नवीन लेखन...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर डोळय़ांसमोर आली तर, या चळवळीत योगदान दिलेले शाहीर त्यांच्या कर्तृत्वाने डोळय़ांसमोर उभे राहतात. शाहीर गवाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भराडकर, जंगम स्वामी, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर कृष्णकांत जाधव अशा अनेक लोककलावंतांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागवली.

कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे, सेनापती बापट यांच्या सभा सुरू होण्यापूर्वी शाहिरांचे डफ खणखणायचे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला नवे उधाण यायचे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज १८ जुलै रोजी स्मृतिदिन. या स्मृतिदिनी अण्णाभाऊंच्या कार्याची दखल घेणे आवश्यक आहे.

मराठी मातीत ‘लोकनाट्य` हा शब्द सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांनी रुजवला व वाढवला. अण्णाभाऊ हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रचारक होते. त्यांनी पक्ष प्रचारासाठी तमाशा रंगभूमीचे माध्यम निवडले. अण्णाभाऊंनी जी वगनाटय़े निवडली त्यांना तळागाळातील मजुरांचा, शेत मजुरांचा, कामगारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अण्णाभाऊंच्या या वगनाटय़ांना ‘नवे तमाशे` या नावाने एक नवी ओळख मिळाली.

मराठी साहित्य परंपरेत अण्णाभाऊंनी जवळजवळ सर्वच महत्त्वपूर्ण साहित्यप्रकार अत्यंत प्रभावीपणे हाताळले. कविता, लावण्या, शाहिरी, वग, लोकनाटय़ांपासून कथा, कादंबरी, प्रवास वर्णनात्मक लेखनापर्यंत आपला व्यापक ठसा उमटविला. त्यांनी आपल्या साहित्यातून निर्माण केलेले नायक विपन्नावस्थेत असूनसुद्धा लाचार ठरत नाही. तर अत्यंत दणकट जीवन व्यक्त करतात. जगण्यातील संघर्षाला मूल्यात्मक करतात. कारण असे म्हणतात की, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही, या म्हणीप्रमाणे अण्णाभाऊंनी पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकंती केलेली आहे. वयाच्या सतराव्या-अठराव्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आणि त्यांनी गिरणी कामगार म्हणून जीवन व्यतित करायला सुरुवात केली. मातंग समाजातील अण्णाभाऊ अठराविश्व दारिद्र्य घेऊन जन्माला आले.

मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णाभाऊंनी हमाल, बुटपॉलीशवाला, घरगडी, वेटर, डोअरकीपर, क़ुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळवणारा, उधारी वसूल करणारा अशी वेगवेगळय़ा प्रकारची कामे केली, यावरून अण्णाभाऊंचे जीवन किती कष्टमय होते याची आपल्याला प्रचिती येते. दीड दिवसाची शाळा शिकणारे अण्णाभाऊ, चित्रपटांच्या पाटय़ा आणि रस्त्यावरील दुकानाच्या बोर्डावरील अक्षरे जुळवीत. निरक्षर असलेले खर्‍या अर्थाने साक्षर आणि त्यातूनच त्यांना वाचनाची आवड लागली. वाटेगावमधील जीवन हे अतिशय कष्टमय जीवन अण्णाभाऊ जगले.

गिरणी कामगार म्हणून रुजू झाल्यानंतर मोर्चा, सभा-सत्याग्रह या सर्वांशी त्यांचा परिचय झाला. अचानक गेलेल्या नोकरीमुळे या सर्व गोष्टींवर पाणी सोडून पुन्हा वाटेगावात राहणे त्यांनी शक्य होत नव्हते. म्हणून त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या तमाशात प्रवेश केला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह गोवा मुक्तिसंग्रामाच्या वेळीही अण्णाभाऊंनी जनजागृतीची प्रचंड कामे केली.

अण्णाभाऊंची काही कवने अशाप्रकारे –

१) प्रथम मायभूच्या चरणा।
छत्रपती शिवना चरणा।
स्मरोनि गातो कवना।

२) जग बदल घालूनी घाव।
सांगून गेले मला भीमराव।
गुलामगिरीच्या या चिखलात।
रुतूनी बसला का ऐरावत।।
अंग झाडूनी निघ बाहेरी,
घे बिनी वरती धाव।
सांगून गेले मला भीमराव।।

३) पाहा बेटावर वस्ती बसविली चौभोवती
जशी रावणाची लंका
दुसरी कोणी कोणाला पुसती

४) मुंबई नगरी बडी बाका
जशी रावणाची दुसरी लंका
वाजतो डंका चहू मुलखी

५) मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी
कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती
परळात राहणारे रात दिवस राबणारे
मिळेल ते खाऊनिया घाम गाळती

६) माझी मैना गावाकडे राहिली
माझ्या जिवाची होतेया कायली

लौकिकार्थाने कोणतेही शिक्षण न घेता साहित्यक्षेत्रात जगप्रसिद्ध झालेले अण्णाभाऊ दुदैवी संघर्षामुळे खचत गेले. त्यांच्या शेवटच्या काळात महाराष्ट्र सरकारने त्यांना बरेच सहकार्य केले. मनाने खचलेल्या अण्णाभाऊंचे १८ जुलै १९६९ रोजी दुदैवी निधन झाले.

— डॉ.प्रकाश खांडगे

‘महान्यूज’ 
सोमवार, १८ जुलै, २०११

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..