डोळे उघडून बघा तुम्हीं आपल्या देशाला ।
महानतेची परंपरा दिसेल तुम्हाला ।।१।।
जगातील श्रेष्ठ देश म्हणूनी नाव होते त्याचे ।
आज विसरलो महत्त्व सारे आपल्या पूर्वजांचे ।।२।।
दोष असेल त्यांचा कांहीं सोडून द्यावा ।
परि अभिमान हा परंपरेचा मनात ठेवावा ।।३।।
डोळ्यांनी जे बघतो सारे सत्य समजता ।
कर्ण ऐकवी आम्हांस ज्ञान जे चूक ठरविता ।।४।।
कित्येक गोष्टीची उकलन होती वेदामध्ये आपल्या ।
परि पुराणातील वांगी समजूनी फेकून त्या दिल्या ।।५।।
आमचे जवळील ज्ञान गंगाजळ आम्ही विसरतो ।
परकियांची कास धरूनी वाट भटकतो ।।६।।
ते तर आहे महाठगते वेद नेई चोरूनी ।
पिऊनी आमचीच ज्ञान गंगा चाले मान उंचावूनी ।।७।।
विचार करावा थोडा याचा शांत चित्ताने ।
मालक तुम्ही असूनी घराचे नोकर परि बनले ।।८।।
अमेरिकेतील वैज्ञानिकाने नूतन शोध लाविला ।
अनेक प्रयोगाचा आधार घेऊन निष्कर्ष मांडला ।।९।।
गर्भाशयातील अर्भक देखील सारे ऐकू शकते ।
चंचल त्याचे कर्णेद्रिये असूनी ध्वनी लहरी खेचते ।।१०।।
विस्मित होतो सारे आपण प्रयोग हा जाणता ।
परि सहजपणे विसरूनी जातो अभिमन्यूची कथा ।।११।।
ऐके सुभद्रेचे बाळ तेजस्वी चक्रव्यूह भेद ।
हुंकार निघाला गर्भामधूनी सांगे महाभारत ।।१२।।
तेहतीस कोटी देव सारे फिरती आकाशी ।
नारद मुनींचा संचार होता विश्व मंडळाशी ।।१३।।
अंतराळी चालला मानवच्या दिसे दूरदर्शनी ।
चेष्टा करितो नारदाची आम्ही गोष्टी त्या समजूनी ।।१४।।
प्रवास करिता विमानातूनी आधुनिक जगाच्या ।
करमणुकीसाठी कथा वाचतो पुष्पक विमानाच्या ।।१५।।
दुर्बिण त्यांची घेवूनी आम्ही पाही दुरीचे तारे ।
आर्यभट्ट इंदूमतीचे खगोल ज्ञान विसरून जातो सारे ।।१६।।
विनाशाच्या काठी आहे जग आजच्या क्षणाला ।
अमेरिका,रशियाची क्षेपणास्त्रे भिवविती जगाला ।।१७।।
फार पुरातन काळी देखील महायुद्ध झाले ।
कर्ण, अर्जून, भिष्म, द्रोण यांनी क्षेपणास्त्र वापरले ।।१८।।
विसरतो आम्ही इतिहास सारा आपल्या भूमिचा ।
वेद उपनिषदे ग्रंथ पुराणे हाच पुरावा त्याचा ।।१९।।
सोन्यासारखी धरणी आमची आम्हां सारे देई ।
कष्ट तुमचे तिजला मिळतां नंदनवन ते होई ।।२०।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply