मला लहानपणापासून आवडणारा एकमेव प्राणी एकच, तो म्हणजे मनीमाऊ! गावी असताना कुठेही मांजरं दिसायची, ती राखाडी रंगाचीच. ती कधी जवळ यायची नाहीत. पकडायला गेलं तर फिसऽ करुन फिसकरायची. एखादं दुसरं पांढरं मांजर असेल तर ते चूल विझल्यावर राखेत बसून पार ‘गोसावडं’ झालेलं असायचं. कधी त्यानं दूधात तोंड घातलं तर त्याला माझी काकू चुलीवरची फुंकणी फेकून मारायची.. गावात फासेपारधी फिरताना दिसले की, मोठी माणसांनी सांगितलेलं आठवायचं.. फासेपारधी बोके पकडून नेतात व खातात..
शहरात आल्यावर जोशी वाड्यातील तीन बिऱ्हाडात एकतरी मांजर नेहमी असायचीच. माझ्या वडिलांना मांजर फार आवडायचं. मग त्याला जेवताना पोळी दिली जायची. आमचं घर रस्त्यावरच असल्याने ते मांजर चोरी करुन काहीतरी वस्तू घरात आणायचीच. माझा मोठा भाऊ मित्रासोबत गप्पा मारत असताना, त्या मांजरीने त्याच्या सायकलवरचा ब्रेड दातात पकडून घरात आणला होता. एकदा आख्खा पापलेट घेऊन आली.
मांजर पाळल्यामुळे दर चार महिन्यांनी तिला पिल्ले व्हायची. मग ती घरात वारंवार जागा बदलायची. कधी माळ्यावर पिल्लांना घेऊन गेली तर ती वरुन पडण्याची भिती वाटत असे. त्यापेक्षा बोका असलेला बरा वाटतो. तो कायम बाहेर हिंडून विसाव्याला घरात येऊन पसरतो. एक मन्या नावाचा बोका होता. तो माझ्या आईचा, म्हणजे जीजीचा बोका म्हणून संपूर्ण गल्लीत प्रसिद्ध होता. आमची मांजरं समोर दुधाचं भांडं असलं तरी कधी त्यात तोंड घालायची नाहीत. देईल तेव्हाच खाणार.. रात्री झोपताना पायाशी झोपली तर तिची गुर्र गुर्र चालायची. कधी रात्री दोन बोक्यांची भांडणं सुरु झाली की, त्यांचे अनाकलनीय संवाद बराच वेळ चालायचे. शेवटी उठून त्यांना हाकलल्याशिवाय, कुणालाच झोप लागत नसे.
पाळलेले मांजरं जर दोन दिवस घरी आलं नाही तर आम्हाला चैन पडायचा नाही. आमचे जोशी मालक हे उंदीर पकडण्यासाठी त्यांच्या बंगल्यात पिंजरा लावून ठेवत असत. एकदा रात्री चुकून आमचं मांजर त्या मोठ्या पिंजऱ्यात अडकलं.. जोशी म्हणजे जमदग्नीचा दुसरा अवतारच होते. त्यांनी पहाटेच्या अंधारात पिंजरा न पाहता तो हौदात बुडवला.. नंतर त्यांना कळले की, त्यात उंदीर नाही तर मांजर होतं…. त्या दिवशी मला जेवण गेलं नाही… लहानपणी ऐकलं होतं की, ज्याच्या हातून मांजर मरतं, त्याला तळहातावर मेणबत्ती ठेवून काशीयात्रा करावी लागते… जोशींनी ती केलीच नाही…
सदाशिव पेठेत असेपर्यंत घरात मांजर होतंच. तिथून बालाजी नगरला आलो, ते मांजराला सोबत घेऊनच. तिला पुन्हा पिल्लं झाल्यावर घरच्यांनी तिला लांब कात्रजकडे सोडलं… दोनच दिवसांनी ती परत दारात हजर झाली! त्या मांजरीनंतर इच्छा असूनही मांजर काही पाळलं नाही.
आता मोठ्या घरात आल्यावर मांजर आणायचा विषय काढला की कडाडून विरोध होतो. तिची घाण कुणी काढायची? तिचे केस पोटात गेल्यावर भयंकर आजार होतो.. असं ऐकवलं जातं. त्यामुळे तूर्तास मी मांजर पाळण्याचं डोक्यातून काढून टाकलेलं आहे.. मात्र कुठे मांजर दिसलं की, मी त्याला कुरवाळतो, तिच्या डोक्यावरुन शेपटीपर्यंत हात फिरवत गोंजारतो. मग ते सुद्धा लाडात येतं. कधी हाताचा चावा घेतं तर कधी पंजा मारतं..
आता मांजरप्रेमी भरपूर आहेत. फेसबुकवर त्यांचा स्पेशल ग्रुप आहे. अनाथ मांजरांना घरं मिळतात. त्यांना आता कॅटफूड मिळतं. कधी आजारी पडली तर डाॅक्टरांकडे नेलं जातं.. कुणी हौसेनं त्यांना फिश, चिकन खाऊ घालतात. त्यामुळे सध्याची मांजरांची पिढी ही ‘भाग्यवान’ आहे!!
फेसबुकवरील सोनाली जोशी या प्रचंड माऊप्रेमी आहेत. त्यांची माऊबद्दलची रोजची पोस्ट पाहिल्याशिवाय माझा दिवस सुरु होत नाही…
आजच्या जागतिक माऊ दिनानिमित्त माझ्या सहवासातील, वाघाच्या मावशीच्या या रम्य आठवणी!!!
– सुरेश नावडकर, पुणे
मोबाईल 9730034284
Leave a Reply