काळजाच्या डबीत, मनाच्या कुपीत
जपलय् मी माझं इवलसं गुपित ॥
आहे त्याचा तर आनंद आहे
नसत्याची नाही उणीव काही
आनंदपरिमल दुःखाची मळमळ
कुठल्या भासाची, तळमळ न ठेवत
जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ १ ॥
चक्रावणाऱ्या या चक्रव्यूहातून
गुदमरवणाऱ्या गाढ गर्दीतून विवंचनांच्या वावटळींमधून
शहाणपण माझं आटोकाट जपत
जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ २ ॥
जीवाचा आटापिटा करुन
कभिन्नकाळ्या कातळातून
माणूसकीच्या दुष्काळातून
मायेचा पान्हा जिवंत झरत
जपलय् मी माझे इवलंसं गुपित ॥ ३ ॥
जीवघेण्या स्पर्धेच्या गर्दीतून
बुभुक्षितांच्या हव्यासातून
पायावर देणं, पाय नाकारुन
‘पहले आप’चा पाढा पढत
जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ ४ ॥
निसटलं त्याचा शोक न लेवून
आहे हाती जे ते सावरुन
ठुसठुसणाऱ्या भूतकाळाकडे
निर्धारपूर्वक पाठ फिरवत
जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ ५ ॥
उपेक्षेच्या रणरणत्या उन्हात
माणूसकीच्या चेंगरत्या लिलावात
रुजू पहाणाऱ्या प्रत्येक आशेला
मुक्त जगण्याचा मक्ता देत
जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ ६ ॥
ऐहिक बेड्या बेगड्या तोडून
विसावित मी शांतिच्या कुशीत
मीपणाच्या मोहाला सारुन
सांभाळत माझं ‘माझेपण’ खुशीत
जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ ७ ॥
– यतीन सामंत
Leave a Reply