नवीन लेखन...

माझे माहेर 

‘माझे माहेर’ या दोन शब्दात किती प्रेम, माया, आपुलकी, अणि आदर सारं काही भरुन राहीलं आहे. बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या ‘मन’ या कवितेत म्हटलंच आहे की ‘मन वढाय वढाय जसं पिकातलं पाखरु, व्हत आता भुईवर गेलं क्षणात आभायात ‘ त्यांनी म्हटल्याप्रमाणे मन एका क्षणात जसं जमिनीवरून आभाळात जात अगदी तस्सच माझं मन एका क्षणात अलिबागला पोचतं.

अलिबागला चां. कां. प्रभू संमेलन होणार असं समजल्यापासून माझं मन एकदम अलिबागला पोहोचलं. लग्न झाल्यापासून मागील ५४ वर्षे चेंबूरला रहात असूनसुध्दा ‘अलिबाग’ आणि ‘माझे माहेर’ नुसते आठवणीने उजळूनच निघते. संम्मेलनाचे आमंत्रण आल्यापासून माझ्या माहेराच किती आणि कस करू हे वर्णन शब्दापलिकडचे आहे.

माझं माहेर म्हणजे आमच्या पाणसईकर प्रधानांचे घराणे फार पूर्वापार अलिबागेत आहे. चार भाऊ, तीन बहिणी, आईवडील असा गोतावळा एकत्र कुटुंब सख्खे सावत्र असा भेदभाव तर मुळीच नाही, एकोप्याने एकमेकांना मदतीचा हात हातात देऊन साधेपणाने पण आनंदाने नांदत आहेत. सुना, नातवंडे खेळीमेळीच्या वातावरणात रहात होती. आमच्या वडीलांनी (कै. शिवराम भाऊनी) छोटेसे पण टुमदार घर बांधले होते. त्यापुढे अंगणात बाग फुलवली तिथेच सर्व मुलेमुली. नातवंडे हसत खेळत वाढली. शिकली आणि सन्मार्गाला लागली.

आम्ही सर्वजण म्युनिसिपालीटीच्या प्राथमिक शाळेत शिकलो. नंतर को. ए. सोसायटीच्या माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले एस. एस. सी. झाल्यावर तेथेच सरकारी नोकरी केली. एकूण सर्व बालपण व उमेदीची वर्षे तेथेच घालवली. त्या आठवणी अजून जशाच्या तशा जाग्याच आहेत. को.ए.सोसायटीची शाळा अगदी समुद्रालगतच होती. सर्व सरकारी ऑफीसेस सुध्दा समुद्राजवळः त्यामुळे आम्हा सर्वांना समुद्राची खूप ओढ. आमच्या शाळेला जरा सुट्टी मिळाली की आम्ही मैत्रिणी किनाऱ्यावर जाऊन गप्पा मारत असू. तेथूनच जवळ असलेल्या सार्वजनिक वाचनालयात जाऊन पुस्तके, अंक बदलून घेऊन धावतपळत सात वाजेपर्यंत घरी यावे लागे. कारण वडीलांची शिस्तच तशी होती. ऑफिसमधून यायला उशिर का झाला, आज ऑफीसमध्ये विशेष घडामोडी काय घडल्या वगैरे सांगावे लागे. तर असा हा शिस्तीचा धडा आम्हा भावंडाना लहानपणापासून होता. त्यामुळे संध्याकाळी अंगणात बसून सर्वांच्या गप्पा ऐकण्यात, खेळीमेळीच्या वातावरणात वेळ फारच छान जात असे. सासू-सुन, नणंद-भावजय, सर्व चुलत भावंडे इतकी एकोप्याने रहात की त्यामुळे प्रत्येकाला एकमेकांबद्दल प्रेम, माया वाढत राहीली. मला तर मोठ्या वहिनी ( इंदिराबाई प्रधान) या आई सारख्या तर इतर दुसऱ्या वहिन्या मोठ्या ताईसारख्याच वागवत होत्या.

आता माझी सर्व भावंडे, वहिन्या, मेहुणे सगळेच देवाघरी गेले त्यांच्या आठवणी व खंत मनातून जात नाही व मन दुःखी होते. मात्र या सर्वांची उणीव भरून काढणारे या जगात दुसरे कोणी नाही म्हणून खुप वाईट वाटते. मन हेलावून जाते. अलिबागला गेली की सर्वांच्या स्मृतीने मन गलबलून जाते. मायेची पाखर घालणारे असे कोणीच नाही याची रुखरुख वाटते. “काळ गेला पण भोके उरली” तशी अवस्था हेते . तेथील घर, अंगण, विहीर, झाडेपाडे अशा रुपाने आठवणी राहील्या.

गावाचं वर्णन तर किती करावे. पुर्वीचे लाल मातीचे अरुंद रस्ते, टुमदार बैठी कौलारू घरे, आपुलकीने व विश्वासाने मदत करणारी माणसे, कुंपणावरून हाका मारून साद देणारे शेजारीपाजारी, काळंबादेवीसारखी स्वच्छ व सारवण केलेली उदात्त मंदीरे, या बरोबरच जवळच असणारा समुद्रकिनारा, तेथून दुरून दिसणारा कुलाबा किल्ला समुद्राच्या एका किनाऱ्यावर आक्षी, नागाव, चौल, रेवदंडा अशी छोटी बंदरे त्या किनाऱ्यावर असणाऱ्या माणसांना पाहुण्यांना जणू निळ्याशार पाण्यावर येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र व फेसाळलेल्या लाटा पहाण्यास सतत किनाऱ्यावर बसून रहावे असे वाटत असे. कोणीही पाहुणे आले की प्रथम समुद्रावर जात व तो आनंद लुटत असत. तेथील वाऱ्याने मन प्रसन्न व आनंदी होई.

समुद्राला लागुनच प्रसिध्द अशी वेधशाळा आहे. त्यामुळे गावाला फार महत्व आले. समुद्रात लांबवर दिसणारा दिपस्तंभ आहे. तो जणू दुरवर क्षितीजाला टेकलेला आहे असे वाटते. सर्व नावाड्यांना व प्रवासी खलाशी यांना मार्गदर्शन करण्यास तो उभा आहे. समोरच्या बाजुस उभा असणारा शिवकालीन प्रसिध्द कुलाबा किल्ला आहे. समुद्राला ओहोटी असताना लोक किल्ला पहाण्यास जातात. तिथे चालत जाता येते म्हणून दररोज अनेक लोक, पाहुणे, देश-विदेशातील पर्यटक सुध्दा उत्सुकतेने किल्ला पहाण्यास जातात. त्याचे वैशिष्ट्य खुप आहे. खाऱ्या पाण्यात समुद्रात असणाऱ्या या किल्यात गोड्या पाण्याची खोल विहीर आहे. इतर अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. पाण्याने तुडुंब भरलेली मोठी तळी, तलाव आहेत. शिवकालीन मोठ्या तोफा, लपाछपीच्या जागा अशा अनेक बघण्यासारख्या व विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी आहेत. गावामध्ये फेरफटका मारताना जुना आंग्रेकालीन वाडा, त्यांनी बांधलेले चौथरे व त्यावर लिहीलेली आंग्रेकालीन माहीती (आता दगडाशिवाय काहीच दिसत नाही.) आक्षी नागावला जाण्यासाठी पाचच मिनिटांचा पण होडीचा (तरीचा) प्रवास खूप सुखद वाटतो. पलिकडच्या किनाऱ्यावर चिंचा, आवळे, बोरीची भरपूर झाडे आहेत. आम्ही आमच्या तेथील मैत्रिणींकडे फिरत फिरत जाऊन झाडाखालच्या चिंचा, बोरे वेचण्याचा आनंद लुटत होतो. ती मजा औरच !

हळूहळू काळाच्या ओघात मैत्रिणींची लग्ने झाली. त्या दुसरीकडे गेल्या. जुनी घरे पाडून आता तेथे अलिशान इमारती, टॉवर्स होऊ लागले. तांबड्या मातीचे रस्ते न रहाता डांबरी रस्ते, पक्क्या सडका झाल्या. आता अलिबाग पहाताना असे वाटते की ही माती आपली नाही. ही घरे आपली नाहीत. आणि ही माणसे सुध्दा. पण नाही, काही झाले तरी ते आपले माहेर आहे. त्यांना जरी आपण परके वाटलो तरी आपल्याला त्यांची ओढ आहे. आपल्याला असे पोरके आणि परके का वाटावे?

ही माहेरची नाळ कधीच तुटणारी नसते. माहेरच्या नुसत्या आठवणी काढत बहिणाबाईंच्या सांगण्याप्रमाणे मन वढाय वढाय उभ्या पिकावले पाखरू असं होऊन क्षणात अलिबागला म्हणजेच माझ्या माहेराला पोहोचतं.

सौ. कुमुद प्रधान, चेंबूर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..