष्ट जातीचे, जमातीचे वा समाजाचे नव्हते तर, ते जगातील कष्टकऱ्यांचे, पीडितांचे आणि शोषितांचे प्रतिनिधी होते. त्यांनी त्यांचे प्रतिनिधित्व निष्ठेने आणि मानाने केले. माझ्या सारख्या अनेक लेखक-कार्यकर्त्यांचे अण्णा भाऊ हे आदर्श आहेत. आम्हाला वंदनीय आहेत.

अण्णाभाऊंच्या कथांचे आणि एकंदरीतच लेखनशैलीचे वैशिट्य सांगताना वि.स.खांडेकर म्हणतात,

या लेखकाला प्रतिभेचं देणं आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हरएक तर्हेच्या गोष्टींचा अनुभव आहे. त्याच्या मनात एक प्रकारचा पीळ आहे आणि अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा तो पूजक आहे. अण्णाभाऊंच्या गोष्टीत विनोद नसतो असे नाही; पण त्यांचा प्रकृतिधर्म आहे गंभीर लेखकाचा!   सात पडद्यातून नव्हे तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं आहे, अश्या पोटतिडकीनं लिहिणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांच्यापाशी आहे. साहजिकच त्यांच्या गोष्टी वैशिट्यपूर्ण असतात. ग्रामीण कथाकार म्हणून अनेकांची नावे घेता येतील परंतु अण्णाभाऊ साठे यांची गोष्ट आणि तिचा ढंग त्या सर्वांपेक्षा वेगळा आहे.”

अण्णाभाऊंनी लावणी आणि पोवाडा हे दोन भिन्न रसातील साहित्यप्रकार अगदी लीलया हाताळलेले दिसतात. लावणी हा गीतप्रकार म्हटला की खरं तर शृंगारवर्णने असलेली, मादक अशी लावणी वाटते परंतु अण्णाभाऊंनी ” मुंबईची लावणी ” लिहून ही संकल्पना बदलून टाकली. या लावणी मध्ये मुंबईच्या कामगारांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. ते लिहितात,

मुंबई उंचावरी । मलबार शहर इंद्रपुरी । कुबेरांची वस्ती तिथं सुख भोगती ।।

परळात राहणारे । रातदिवस राबणारे । मिळेल ते खाउनी घाम गाळती ।।

अण्णाभाऊंनी पोवाडा, लावणी हे गीत प्रकार केवळ लोकरंजना करता नसून लोकप्रबोधना करताही उपयुक्त आहेत हेच यातून सिद्ध केले. तमाशातील वगनाट्याना लोकनाट्याचे नाव आणि रूप देऊन त्यातील फाजीलपणाला, प्रबोधनात्मक विचारांमध्ये परावर्तित करून लोकनाट्याना मानाचे स्थान मिळवून देणारे अण्णाभाऊ हेच होत. म्हणूनच त्यांना लोकनाट्याचे जनक म्हटले जाते.

अण्णाभाउंचा पिंड हा काही केवळ बंद खोलीत लेखन करून प्रबोधन करणारा चाकोरीबद्ध नव्हता.

ते कम्युनिस्ट विचार धारेचे कार्यकर्ते देखील होते. एवढेच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, शाहीर अमर शेख यांच्या बरोबरीने पोवाडे गाणारे कलावंत कार्यकर्ते देखील होते. शाहीर अमर शेख-अण्णाभाऊ साठे यांचे वीरश्रीयुक्त पोवाडे आणि आचार्य अत्रेंचे खणखणीत भाषण यांनी तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला धगधगते अग्निकुंडच बनवले होते. आचार्य अत्रें आणि अण्णाभाऊ साठे यांचे ऋणानुबंध चांगलेच होते कदाचित संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकत्रित काम केल्याने हे ऋणानुबंध जुळले असावेत आणि साहित्यिक या नात्याने ते अधिकच दृढ होत गेले असावेत.

माझ्या मनाला भावलेली आणाभाऊंची कादंबरी म्हणजे फकिरा; अर्थात या कादंबरीला १९६१ सालचा राज्यशासनाच्या उत्कृष्ठ कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आहे. फकिरा ही कादंबरी वारणाखोऱ्यातील राणुजी मांग याने आपल्या गावाच्या इभ्रतीसाठी दिलेले बलिदान आणि त्याच गावाच्या रक्षणासाठी राणुजीचा मुलगा फकिरा याने केलेला संघर्ष यावर आधारलेली आहे.

त्यातील सर्व पात्रे ही वेगवेगळ्या समाजघटकातील आहेत, गावाच्या मांग-महार तरुणांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ब्रिटिश सरकाराला धारेवर धरणारा विष्णुपंत कुलकर्णी, गावच्या याच तरुणांच्या रक्षणासाठी आपल्या नात्यातील रावसाहेबाशी झुंजणारा शंकरराव पाटील, खलप्रवृत्तीचा खोत, फकिराच्या सदैव पाठीशी उभा असणारा सावळा महार ही व अन्य पात्रे ही अगदीच काल्पनिक असावीत असे वाटत नाहीत. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये काम करत असताना; अण्णाभाऊंना कुठे ना कुठे तरी ही पात्रे भेटली असतील असेच वाटते.

विविध जाती जमातीच्या पात्रांची रेलचेल असणाऱ्या या कादंबरीमध्ये कुठेही जातीद्वेष किंवा जातिद्वेषमूलकता दिसत नाही. त्यामुळे माणसाचे चांगले वाईटपण त्याच्या जातीवर अवलंबून नसून त्याच्या विचारांवर अवलंबून असते हाच संदेश या कादंबरीतून पाहायला मिळतो. याच कादंबरीवर आधारित एक चित्रपट देखील त्याकाळी आला होता. त्यात सावळ्याची भूमिका स्वतः अण्णाभाऊंनी साकारली होती. तसेच या चित्रपटाची पटकथा आणि संवाद देखील त्यांनी लिहिले होते.

अण्णाभाऊंच्या कादंबरीवर आधारित साधारणपणे सात चित्रपट येऊन गेलेले आहेत, त्यामधील तीन चित्रपटांना राज्य शासनाचे पुरस्कारही मिळाले आहेत.

१९५८ साली अहमदनगर येथे झालेल्या पहिल्या महाराष्ट्र दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगीचे त्यांचे भाषण प्रचंड गाजले होते. त्यामध्ये ते म्हणतात,

नियोजित अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्यवाह आणि बंधू-भगिनींनो… आजच्या या दलित साहित्य संमेलनाचे उदघाटन माझ्यासारख्या दलिताने करावं हा एक अपूर्व असा योग असला तरी,  हे आचार्य अत्रे यांचे कार्य मी करत आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.”

याच भाषणात आमचे साहित्यिक कोण याबद्दल सांगताना ते म्हणतात,

आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्य हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या थोर परंपरेचा अभिमान आहे. कारण मराठी साहित्याची नांदी आमच्याच जीवनसंघर्षाने झाडली आहे. जेंव्हा दलितांची सावली असह्य होती तेंव्हा महानुभावपांथीय साहित्यिकांनी सर्वाना ज्ञान मिळालेच पाहिजे, ज्ञान हेच मोक्ष समजून ज्यांनी बंड केले ते आमचे साहित्यिक……. माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे असा दावा मांडून ज्यांनी दलितांच्या भाषेत महाराष्ट्राला सुंदर ज्ञानेश्वरी दिली ते आमचे साहित्यिक. आणि चुकलेले महाराचे पोर कडेवर घेऊन जाणारे ते एकनाथ ते आमचे साहित्यिक.

त्याचप्रमाणे दलित साहित्यिकांनी कसे साहित्य निर्मिले पाहिजे याबद्दल सांगताना ते म्हणतात,

शब्दांना नुसता आकार देणे सोपे असते पण त्या आकाराला आत्मा देणे अवघड असते. ते देखील काही लेखकाांना सहज साधून जाते. पण इतिहास परंपरा शोधणे आणि तिचा अर्थ लावणे फार कठीण असते. हा आचार्य अत्रेंचा खुलासा आम्ही दलित लेखकांनी समजून त्याचा अर्थ लावावा आणि  इतिहास परंपरा शोधण्याचा प्रयत्न करावा. आम्ही आपल्या वर्गाचे इमान पटवून त्याचा उपमर्द होणार नाही याची काळजी घेऊन त्याचे साहित्य निर्माण करूया. या दलिताचे जीवन सुखी आणि समृद्ध कसे होईल याची काळजी करूया या दलिताला आणि त्याच्या जीवनाला वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न आपल्या कलेतून करूया.

अण्णाभाऊंचे समाजप्रबोधन करणारे वेगळ्या पठडीचे साहित्य आजच्या पिढीला देखील तितकेच उपयुक्त आहे असेच मला वाटते. सध्याच्या पिढीमध्ये वाचन संस्कृतीचा आभाव दिसतो आहे, चांगले आणि उत्तम वाचण्याची वृत्तीच कमी होताना दिसते आहे, परंतु उत्तम काहीतरी निर्मिले पाहिजे, प्रबोधनात्मक लिहिलेच पाहिजे या अण्णाभाऊ साठेंच्याच विचाराला वाचकांपुढे ठेवताना; त्यांच्या साहित्याचे एका सुजाण विद्यार्थ्याच्या भूमिकेतून विवेचन कराणारा हा लेख अण्णाभाऊ साठे आणि समस्त साहित्यिकांना अर्पण करतो आणि थांबतो.

जाता जाता लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करताना एवढेच म्हणेन;

थाटण्या लेखन संसारा | राखण्या तुमची परंपरा ।।

बळ द्यावे साहित्यवीरा | करितो वंदन लोकशाहीरा ।।

टिप : या लेखासाठी आवश्यक संदर्भ;  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई द्वारे प्रकाशीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वाङ्मय या ग्रंथातून घेतली आहे.

— श्रीपाद श्रीकांत रामदासी

Avatar
About श्रीपाद श्रीकांत रामदासी 12 Articles
मी, श्रीपाद श्रीकांत रामदासी [ मेथवडेकर ], मूळचा सोलापूर येथील असून; इ. स. २००५ पासून, पुणे येथे वास्तव्यास आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. गेली काही वर्षे सोलापूर, संभाजी नगर, पुणे, आदी जिल्ह्यातून, छ. शिवराय, स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर, हिंदुत्व या विषयांवर व्याख्याने, भाषणे दिली आहेत; देत आहे. मराठीसृष्टी, प्रगतिपर्व अश्या नियतकालिकांतून विविध विषयांवर लेखन देखील करत असतो. डॉ. आंबेडकर आणि स्वा. सावरकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करत, विविध सामाजिक, राजकीय प्रश्नांवर भाष्य करणारे लेख सोशल मीडियावर, ब्लॉग वर लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न सुरु आहे. माझे आत्तापर्यंत ५५ हुन अधिक लेख विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाले असून ही संख्या १०१ पर्यंत नेण्याचा मानस आहे. व्याख्याने, लेखमाला, याकरिता आपण मला इ-मेल द्वारे संपर्क करू शकता. इ-मेल : shripad.ramdasi [ at ] outlook [ डॉट ] [ कॉम ] आमचे लेख, कविता याबद्दल आपला अभिप्राय अवश्य कळवावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..