मजरूह सुलतानपुरी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर तालुक्यात गंजेहडी येथे झाला. त्यांचे खरे नांव असरार हुसेन खान असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव सिराज उल हसन होते. ते इंग्रज पोलिस खात्यात हेड कॉन्स्टेबल होते .
असरार यांचे शिक्षण उर्दू , पर्शियन आणि अरेबिक भाषेतून झाले. त्याच्या वडिलांचा इंग्रजीवर विश्वास नव्हतते म्ह्णून असरार म्हणजे मजरुह सुलतानपुरी याची सुरवातीचे शिक्षण मदरशात झाले . त्यांना युनानी मेडिकल कॉलजमध्ये पाठवले तेथे ते १९३८ साली डॉक्टर झाले. ज्याला आपण हकीम म्हणतो. त्यांनतर त्यांनी तेथील पलटण बाजारात दवाखाना सुरु केला . त्या दवाखान्यात ते रुग्णसेवापण करत आणि तेथे शेरो-शायरीच्या बैठकाही होत. १९४० मध्ये सुलतानपूर येथे मोठा मुशायरा झाला तेव्हा लोकांनी त्याच्या गजलची तारीफ केली ती असरार यांनी गंभीरपणे घेतली आणि हकीमी सोडून शायरी करू लागले . तेथे असरार यांची ओळख सुप्रसिद्ध उर्दू शायर जिगर मुरादाबादी त्यांच्याशी झाली. जिगर साहबांचे शागीर्द बनले. त्यांनतर ते ‘ असरार नासिह ‘ या टोपण नावाने लिहू लागले. आपल्या मित्राशी चर्चा केल्यावर त्यांनतर त्यांनी आपले नांव मजरुह ठेवले आणि मजरुह सुलतानपुरी या नावानी लिहू लागले. सुलतानपूर हे त्यांच्या शहराचे नाव तर मजरुह चा अर्थ होतो ‘ घायल ‘.
ते जिगर मुरादाबादीबरोबर मुंबईला मुशायरा करायला आले. तेथे ए. आर. कारदार त्या मुशायऱ्याला होते. कारदार साहबांनी त्यांना चित्रपटासाठी गाणे लिहावयास सांगितले. परंतु मजरुह सुलतानपुरी यांनी ते नाकारले. तेच त्यांचे गुरु जिगर मुरादाबादी त्यांना म्हणाले ‘ मिया, मुशायरो मी लिखोगे तो क्या मिलेगा । फिल्मो मे लिखोगे तो परिवार पल जायेगा । ” त्याना आपल्या गुरुची आज्ञा तोडणे शक्य नव्हते. कारदार साहेब त्यांना नौशादकडे घेऊन गेले. नौशाद साहेबानी एक चाल सांगितली . मजरुहने गाणे लिहिले , तो चित्रपट होता ‘ शहाजहा ‘ मजरुह ने जसे गाणे लिहिले तसे नौशादने ते गाणे जसे लिहिले तसे रेकॉर्ड केले. ते गाणे होते ‘ जब उसने गेसू गेसू लेहराये बादल आए झुमके…..’ त्याच चित्रपटात एक गाणे होरे ‘ जब दिलंही टूट गया , हम जीके क्या करेंगे …’ गायक होते साक्षात कुंदनलाल सैगल. तो चित्रपट हिट ठरला आणि मजरुह सुलतानपुरी यांनी चार दशकात चार हजाराहून गाणी लिहिली आणि ३०० चित्रपट केले.
त्यांचा गाण्याचा प्रवास ‘ सैगल ते शाहरुख ‘ असा म्हटला तर अतिशयोक्ती ठरणार नाही. उर्दूचे उत्तम शायर असून देखील ढोंगी समाजाने त्यांना शायर मानले नाही जे मराठीत माडगूळकर, खेबुडकर, दवणे यांचे झाले तसेच त्यांचेही झाले याचे प्रमुख कारण ‘ गेयता ‘. गेयता ही आत असावी लागते , ती ज्याच्याकडे नसते किंवा ज्यांना ते जमत नसते ते अशीच आवई उठवतात. मजरुह साहेबांचे तेच झाले . त्यांची गाणी बघीतली तर त्यात किती काव्य आहे हे जाणवते. त्यांच्या चित्रपटांची नांवे घेतली तरी गाणी डोळ्यासमोर येतात , तुमसा नही देखा , दिल देके देखो , चलती का नाम गाडी , तीसरी मंझिल , नौ-दो ग्यारह, तीसरी मंज़िल, पेइंग गेस्ट, काला पानी, तुम सा नहीं देखा, दिल देके देखो, दिल्ली का ठग , यादो के बारात , कयामत से कयामत तक , जो जिता वही सिकंदर , हम किसीसे कमी नही, कुदरत अशा सुमारे ३०० चित्रपटात त्यांची गाणी होती. सहगल पासून ते देवानंद ते खान बंधू पर्यंत सर्वांसाठी तोंडी एक से एक गाणी लिहिली. त्यांचे ‘ यादों की बारात ‘ मधले ‘ चुरा लिया है तुमने जो दिलको …’ किंवा अमीर खानच्या तोंडी दिलेले ‘ ‘पापा कहते है..’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे अशी त्यांची शेकडो गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत , मनात आहेत. त्यांनी ‘ लागी नही छुटे राम ‘ या भोजपुरी चित्रपटात गाणी लिहिली.
त्यांना समाजाचे देखील भान होते . त्यांना एकदा मुबईला मजुरांच्या सभेला बोलावले होते तेथे त्यांना एक गाणे म्हणण्यास सांगितले त्या गाण्यावर प्रशासन नाराज झाले. त्यांच्या नावाने वॉरंट निघाले . ही गोष्ट १९४९ सालची . पुढे त्यांना दीड -दोन वर्षाची शिक्षा झाली होती. पोलिसांनी त्यांना पकडण्याच्या आधी राजकपूरने त्यांना एक गीत लिहावयास सांगितले आणि त्या गाण्याचे त्यावेळी त्यांना एक हजार रुपये दिले. खरे तर त्यांना एक गाण्याचे २५० रुपये मिळत असत. त्या वेळी डेप्युटी कॉलेक्टरचा पगार २५० रुपये होता , परंतु राजकपूर मोठ्या मनाचा होता त्याने मजरुह सुलतानपुरी यांची अडचण ओळखली होती. खरे तर ते गाणे कोणत्याही चित्रपटासाठी बनवून घेतले नव्हते , त्याला फक्त मजरुह याना मदत करायची इच्छा होती. पुढे काही वर्षांनी त्यांनी ते गाणे १९६६ मध्ये ‘ तीसरी कसम ‘ या चित्रपटात वापरले. ते गाणे होते ‘ दुनिया बनाने वाले क्या तेरे मन समाई काही को दुनिया बनाई …’
मजरुह सुलतानपुरी आणि एस. डी. बर्मन यांची जोडी चागलीच जमली होती त्यांनी अनेक हिट गाणी दिली. परंतु त्यांनी नौशाद , मदन मोहन , रोशन , रवि , शंकर जयकिशन , ओ . पी . नय्यर , उषा खन्ना , लक्ष्मीकांत-प्यारेलाल , अन्नू मलिक , आर. डी . बर्मन , राजेश रोशन , जतीन – ललित , लेस्ली लेज लेव्हीज , आनंद मिलिंद , आणि ए . आर. रहमान या संगीतकारांबरोबर गाणी केली. नीट पाहिले तर तीन-ते-चार पिढ्याबरोबर काम केले. संगीतकार बदलले , हिरो बदलले परंतु बदलत्या काळाबरोबर , लोकांबरोबर ते लिहीत राहिले. त्याशिवाय उत्तमोत्तम गजल त्यांनी लिहिल्या.
कालानुरूप गाणी लिहिणे हे जबरदस्त शायर किंवा उत्तम कवीचे लक्षण आहे. त्यांना मुबंईत मुशायरामध्ये अनेक वेळा मी पाहिले होते तसेच एकदा ठाण्यात मराठी संग्रहालयात एक मुशायरा झाला होता त्यावेळी ते तेथे आले होते.
त्यांना दोस्ती चित्रपटामधील गाण्याबद्दल ‘फिल्मफेअर’ अवॉर्ड मिळाले , १९८० मध्ये ‘गालिब अवॉर्ड’ मिळाले , १९९२ मध्ये ‘इकबाल अवॉर्ड’ मिळाले आणि १९९३ साली महत्वाचे ‘दादासाहेब फाळके अवॉर्ड’ मिळाले.
अनेक पिढ्याबरोबर गाण्याच्या, गजलच्या रूपाने राहणाऱ्या ह्या शायर, गीतकाराचे २४ मे २००० रोजी वयाच्या ८० व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply