पृथ्वीतलावरील उडणाऱ्या कीटकात सर्वात जास्त वेळ उडू शकणारा कीटक आहे डास. त्याच्या अंदाजे २७०० जाती व पोटजाती आहेत. माणसांमध्ये मुख्यतः मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग आफ्रिकन पीत ज्वर, चिकन गुनिया व मेंदूचा दाह हे रोग होण्यास ते कारणीभूत असतात.
मलेरिया रोगाचा प्रसार ॲनोफेलिस मादी डासाकडून होतो. या डासाचा शोध मिगन कीटक शास्त्रज्ञाने १८१६ साली लावला. ॲनोफेलिस गटातील ४० मुख्य उपजाती मलेरियाचे परोपजीवी वाहून नेण्याचे काम करतात. मुख्यतः ॲनोफेलिस गॅम्बी ही जात मलेरिया रोग पसरवित असते. व त्या डासांची २ ते ३ कि. मीटर उडण्याची क्षमता असते.
डासांच्या शरीररचनेत डोके, सोंड, बाजूचे मिशांसारखे लांब अँटेने, पंख, त्यावरील बारीक सुतासारख्या दिसणाऱ्या नलिका इत्यादी महत्त्वाचे भाग असतात. त्याच्या पंखांचा रंग, पंखांच्या कडांची किनार, त्यावरील पांढरे व काळे ठोकळ्यासारखे दिसणारे ठिपके यांनाही फार महत्त्व असते. डासांच्या रचनेचा अभ्यास २० ते १२० पट मोठे दिसणार्या मायक्रोस्कोप खाली केल्यानंतर ते कोणत्या जातीचे आहेत हे ठरविता येते. मादी ॲनोफेलिस च्या सोंडेवर बारीक केस तंतूंचे झुबके व शिवाय स्वतंत्रजननेंद्रियांची जागा असते. आजच्या युगात कॉम्प्युटर मॉडेल्स व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे गट निदान अधिक अचूकपणे करता येते. माणसाच्या शरीरावर बसण्याची डासांची पद्धतही गटागटांमध्ये वेगळी असतेव त्याचाही गट ठरविण्यासाठी उपयोग होतो. पकडलेल्या डासांचा गट ठरविणे हा डास निर्मूलन कार्यक्रमाचा मूलभूत घटक आहे व ते बिनचूक ठरविण्याचे कार्य डास कीटकशास्त्रज्ञ करतात. यावरील मोलाचे काम हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई येथे चालते.
मनुष्यात विविध प्रकारचे डासांमुळे होणारे रोग हे मादी डासांकडूनच पसरविले जातात. ते तीन प्रकारचे असतात. त्यापैकी प्रत्येक गट हा वेगवेगळ्या रोगांचे कारण आहे.
१) ॲनोफेलिस – माणसात पसरविणारा मलेरिया.
२) क्युलेक्स – हत्तीरोग, मेंदूदाह व पक्ष्यांमधील मलेरिया.
३) एडीस – डेंग्यू, पीतताप, चिकन गुनिया व काही विशिष्ट जातीचे Filaria
डासांची मादी ही मनुष्य व इतर प्राण्यांचे रक्त आणि फुलांमधील द्रावांवर जगते; तर नर डासांना फक्त फुलांमधील रसाचीच गरज असते.माणसांना डासांची मादीच काय चावते व नर का नाही हा यक्षप्रश्न सामान्य माणसांना नेहमीच कोड्यात पाडणारा आहे. यालाही एक कारण म्हणजे, नर व मादी यांच्या मिलनानंतर प्रजोत्पादनाचे काम मादी अंडी घालून करीत असते. ती अंडी वाढविण्याकरिता अधिक प्रथिनांचा आवश्यकता असल्याने निसर्गानेच तिची सांगड मनुष्याच्या रक्ताशी घालून दिलेली आहे. मानवी रक्तात योग्य प्रमाणात प्रथिने मिळत असल्याने मादी डासच माणसा भोवती पिंगा घालीत असतात. किंबहुना प्राण्यांच्या रक्तापेक्षा मनुष्याच्या रक्ताची चटक डासांच्या मादीला लवकर लागते.
बऱ्याच वेळा डासांचा व HIV AIDS (एच आय व्ही एड्स) या रोगाचा परस्पर संबंध आहे का? असा प्रश्न चर्चिला जातो. अनुभवांती असे सांगता येईल किडस की डास एड्सचा प्रसार करीत नसावा. बहुधा डासाचे शरीर हे एड्सच्या विषाणूंना जगण्याकरिता पूरक नाही.
— डॉ. अविनाश केशव वैद्य
(क्रमशः)
Leave a Reply