लुकू सन्याल यांचे व्यक्तिमत्व, ‘दूरदर्शन’च्या छोटय़ा पडद्यापेक्षा मोठे होते. कोलकोता येथील न्यू थिएटर्सचे गायक व बंगाली अभिनेते पहाडी सन्याल यांच्या त्या कन्या. घरात नाटक सिनेमाचे वातावरण असल्याने, अगदी वयाच्या १३ व्या वर्षीपासूनच कोलकाता आकाशवाणीवरील नभोनाटय़ांमध्ये त्या आवाज देऊ लागल्या.
इंग्रजी विषय घेऊन बी.ए आणि एम.ए या पदव्या मिळवत असताना साक्षात् सत्यजित राय यांनी एका चित्रपटात (देबी) काम करशील का अशी विचारणा केली असूनही, ‘मी शिक्षणालाच महत्त्व देणार’ अशा शब्दांत लुकू यांनी नकार दिला होता. युरोपमध्ये काही काळ घालवून लुकू सन्याल मुंबईत आल्या. इथल्या केसी, नॅशनल, एमएमके या महाविद्यालयांत त्यांनी इंग्रजीच्या अध्यापक म्हणून काम केले. एमएमके महाविद्यालयातून, इंग्रजी विभाग प्रमुख या पदावरून त्या निवृत्त झाल्या होत्या यापैकी पहिल्या नोकरीसाठी ‘केसी’ मध्ये, मुंबईतील ‘आकाशवाणी भवना’च्या नजीकच जावे लागत असल्याने त्यांनी तिथेही प्रयत्न केला.
ऑडिशन देऊन त्या तिथेही नैमित्तिक वृत्तनिवेदिका म्हणून काम करीत. याच काळात एका जाहिरात संस्थेने, जाहिरातवजा माहितीपटासाठी आवाज देण्याची (व्हॉइसओव्हर) विचारणा केल्यावर त्यांनी ते काम सुरू केले व पुढे ‘फिल्म्स डिव्हिजन’साठी हिंदी-इंग्रजीत निवेदन लिहिण्यापर्यंत मजल मारली. हा अनुभव दूरदर्शनवर कामी आला. इंग्रजी बातम्या देणाऱ्या अगदी पहिल्या निवेदकांत त्या (गर्सन डिकून्हा, निर्मला माथन यांच्यासह) होत्या. प्रताप शर्मा, डॉली ठाकूर, सिद्धार्थ काक, हरीश भिमाणी, सरिता सेठी या पहिल्या फळीतील वृत्तनिवेदकांपैकी त्या एक होत्या. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, इंग्रजीचे स्पष्ट शब्दोच्चार हे त्यांचे वैशिष्टय़ होते.
त्यांची वेगळी ओळख प्रस्थापित होण्याचे कारण, त्यांची व्यावसायिकता हे होते. त्या स्वतःचा मेकअप तसेच वेशभूषा करीत. त्याबरोबरच, संबंधित भाषेतील व्यक्तींची नावे त्या भाषेत जशी उच्चारली जातात, तशी उच्चारण्याकडे त्यांचा कटाक्ष होता. या कालखंडातील असंख्य महत्त्वपूर्ण घडामोडींच्या साक्षीदार बनत त्यांनी त्या लोकापर्यंत पोहोचवल्या. इंदिरा गांधी यांची अटक, सचिनदेव बर्मन, बेगम अख्तर या दिग्गजांचे निधन या बातम्या त्यांनी वाचल्या. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या या कालखंडाच्या आठवणी सांगताना आणीबाणीच्या काळात बातम्या सांगणे किती आव्हानात्मक होते याचे वर्णन केले होते. इंग्रजी वृत्तनिवेदनाच्या खास शैलीसाठी त्या प्रसिद्ध होत्या.
‘‘काळाची पानं उलटता येतात, पण फाडून फेकून देता येत नाहीत’’ हे मराठी वाक्य, त्यातील ‘ळ’ सकट अगदी नीटसपणे उच्चारून १९८१ सालच्या ३१ डिसेंबर रोजी, तत्कालीन ‘मुंबई दूरदर्शन’च्या मराठी प्रेक्षकांनाही लुकू सन्याल यांनी आपलेसे केले होते. ‘गजरा’सारखा एक खास कार्यक्रमच त्या दिवशी लुकू यांच्या निवेदनातून सादर झाला होता आणि ‘‘मला मराठी बोलण्याची सवय नाही’’अशी दिलगिरी त्यांनी या निवेदनाच्या सुरुवातीलाच व्यक्त केली असली, तरी उच्चाराची एकही चूक त्यांनी केली नव्हती! त्यांचा इंग्रजीतला तो ‘हस्की’.. काहीसा घोगराच आवाज शुद्ध शब्दोच्चारणामुळे कोणत्याही भाषेत ऐकत राहावा असाच होता.
हा एकमेव मराठी अपवाद वगळता, लुकू सन्याल या जुलै १९७४ ते १४ ऑगस्ट १९८२ पर्यंत ‘मुंबई दूरदर्शनवरील एक इंग्रजी वृत्तनिवेदिका’ याच नात्याने प्रेक्षकांना माहीत होत्या. १४ ऑगस्ट १९८२ रोजी मुंबई दूरदर्शनच्या इंग्रजी बातम्या बंद झाल्या, त्या दिवशी अखेरच्या वृत्तनिवेदिका लुकू सन्यालच होत्या. लुकू संन्याल यांचे ७ ऑगस्ट २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply