औरंगाबाद जिल्ह्यातील अंबड या गावाजवळ एक छोट्याशा टेकडीवर मच्छोदरी देवीचं मंदीर स्थित आहे, या टेकडीचा आकार मच्छाप्रमाणे असल्याने या देवीला मच्छोदरी हे नाव मिळालं असावं, मंदीराचे बांधकाम पाषाणाचे असून, ७० पायर्या चढून गेल्यावर मंदिरात पोहचता येतं; मंदिराचा गाभारा डोंगर पोखरुन केला असून, या गाभार्यात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन वेगवेगळ्या मूर्ती विराजमान आहेत. शंकर त्याचप्रमाणे गणपतीची मूर्ती देखील या ठिकाणी स्थित आहे.
महिषासूर वधासाठी देवी प्रकट झाली त्यावेळी अंबा ऋषीने याचठिकाणी तपश्चर्या केली व त्याला देवीने दर्शन दिल्याची अख्यायिका आहे, तेव्हापासून या गावाला “अंबिकापूर” किंवा “अंबड” या नावानं संबोधतात, मच्छोदरी देवीचं मंदिर पुरातन असून त्याच्या पायर्या शके १६०० मध्ये बांधल्या असून, याच काळात अहिल्याबाई होळकर यांच्या सांगण्यावरुन एका अधिकार्याने सभागृह बांधल्याची नोंद आहे, मच्छोदरी देवीची यात्रा नवरात्रीत भरत असून, उत्सवाच्या काळात नगारखानाच्या गच्चीवरुन खाली देऊळाच्या चौक परिसरात एक जाड चौपदरी घेरतात व त्यावर सहा महिन्यांपासून २ वर्षे वयाची नवसाची मुले उड्या मारतात व प्रत्येक जण एक त्रिपदरी टाकतो, हे इथलं खास वैशिष्ट्य.
— सागर मालाडकर
Leave a Reply