माया तपस्वी, मायावि विचार
माऊली फळे देऊनी लाचार
प्रेम लोभासाठी आता व्यवहार
काय कामाचा!
नगण्य ते दुःख का दिसे
पर्वताएव्हढे
जेथे मातीचे ढिगारे
न टिकती!!
अर्थ–
जेव्हा माया करणारी व्यक्ती जवळ असते तेव्हा कसलीही चिंता वाटत नाही, पण तीच व्यक्ती मायावी विचारांची असेल तर? इथेच समाज बदलत जातोय, इथेच विचारधारा कष्ट कमी आणि लाभ जास्त या विचारांना आपलंसं करतायत आणि म्हणूनच तपस्वी प्रमाणे माया करणारी माय सुद्धा आता उघड्या डोळ्याने बघते आपल्या वानप्रस्थाश्रमाकडे. मुलाने किंवा सुनेने हाकलून दिले तर? आता कागदाची हाव अंगातल्या रक्तालाही शोषून घेते आणि मग सुरू होतो खरा व्यवहार इतकी वर्षे केलेल्या संस्कारांचा आणि जीवापाड केलेल्या प्रेमाचा.
म्हणून ते दुःख मोठं वाटण्याचं काही कारण नाही, कारण दुःखा मागूनी येते सुख मग परतची आहे दुःख. तेव्हा माऊलींनो, वडिलांनो क्षणिक दुःख सोसावं भविष्यातल्या डोंगरा एवढ्या दुःखाला बाजूला सारण्यासाठी. कारण डोंगर बनायला सुद्धा मातीची ढेकळे एकत्र यावी लागतात तेव्हा तो वाढतो. म्हणून दुःख मोठं करण्यापेक्षा त्याची ढेकळ आताच फोडा आणि तीच माती पुन्हा नव्याने रुजवली तर त्यातून येणारं पीक हे तुम्हाला सर्वोत्तम peak पर्यंत घेऊन जाईल. तेव्हा दुःख वाढवू नका, वाढवा सुखं छोट्या छोट्या गोष्टींमधलं.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply