नवीन लेखन...

माझी पहिली कॅसेट

एक गायक म्हणून संपूर्ण कॅसेट गाण्याची माझी योग्यता आहे का, हे विचारण्यासाठी शंकर वैद्यांकडे गेलो. ‘ही तुझ्या आवाजातील संपूर्ण कॅसेट आतापर्यंत रिलीज व्हायला हवी होती. थोडा उशीरच झालाय असे समजून कामाला लाग,’ या शब्दात त्यांनी प्रोत्साहन दिले. कॅसेटच्या खर्चाचा अंदाज घेतला. तीस ते चाळीस हजार रुपये अपेक्षित खर्च होता. भाऊंनी कर्जाऊ पैसे देण्याचे मान्य केले. हे कर्ज दीड वर्ष काम करून माझ्या पगारातून फेडले जाणार होते. कॅसेटसाठी मी सर्व काही करायला तयार होतो. संगीतकार प्रभाकर पंडितांचा कॅसेटचा अनुभव दांडगा होता. त्यांनी खूप मार्गदर्शन केले. त्यांनाच कॅसेटचे संगीतकार म्हणून काम करण्याची विनंती केली. ते नामवंत संगीतकार असल्याने त्यांचे मानधन जास्त होते. ते कमी न करता त्यांनी टप्प्याटप्प्याने स्वीकारावे अशी विनंती केली. माझ्या एक एक गोष्टी ऐकून प्रभाकरजींना आणि पंडित वहिनींना खूप मजा वाटत असे. माझ्या अचाट साहसाचे त्यांना कौतुकही वाटत असे. शिवाजी पार्क, दादरमध्ये आता माझी तीन घरे अशी होती की जेथे मी कसलीही आगाऊ सूचना न देता बिनदिक्कत जेवायला जाऊ शकत असे. पहिले घर श्रीकांत ठाकरे यांचे व दुसरे घर प्रभाकर पंडितांचे आणि तिसरे घर यशवंत देवांचे. या तीनही महान संगीतकारांनी त्यांच्या गाण्यांबरोबरच मला जे प्रेम दिले, ते मी कधीही विसरू शकणार नाही.

‘अरे, गाणी निवडली आहेस का कॅसेट करायला?’ प्रभाकर पंडितांच्या शब्दांनी मी भानावर आलो. गमतीची गोष्ट ही होती की, कॅसेटच्या इतर कामांच्या नादात कॅसेटची गाणी कोणती असावीत हा विचारच मी केला नव्हता. मी त्यांनाच सल्ला विचारला. ‘तुझी आणि तुझ्या कंपनीची पहिली कॅसेट विठ्ठलाच्या अभंगांची करू या.’ प्रभाकर पंडितांनी सल्ला दिला. अभंगाच्या चाली बांधण्यात त्यांचा हातखंडा होता. भावनिकदृष्ट्या तर हा सल्ला बरोबरच होता, पण व्यावहारिकदृष्ट्याही तो योग्य होता. कारण विठ्ठलाच्या अभंगांची कॅसेट सीझनल नसते, ती बाराही महिने विकली जाते. ताबडतोब काही अभंग निवडून आम्ही रिहल्सलला सुरुवात केली. वरळीचा सिस्टीम रेकॉर्डिंग स्टुडिओ आम्ही निवडला. या रेकॉर्डिंगच्या निमित्ताने एका अद्ययावत स्टुडिओच्या हाय डेफिनेशन माईकसमोर गाण्याची अग्नीपरीक्षा मला द्यायची होती. एरवीचे गाणे आणि या माईकसमोर गाणे यात जमीन अस्मानचे अंतर असते. तुमच्या गाण्यातील छोट्यातील छोटा दोषही हा माईक अचूक पकडतो. या स्टुडिओचे नामवंत रेकॉर्डिस्ट प्रमोद घैसास यांनी मनापासून मला याबाबतीत मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहीन. या रेकॉर्डिंग दरम्यान प्रमोद आणि मी चांगले मित्र बनलो. त्यानंतर माझ्या अनेक गाण्यांचे रेकॉर्डिंग प्रमोद घैसास यांनी केले. अनेक कार्यक्रमांसाठीही त्यांची साथ लाभली. आमची मैत्री आजही अतूट आहे.

१२ जानेवारी १९८७ रोजी सकाळी ठीक दहा वाजता माझे गुरु श्रीकांत ठाकरे यांनी आशीर्वाद देऊन रेकॉर्डिंगचा शुभारंभ केला आणि रेकॉर्डिंगला सुरुवात झाली. सकाळी दहाला सुरू झालेले रेकॉर्डिंग रात्री दहा वाजता संपले. त्या एकाच दिवसात मी आठही अभंग गायले. काम कठीण होते, पण रेकॉर्डिंगचा खर्च कमी करण्यासाठी ते आवश्यक होते. एका दिवशी दोनच गाणी अशी चैन मला परवडणारी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रभाकर पंडित आणि प्रमोद घैसास यांनी ट्रॅक मिक्स करून मास्टर तयार केला. त्यावेळी मास्टर स्पूलवर म्हणजे मोठ्या टेपवर होत असे. मग कॅसेटवर एक कॉपी घेऊन मी घरी आलो. आई-भाऊंबरोबर संपूर्ण कॅसेट ऐकली. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. चार महिन्यांच्या अथक श्रमानंतर मलाही समाधान लाभले. यानंतर या कॅसेटचे कलात्मक मूल्यमापन टीकाकार आणि जाणकार रसिक करणार होतेच. पण ही संपूर्ण कॅसेट गाण्याची अवघड कामगिरी मी पूर्ण केली होती. आता कॅसेटचे कव्हर आणि त्याच्या कॉपीज करण्याचे काम होते. माझा आर्टिस्ट मित्र मिलिंद मोकाशी याने सुंदर कव्हर तयार केले. पण कॅसेट अॅसेम्बल करण्याचा खर्च मात्र माझ्या कॉपीज संख्येने कमी असल्याने फार वाटत होता. “अरे, तू स्वतः इंजिनीयर आहेस. कॅसेट अॅसेंब्लिंग तुला स्वतःलाच नाही का करता येणार?” भाऊंनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे नवा चॅलेंज टाकला. मी स्वीकारला. मुंबईला लॅमिंग्टन रोडला जाऊन मी कॅसेट अॅसेंब्लिंगचा पंधरा दिवसांचा कोर्स केला. नंतर आमच्या काही कामगारांना ट्रेनिंग दिले. कॅसेटचे सर्व पार्टस् बाजारातून विकत आणले आणि स्वर-मंचच्या पहिल्या कॅसेटच्या पाचशे कॉपीज तयार केल्या. लवकरच ४ फेब्रुवारी १९८७ या दिवशी कॅसेटचा प्रकाशन समारंभ आयोजित केला.

‘गाऊ विठोबाचे नाम’ या माझ्या पहिल्या संपूर्ण कॅसेटचे प्रकाशन माझे गुरू पं. विनायकराव काळे यांच्या हस्ते झाले. ख्यातनाम साहित्यिक वि. आ. बुवा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक अशोक चिटणीससर विशेष निमंत्रित होते. त्यांनी अतिशय परिणामकारक भाषण केले. आजही ते माझ्या स्मरणात आहे. कॅसेटमधील निवडक अभंगांचे मी गायन केले. कॅसेट निर्मितीच्या धडपडीत मनापासून सर्व प्रकारे मला मदत करणारा माझा जवळचा मित्र महेश वर्दे याने पहिली कॉपी विकत घेतली आणि नवीन कॅसेटच्या विक्रीला प्रारंभ झाला. मी माझी पहिली कॅसेट प्रकाशित झाल्यामुळे अतिशय आनंदात होतो पण या कॅसेटविक्रीचे काम किती कठीण असणार आहे, याची पुसटशी कल्पनादेखील मला नव्हती.

– अनिरुद्ध जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..