हिंदी चित्रपटसृष्टीवर गेली अनेक वर्षे कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये आपला अमीट छटा उमटवणारे गुलजार यांचा जन्म १८ ऑगस्ट १९४३ रोजी झाला.
गुलजार यांचे खरे नाव संपूर्णासिंह कालरा! चित्रपटसृष्टीत नाव चमकण्यापूर्वी गुलजार हे मोटार मेकॅनिक होते या वर कोणी विश्वास ठेवणार नाही पण हे सत्य आहे. गुलजार यांनी आयुष्यभर शायरीवर प्रेम केले, जीवतोड केले, शायरीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले, रात्ररात्र जागून काढल्या. खाजगी आयुष्यात वादळं आलीत, तरी गुलजार यांनी शायरी कधीच थांबवली नाही. स्वत:च्या बायकोपेक्षाही त्यांनी शायरीवर जास्त प्रेम केलं. उच्च कोटीची, प्रचंड भावनाप्रधान असलेली शायरी त्यांनी लिहिली.
लोकजीवनाशी जुळलेल्या वैविध्यांनी नटलेल्या रचना गुलजार यांनी रचल्या. लेखक, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक म्हणून आपला खास ठसा मा.गुलजार यांनी चित्रपटसृष्टीत उमटवला.
गुलजार यांनी बिमल रॉय यांच्या १९६२ सालच्या ‘बंदिनी’ पासून सिनेकारकीर्दीला प्रारंभ केला होता. बिमल रॉय हेच त्यांचे गुरू! संपूर्णानंदाचा गुलजार कसा झाला? याची कहाणी रंजकच आहे. ‘मेरे साजनऽ है उस पार…’वाले ख्यातनाम संगीतकार सचिनदेव बर्मन एकदा मोटार मेकॅनिक असलेल्या संपूर्णानंदाकडे गाडी दुरुस्त साठी आले होते. संपूर्णानंदाशी बोलता बोलता त्याच्यात दडलेला शायर आणि त्याची विलक्षण प्रतिभा सचिनदांनी हेरली. सचिनदा तेव्हा बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’साठी काम करीत होते. बंदिनीचे गीतकार शैलेंद्र होते. मात्र, या चित्रपटातील एका दृश्यावर शैलेंद्र यांचे कोणतेच गीत बिमल रॉय यांना हजम होत नव्हते. अशा स्थितीत सचिनदांना संपूर्णानंदाची आठवण आली आणि संपूर्णानंदाची बिमल रॉय यांच्याशी भेट घालून देण्याचा निश्चय त्यांनी केला. परंतु, अडचण अशी होती की, बिमलदा कुणाचेही म्हणणे सहजतेने कधीच स्वीकारत नव्हते. सचिनदांनाही आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडण्यापूर्वी दहादा विचार करावा लागत असे. ‘‘जे होईल, ते होईल, पाहू पुढची पुढं,’’ म्हणत त्यांनी संपूर्णानंदाची भेट बिमल रॉय यांच्याशी घालून दिली व आश्चर्य म्हणजे, संपूर्णानंदामधील प्रतिभा पाहून ते देखील प्रभावित झाले आणि ‘बंदिनी’चे गाणे संपूर्णानंदांना मिळाले. ‘मोरा गोरा अंग लई ले… मोहे श्याम रंग देई दे, छुप जाऊंगी रात ही मे, मोहे पी का रंग देई दे…’ हे गाणं संपूर्णानंदानं रचलं आणि हे गाणं एवढं हिट झालं की, ते रसिकांच्या ओठी आजही आहे. लतादीदींनी स्वरबद्ध केलेलं हे गीत आणि एस.डींनी चढवलेला संगीतसाज, यामुळं हे गाणं अधिकच नटलं. हे गाणं हिट होताच संपूर्णानंद रातोरात हिट झाले व ‘गुलजार’ हे नाव देशभरात पोहोचलं. यानंतर गुलजार यांना बिमल रॉय यांनी आपला सहायक बनविले. म्हणून गुलजार हे बिमल रॉय यांना आपला गुरू मानतात.
बिमल रॉय यांच्या मृत्यूनंतर गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी यांच्यासोबत काम केले. ही जोडी चित्रपटसृष्टीत यशस्वी जोड्यांपैकीच एक महत्त्वाची जोडी आहे. हृषीकेशदांसाठी गुलजार यांनी सर्वप्रथम संवाद ‘आनंद’साठी लिहिलेत. ‘आनंद’साठी गुलजार यांना सर्वोत्कृष्ट संवाद लेखकाचा फिल्मफेअर मिळाला होता. या चित्रपटातलं मुकेश यांच्या आवाजातलं राजेश-अमिताभ या दोन सुपरस्टार्सवर चित्रित ‘मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने…’ गुलजार यांच्या कलमातूनच रचलं गेलं होतं.
हृषीदांसोबत गुलजार यांनी बावर्ची, गुड्डी, मिली, नमक हराम, गोलमाल, अभिमान यांसारखे चित्रपट केलेत. मात्र, या जोडीला नजर लागली. नंतर दोघांमध्ये मतभेद झालेत व ‘यापुढे सोबत काम करायचे नाही,’ असा निर्णय त्यांनी घेतला. गुलजार यांनी स्वतंत्र मार्ग निवडला. त्यांनी स्वत: चित्रपट निर्मिती करायला प्रारंभ केला. स्वत:च्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद गुलजार स्वत:च लिहायचे. संजीव कुमार आणि जया भादुरी हे दोघेही त्यांचे आवडीचे कलावंत! या दोघांच्या सुंदर अभिनयाने नटलेला ‘कोशिश’ हा गुलजार यांचाच चित्रपट होता. ‘कोशिश’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
संजीव कुमार यांच्यासोबत गुलजार यांनी ‘आँधी’, ‘मौसम’, ‘कोशिश’, ‘परिचय’, ‘अंगूर’, ‘नमकीन’ असे चित्रपट केले. याशिवाय त्यांनी जितेंद्र, विनोद खन्ना, अमोल पालेकर, नसिरुद्दिन शहा आदी कलांवतांसोबतही चित्रपट बनविले. ‘परिचय’मध्ये ‘जम्पिंग जॅक’ जितेंद्रला त्यांनी घेतले, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. जितेंद्र यांची इमेज पाहता ते गंभीर अभिनय करूच शकणार नाही, असा सर्वांचाच कयास होता. गुलजार यांनी या सर्व कयासांना दूर सारत जितेंद्रला गंभीर भूमिका करायला लावली व जितेंद्र यांनी गंभीर तसेच सुंदर अभिनयाचा ‘परिचय’ देताना भूमिकेचं सोनं करून टाकलं. ‘मुसाफिर हू यारो, न घर है ना ठिकाणा…’ हे गाणे अजूनही तोंडावर आहे. ‘ट्रॅजेडी क्वीन’ मीनाकुमारी यांच्याशी गुलजार यांचं नातं भावनात्मक होतं. मीनाकुमारीने मृत्यूपूर्वी आपल्या सर्व डायऱ्या आणि शायरी गुलजार यांना सोपविली होती. गुलजार यांनी त्यावर संपादकीय संस्कार करून तिची शायरी प्रकाशित करण्याचे पुण्याचे काम केले. ‘बेनझीर’ चित्रपटाच्या सेटवर मीनाकुमारीशी त्यांची भेट झाली होती. तेव्हा गुलजार हे बिमल रॉय यांचे सहायक होते. गुलजार यांनी मीनाकुमारीला ‘मेरे अपने’मध्ये झळकवले होते. मीनाकुमारीने १९७२ साली जीवनयात्रा संपविली होती. मात्र, मीनाकुमारीच्या आठवणींनी ते आजही व्याकुळच होतात. ‘कोई होता जिसको अपना, हम अपना कहलाते यारो…पास न सही दूर ही होता, लेकिन होता कोई अपना…हे ‘मेरे अपने’तलं गुलजार यांचं गीत भावदर्द जागवतात.
१९८८ साली ‘मिर्झा गालिब’ व ९३ साली ‘किरदार’ या छोट्या पडद्यावरील मालिका त्यांनीच केल्या होत्या. ‘चौरस रात (लघुकथा संग्रह)’, ‘जानम’ (कवितासंग्रह) एक बूंद चॉंद (कवितासंग्रह), रावी पार (कथासंग्रह), रात चॉंद और मै, रात पश्मीने की, खराशें आदी त्यांची प्रमुख पुस्तके आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतले गुलजार यांचे योगदान वाघाचे आहे आणि त्यांना ‘भारतीय शायरीचं विद्यापीठ’चं म्हणायला हवं! चित्रपटाकडून ते आता त्याच्या पहिल्या प्रेमाकडे- साहित्याकडे वळले आहेत. केवळ स्वत:च्या लेखनापाशी न थांबता ते आता दुसऱ्यांच्या साहित्यातही लक्ष घालता आहे. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेचा अनुवाद केला आहे. ते लेखक म्हणून जगत नसतात आणि माणूस म्हणून जगत असतो तेव्हाही आनंदानं जगतो.
सत्तरीच्या आसपास ते कॉम्प्युटर शिकले आणि आता ते रोज इंटरनेट वापरतात. भल्या सकाळी टेनिस खेळण्याचा त्यांचा ‘हेल्दी’ क्रम गेली तीस वर्षे अखंड चालू आहे. त्यांना उत्तमोत्तम खाण्यापिण्याची आवड आहे. डायबेटिसमुळे बंगाली मिठाई खाता येत नाही, हे त्यांचे दु:ख आहे. गुलजार यांची मुलगी मेघना ही हिंदी चित्रपटसृष्टीत उत्तम काम करत आहे.
गुलजारनी ५० वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबईत काढला आहे. त्यामुळे मराठीशी त्यांचा चांगला परिचय आहे. मराठी माझा श्वास आहे, असं ते सांगतात. कुसुमाग्रजांच्या काव्यसंग्रहाचं त्यांनी हिंदीत भाषांतरही केलं आहे. त्यांचे अनेक कथासंग्रह, काव्यसंग्रह मराठीत भाषांतरित झाले आहेत. गुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
https://www.youtube.com/watch?v=F3hX-yNPb2E
https://www.youtube.com/watch?v=eJQ0sh-BU_8
https://www.youtube.com/watch?v=yRTvJaa3rS8
https://www.youtube.com/watch?v=fOdCvAT8QRk
https://www.youtube.com/watch?v=8Uj0j3kyNm0
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply