आपल्याला सुपरिचित असणारा पोपट हा पक्षी संशोधकांच्या दृष्टीनं अनेक वैशिष्ट्यं बाळगून आहे. यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची उत्तम आकलनशक्ती. या उत्तम आकलनशक्तीमुळे पोपटांची आजूबाजूच्या परिस्थितीची समज, त्यांची बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाखाणण्याजोगी असते. पोपट एखाद्याच्या आवाजाची नक्कल करू शकतो, दिलेल्या सूचनांप्रमाणे हालचाली करू शकतो, तसंच चक्क काही कोडीही सोडवू शकतो. पोपटांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं दीर्घायुष्य. अनेक जातींचे पोपट हे तीस वर्षं सहज जगू शकतात. काही जातींचे पोपट तर पन्नाशी गाठतात. अपवादात्मक उदाहरणांत, काही पोपट ऐंशी-नव्वद वर्षं जगलेलेही संशोधकांना आढळले आहेत. पोपटांच्या या दीर्घायुष्याचं रहस्य कशात असावं, हा एक संशोधकांच्या उत्सुकतेचा प्रश्न आहे. ही उत्सुकता काही प्रमाणात शमवणारं उत्तर आता सापडलं आहे. हे उत्तर शोधलं आहे ते जर्मनीतल्या ‘मॅक्स प्लँक इंस्टिट्यूट ऑफ अॅनिमल बिहेविअर’ या संस्थेतील सायमिऑन स्मील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी. ‘दी रॉयल सोसायटी पब्लिशिंग – प्रोसिडिंग्ज बी’ या शोधपत्रिकेत, पोपटांच्या दीर्घायुष्यावरचं हे संशोधन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे.
आकलनशक्ती ही बऱ्याच प्रमाणात सजीवाच्या मेंदूच्या आकारावर अवलंबून असते. उत्तम आकलनशक्ती असलेल्या अनेक सजीवांच्या मेंदूचा आकार, त्यांच्या शरीराच्या तुलनेत मोठा असल्याचं, पूर्वीच माहीत झालं आहे. त्याचबरोबर उत्तम आकलनशक्ती असलेले अनेक सजीव दीर्घायुषी असल्याचंही आढळलं आहे. मात्र याला काही अपवादही आहेत. काही वेळा सजीवाचा आयुष्यकाळ हा त्यांच्या आकलनशक्ती व्यतिरिक्त, त्या सजीवाचा आहार, वास्तव्य, अशा इतर घटकांशी अधिक प्रमाणात संबंधित असल्याचं आढळतं. त्यामुळे मेंदूचा आकार आणि आयुष्यकाळ, यांत जरी संबंध दिसून आला असला, तरी तो अजूनपर्यंत खात्रीलायक स्वरूपात स्पष्ट झालेला नाही. पोपटासारख्या बुद्धिमान आणि दीर्घायुषी पक्ष्याच्या बाबतीत तर याचा तपशीलवार अभ्यास होण्याची गरज असूनही, हा अभ्यास फारसा झालेला नाही. सायमिऑन स्मील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र ही उणीव आता काहीशी भरून काढली आहे.
सायमिऑन स्मील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन दोन शक्यतांवर आधारलं आहे. त्यातल्या एका शक्यतेनुसार, पोपटांच्या दीर्घायुष्याचा संबंध त्यांच्या आकलनशक्तीशी असायला हवा. या शक्यतेनुसार जे पोपट हुशार आहेत, ते अधिक जगतात. कारण त्यांच्या हुशारीमुळे, ते प्रतिकूल परिस्थितीशी योग्यरीत्या जुळवून घेऊ शकतात. दुसऱ्या शक्यतेनुसार, मेंदूच्या वाढीच्या वेगाचा दीर्घायुष्याशी संबंध असू शकतो. पोपटांचा मेंदू मोठा असल्यानं, त्यांच्या मेंदूच्या वाढीला अधिक वेळ लागत असावा. यामुळे या शक्यतेनुसार, पोपटांना आपसूकच दीर्घायुष्य लाभत असावं. सायमिऑन स्मील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात या संदर्भात, पोपटांच्या विविध जातींची तुलना करण्याचं ठरवलं. यासाठी या संशोधकानी, एक हजाराहून अधिक प्राणिसंग्रहालयांद्वारे सव्वालाखांहून अधिक पोपटांची विविध प्रकारची माहिती गोळा केली.
आज जगभर पोपटांच्या सुमारे नव्वद प्रजातींतील जवळजवळ चारशे जाती अस्तित्वात आहेत. सायमिऑन स्मील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात, या चारशे जातींपैकी जवळजवळ अडीचशे जातींचा अभ्यास केला. यांत पोपटांच्या (आज अस्तित्वात असलेल्या) एकूण प्रजातींपैकी निम्म्याहून अधिक प्रजातींचा समावेश होता. या विविध जाती-प्रजातींत भरपूर वैविध्य होतं. सायमिऑन स्मील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासलेल्या जातींपैकी काही जाती या दोन वर्षांपेक्षा कमी जगणाऱ्या होत्या, तर काही जाती या पस्तीस वर्षांहून अधिक जगणाऱ्या होत्या. तसंच या जातींपैकी सर्वांत लहान आकाराच्या जातीतल्या पोपटाचं वजन हे अवघं बारा ग्रॅम होतं आणि सर्वांत मोठ्या आकाराच्या जातीच्या पोपटाचं वजन तीन किलोग्रॅम होतं. त्याचबरोबर या विविध जातींतील पोपटांच्या मेंदूंपैकी, सर्वांत लहान मेंदूचं वजन सुमारे एक ग्रॅम होतं, तर सर्वांत मोठ्या मेंदूचं वजन बावीस ग्रॅम होतं. (पक्ष्यांच्या मेंदूंची वजनं ही त्यांच्या कवटीच्या आकारमानावरून काढली जातात.)
या संशोधकांनी गोळा केलेल्या माहितीत, या विविध जातींचा अपेक्षित आयुष्यकाळ, शरीराचा आकार, मेंदूचा आकार, आहार, पावलांचा आकार, वास्तव्याचं ठिकाण, अशा विविध बाबींचा समावेश होता. ही माहिती संकलित केल्यानंतर, या संशोधकांनी विविध गणिती प्रारूपं वापरून या पोपटांच्या अपेक्षित आयुष्यकाळाची इतर घटकांशी सांगड घातली. या गणिती आणि संख्याशास्त्रीय विश्लेषणातून या पोपटांचं आयुष्य हे, इतर घटकांवर नव्हे तर त्यांच्या मेंदूच्या आकारावरच, अवलंबून असल्याचं स्पष्ट झालं! मोठ्या आकाराचा मेंदू असणाऱ्या पोपटांचं अपेक्षित आयुष्य हे दीर्घ होतं. शरीराच्या आकाराच्या तुलनेत मेंदूचा मोठा आकार हा आकलनशक्ती चांगली असल्याचं दर्शवतो. साहजिकच दीर्घायुष्य हे आकलनशक्तीशी निगडित असल्याचं या निरीक्षणांतून स्पष्ट झालं. मेंदूच्या वाढीला लागणाऱ्या काळाचा, आहाराचा, पोपटांच्या दीर्घायुष्याशी काहीच संबंध नसणं, ही या संशोधकांच्या दृष्टीनं एक आश्चर्याची गोष्ट होती.
पोपटांच्या आकलनशक्तीवर आधारलेल्या पूर्वीच्या संशोधनात पोपट आणि माणसाच्या मेंदूतील अनेक साम्यस्थळं स्पष्ट झाली होती. यांनुसार माणसाप्रमाणेच पोपटाच्या मेंदूचा आकारही, शरीराच्या आकाराच्या तुलनेत मोठा असतो. तसंच दोघांच्या मेंदूच्या पुढच्या भागात मज्जापेशींची संख्या मोठी असते. इतकंच नव्हे तर, दोघांच्या जनुकीय आराखड्यातल्या, मेंदूच्या विकासाशी संबंधित भागांतही मोठं साम्य दिसून आलं आहे. माणसाला जशी उत्तम आकलनशक्ती आणि दीर्घायुष्य मिळालं आहे, तसंच पोपटाच्या बाबतीतही उत्तम आकलनशक्ती आणि दीर्घायुष्य यांचा मिलाफ घडून आला आहे. मोठ्या मेंदूमुळे लाभलेल्या उत्तम आकलनशक्तीमुळे, पोपटाला प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणं, हे शक्य होतं. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याच्या या असाधारण क्षमतेमुळेच पोपटाला दीर्घायुष्य लाभलं आहे!
पोपटाच्या मेंदूच्या आकाराचा आणि दीर्घायुष्याचा संबंध स्पष्ट झाल्यानंतर, सायमिऑन स्मील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आता पोपटांच्या सामाजिक वर्तनाचाही या दीर्घायुष्याशी संबंध आहे का, ते शोधून काढायचं आहे. सायमिऑन स्मील यांच्या मते, “कदाचित मोठा मेंदू असणारे हे बुद्धिमान पक्षी विविध गोष्टी शिकण्यासाठी अधिक वेळ देत असतील. यामुळे प्रशिक्षणात जरी जास्त वेळ जात असला तरी, कदाचित या पक्क्या प्रशिक्षणामुळेच त्यांना प्रतिकूल परिस्थितीला तोंड देणं, शक्य होत असेल. याचंच पर्यवसान त्यांच्या दीर्घायुष्यात होत असेल!”.
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: pixabay.com, Mike Lovette/Brandeis University
Leave a Reply