आज डोळे उघडताना
रंगलेले दिसले सनईचे सूर
पहाटेच्या क्षितीजावर…
सातच पावलं चालून
मी पोचले आभाळाकडे
पण देहाचं नातं मातीशी
अजून तुटलं नाही…
तसं काहीच विसरले नाही,
विसरता येणार नाही
या मातीनंच माझे घुंगुरवाळे मळवलेत
हळूवार खेळवलेत…
माझ्या कणाकणात मिसळलेली ही माती..
आठवतंय – श्रावणातल्या धारांनी ही माती थरारताना
माझा कणन्कण झेलायचा तिचा शहारा
वसंतात ती यायची उमलून
वेलीतून –फुलाफुलातून
तेव्हा नकळत गाणं उमलायचं
..माझ्याही ओठातून
तिची शिशिरी शुष्कता उदास करायची मलाही
आठवतंय, स्वप्न तिच्यात मिसळून
मी केली होती स्वप्नांकित बोळकी, भांडी
एक छोटीशी चूल
आणि एकटीनंच होतं उभारलं
एक सुंदर घरकूल
या मातीतच !
आज पुसल्यायत खुणा म्हणून काय झालं?
माझ्या सातव्या पावलाशी माती अवघडली तेव्हा तिला मी म्हटलं
“अशी होऊ नकोस वादळी या वळणावरती
मी काहीच विसरले नाही…विसरता येणार नाही बघ,
मी मांडलेल्या सोन्याच्या संसाराला
अजून गंध येतोय –
ओल्या मातीचा !”
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
Leave a Reply