आईची आठवण अशी कधी सुटलीच नाही
खरं सांगू, माझी नाळ कधी तुटलीच नाही
झाडापासून फांदी वेगळी कशी, असावे सूर्याहून तेज
अस्तित्वाची नांदी आईवेगळी नव्हती तेव्हा किंवा आज
आतड्यांचा पीळ आम्ही कधी उलगडू दिलाच नाही ॥
पाठीवरला स्पर्श असो वा नजरेतली माया
मार्गदर्शी, उत्प्रेरकही, पाठीशी आश्वासक छाया
आनंदाच्या झंकारांनाही अंतर्नाद आई हा राही ॥
कुणा कळावा वा जुळावा अदृश्य धाग्यांचा ओढा
पायाची असावी ठेच वा घशात अडला आवंढा
संकटातही सवय हाकेची आईच्या सुटलीच नाही ॥
आई असावा स्नेहझरा, स्वयंभू वाहता झरझरा
वा हा शीतल वात्सल्यवारा, उबदार कौतुकनजरा ।
वसंताच्या पालवीला, ग्रीष्माची नजर लागलीच नाही ॥
आई नव्हे ही केवळ व्यक्ती, ‘आईपणा’ हा प्रकृतीचा
आम्हासही लाभे काही वारसाहक्क काही परिसस्पर्शाचा
द्रौपदीच्या थाळीला गंज आम्ही लावणार नाही ॥
– यतीन सामंत
Leave a Reply