नवीन लेखन...

मदतनीस ! (गूढकथा)

त्यांनी सभोतालच्या पुस्तकावरून नजर फिरवली. अभिमानाने! आणि का नसावा अभिमान? इतकी संपदा लिहायला, इतर लेखकांना चार जन्म घ्यावे लागतील! पाच पन्नास ‘चारोळ्या’ किंवा ‘कविता’ लिहल्या कि, यांचं ‘कवित्व’ कोरड पडत. चार मासिकात (हो, या जमान्यात दिवाळी शिवाय कोणी छापत नाही. सगळं ऑन लाईन!) दोन कथा आल्याकी शेफारून जातात! ‘मी लेखक – मी लेखक’ म्हणून ढोल पिटून घेतात. आपल्या सारख्या शेकड्याने कथा आणि चाळीशीच्या आसपास कादंबऱ्या लिहणाऱ्या, लेखकाने ‘अभिमान’ बाळगू नये तर काय करावे?

पण सध्या त्यांची गोची झाली होती. गेल्या सहा महिन्यापासून नवीन काही सुचत नव्हते. शेवटी, कथा बीजा शिवाय, कथा किंवा कादंबरी लिहणार कशी? प्रकाशकांनी त्यांच्या पुढील पाच कादंबऱ्या आधीच बुक करून ठेवल्या होत्या! जबर मानधन देऊन! पण त्यांना पैश्या पेक्षा, इभ्रतीचा प्रश्न ज्यास्त भेडसावत होता. या वर्षी ‘या वर्षी शामकांताची एक हि कादंबरी बाजारात येऊ नये? का? त्याच्या बुद्धीच दिवाळ निघालं कि काय?’ लोक तोंडावर नाही, पण माघारी हेच म्हणणार! ते त्यांना नको होत! आज आघाडीचे कथाकार म्हणून साहित्य क्षेत्रात त्यांचा जो दबदबा होता, त्याला उतरती कळा लागली असती.

प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचणे जितकं कठीण असत, त्यापेक्षा तेथे टिकून रहाणं ज्यास्त अवघड असत. एकदा ती जागा हातून निसटली कि, मग जे दुर्लक्षत जीण नशिबी येते——- त्या पेक्षा नर्क बरा!
आणि म्हणून त्यांना पुन्हा ‘त्याची’ मदत घेणे भाग दिसत होते!
०००
ती तरुणी वावटळी सारखी पोलीस स्टेशनात घुसली.
“मला एक तक्रार नोंदवायची आहे!” तिला धाप लागली होती.
हवालदाराने तिला पेलाभर पाणी दिले.आणि बाकड्यावर बसवले.
इन्स्पेक्टर माधवानी हातातले काम संपवले,आणि त्या तरुणीला बोलावले.
“कसली तक्रार आहे?”
“माझे बाबा अचानक हरवले आहेत!” तिने घाईत सांगितले, जणू समोरचा पोलीस अधिकारी तिचे बोलणे पूर्ण एकून न घेताच पळून जाणार होता!
“हे पहा, नीट सावकाश सांगा. जे जे आठवेल, ते ते आणि तसे तसे सांगत रहा. तुमच्या बाबांचा फोटो आणलात का सोबत? आधी तुमचे नाव सांगा.” माधवाच्या शब्दाने तिला धीर आला.
“मी वासंती. बाबा, म्हणजे माझे सासरे, नेहमी प्रमाणे, काल संध्याकाळी, कॉलनी जवळच्या बागेत फिरायला गेले. ते नेहमी सात साडेसातच्या दरम्यान परततात. पण आठ वाजून गेले तरी परतले नाहीत! आसपास चौकशी केली, त्यांच्या मित्रांकडे विचारले, नातेवाईकांना विचारले. सगळीकडून नकार घंटाच मिळाली. मग जवळपासची हॉस्पिटल पालथी घातली, पण व्यर्थ. मग रात्री दोन वाजता तुमच्या स्टेशनला फोन लावला. ‘सकाळी साहेब दहाला येतील, तेव्हा या.’ असा निरोप कोणीतरी फोनवर दिला. म्हणून आत्ता आलीयय.”
“नवरा कुठाय? सोबत नाही आला?”
“ते दुबईला असतात. तेथेच जॉब करतात!”
इन्स्पे.माधवरावांच्या कपाळावर आठ्या पडल्या. अश्या हरवल्याच्या तक्रारी हल्ली बरेच जण करू लागले आहेत. चार दिवसांनी ‘सापडले-सापडले’ करत येतात!
“घरात वातावरण कसे आहे? म्हातारा जड झाला म्हणून तुम्हीच त्याला हाकलून दिलाय का?” माधवरावांनी जरा धारधार शब्दात विचारले.
“अहो, नाही हो! मी तशी सून नाही! जन्मदात्या बापाप्रमाणे सांभाळते त्यांना! हवी तरी माझी चौकशी करा कॉलनीत!” वासंती अश्या अचानक झालेल्या आरोपाने रडवेली झाली होती.
“ती तर करतोच! पण लक्षात ठेवा, त्यात काही तथ्य आढळे तर तुमची गय करणार नाही!” इन्स्पे.माधव गरजले.
कोठून या तक्रार करायच्या भानगडीत पडलो, असे क्षणभर वासंतीला वाटले. पण ते गरजेचे होते.
“म्हाताऱ्याचं नाव काय?”
“संपतराव!” वासंतीने सासऱ्याचे नाव सांगितले.
“ठीक! फोटो आणि तुमचा मोबाईल नम्बर ठेवून जा! आम्ही आमच्या पद्धतीने तपास करू! लागला शोध तर कळवू! तुम्हाला काही कळले तर लगेच कळवा!” माधवराव समोरच्या फायलीत डोकं खुपसत पुटपुटले.
वासंती हात जोडून त्या उग्र पोलीस ऑफिसरला नमस्कार करून स्टेशन बाहेर पडली.
०००
शेवटी त्याने तो निर्णय घेतला. सूर्यास्त झाला होता. अंधाराचे साम्राज्य पसरत होते. आज त्याला चांगले पिकलेले सावज हवे होते. आणि अशी मंडळी बागेत हमखास येत असते, हे त्याला ठाऊक होते. खरं सांगायचं तर त्याने एकजण हेरून पण ठेवला होता! इतर म्हाताऱ्या सारखा तो नातवंडाचं लचांड सोबत आणत नव्हता. कि कोणी, सुरकुतलेली म्हातारी, त्याच्या पाठीमागे लंगडत लंगडत चालत नसे. सडाफटिंग होता! इतरांसारखा हा म्हाताऱ्याच्या घोळक्यात कधीच नसतो. एकटाच बसलेला असतो. एकदम आयडियल टार्गेट! त्या म्हाताऱ्याचा चेहरा तो बुद्धिमान आणि अनुभवी असल्याचे सांगत होता. एस, आज यालाच गाठू!
आत्ता तो म्हातारा बागेतल्या ज्या सिमेंटच्या बाकड्यावर बसला होता, त्या बाकड्याच्या मागे बोगनव्हिलियाच्या डेरेदार थोरल्या झुडपाने सगळा प्रकाश अडवला होता.

“साडे सात वाजून गेले वाटत? चला पण निघावे लागेल! आज थोडा उशीरच झालाय! वासंती वाट पहात असेल!” तो म्हातारा घड्याळात पहात स्वतःशीच पुटपुटला. गुडघ्यावर हात टेकवून उठून उभा राहील. थोडावेळ थांबून तो सावकाश चालू लागला.
मुख्य रास्ता ओलांडून त्या अंधाऱ्या बोळीत तो शिरले. झालं, या गल्लीच्या टोकाला तर आपल्या कॉलनीची कंपाउंड वॉल सुरु होते. आज बुधवार, या गल्लीतील सगळी दुकान बंद असतात, म्हणून हा अंधार जाणवतोय, पण ऐरव्ही भक्क उजेड असतो.
अचानक म्हाताऱ्याला, आपल्या दोन्ही कानावर कोणीतरी दोन हाताचे तळवे अलगद धरले असल्याचा भास झाला. तो स्पर्श सुखावह होता. म्हाताऱ्याने मान हलवून पहिली. काहीच त्रास जाणवत नव्हता. फक्त डोळ्यावर झापड येत होती. तो जवळच्याच एका बंद दुकानाच्या पायरीवर बसला. त्याने डोळे क्षणभर बंद केले आणि त्याच्या डोळ्यापुढे, त्याच्या जन्मापासूनचा भूत काळ चित्रपटासारख्या दिसू लागला. अंधुक बालपण, शाळा, किशोरावस्था, पहिलं प्रेम, कॉलेज, नौकरी—————–.
मग एकदम अंधार पसरला. त्याने डोळे उघडले. समोरच्या दिव्याच्या प्रकाशाने त्याचे डोळे दिपले. समोर सगळंच अनोळखी दिसत होत!
“काका, असे या येथे का बसलात?” कोणी तरी विचारत होते. त्याच्या आसपास बरेचजण जमले होते.
“तुम्ही कोठे रहाता? पत्ता सांगा, नाहीतर घरचा मोबाईल नंबर सांगा! फोन करतो घरी!”
“तुमचं काय नाव आहे?”
काय आहे नाव माझं? मी येथे कसा? मी कोण? हा कोणता परिसर? कोणतं गाव?
त्या म्हाताऱ्याला काही आठवेना! जणू त्याची बुध्दितला आठवणींचा कप्पा कोणी तरी चोरून नेला होता!
पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजू लागला, तशी जमलेली माणसे विखुरली.
कोणी तरी पोलिसांना फोन केला होता!
०००
वासंतीच्या फ्लॅटची बेल वाजली. तिने घाईत दार उघडले.
दारात इन्स्पे.माधव आणि त्यांच्या मागे बाबा उभे होते!
वासंतीचे दोन रडून रडून सुजले होते. इन्स्पे. माधव बोलायला जरी ‘रफ’ होते तरी, त्यांना माणसाची पारख होती.
“हे घ्या तुमचे ‘बाबा’. आणि आता सांभाळा! आजवरचं सांभाळणं वेगळं होत. आत्ताच वेगळं असेल!”
“म्हणजे?”
“म्हणजे, त्यांना भूतकाळाचे विस्मरण झालाय! इतकंच काय, त्यांना त्यांचं नाव पण आठवत नाही!”
इन्स्पे. माधव निघून गेले, तेव्हा वासंती डोक्याला हात लावून बसली!
या पोलिसाने आपल्याला या पोरीकडे का बरे आणून सोडले असेल? या विचाराचा भुंगा म्हाताऱ्याचे डोके पोखरत होता.
०००
भुकेल्या माणसाला, सणसणीत झुणका भाकरी आणि तीही गरमागरम मिळाल्यावर जे, अतीव समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरते, तसे शामकांतांच्या चेहऱ्यावर या क्षणी विलसत होते. गेले आठ दिवस त्यांनी स्वतःला आपल्या स्टडी रूम मध्ये बंद करून घेतले होते. ‘समाप्त’ हा शब्द टाईप करूनच, त्यांनी लॅपटॉप बंद केला! फ्रेश, गरमागरम, ब्रँड न्यू, कादंबरी तयार होती! अफलातून कल्पना यात त्यांनी साकारली होती. त्यांच्या नाव लौकिकास साजेलशीच ती कलाकृती झाली होती. चला. आता चार दोन महिने निवांत होते. दुबई नाहीतर सिंगापूरची ‘छोटा ब्रेक’ वाली टूर करायला हरकत नव्हती. हो पण आधी पब्लिशरला मेल करायचा होता. ‘कादंबरी’ तयार आहे म्हणून!
०००
म्हाताऱ्या संपतरावांना वासंतीच्या हवाली करून, इन्स्पे. माधव पोलीस स्टेशन परत आले, तेव्हा ते काहीश्या विचारात मग्न होते. गेल्या दोन वर्ष्यात, म्हणजे त्यांनी या स्टेशनचा चार्ज, घेतल्या पासून संपतरावांची तिसरी केस होती. साधारण उतार वयाच्या व्यक्ती हरवल्याची तक्रार यायची. आणि मग सापडल्याचा फोन किंवा निरोप यायचा. एका केस मध्ये त्यांनी कसे सापडले? कोठे सापडले? याची चौकशी केली तेव्हा,वयोमानाने विस्मरण होऊन घरचा रस्ता विसरल्याने समजले होते. पण आजच्या केस मुळे त्यांचं पोलिसी डोकं काही तरी गडबड असल्याचं सुचवत होत. या केसेस मध्ये काही कॉमन लिंक असेल काय?
त्यांनी हवालदार हरीशला कामाला लावले. गेल्या पाच वर्षातील वयस्क लोकांच्या लॉस्ट अँड फौंड च्या फाईली काढायला सांगितल्या! काय येडचाप साहेब नशिबी आलाय? साला वैताग नुसता! बाकी लोक ‘केस’ कशी फाईल होईल बघतात, अन हा बाबा? जुन्या फाईली, अन त्या हि मसणवट्याच्या रस्त्याला लागलेल्या म्हाताऱ्याच्या! पण सांगणार कोण? गोणपाटात कोंबून माळ्यावर फेकून दिलेल्या फाईली काढताना हरीश वैतागला होता.
गेल्या पाच वर्षात सहा म्हातारे हरवल्याची नोंद होती. संबंधितांचे फोन नंबर त्यांनी समोरच्या पॅडवर लिहून घेतले. त्यातील एक त्यांना माहित होता. संपतरावांची केस तर ताजीच होती. राहिले चार.
त्यांनी फोन उचलला.
“हॅलो, मी इस्पे. माधव बोलतोय! तुमचे आजोबा, हरवल्याची तक्रार तीन वर्षा पूर्वी तुम्ही केली होती. नंतर सापडल्याचे कळवले होते. मला सांगा ते आता कसे आहेत?”
“सर, ते गेल्यावर्षीच वारले! पण ती तक्रार, ते सापडल्या मुळे आम्ही मागे घेतली होती! त्याचे आता काय निघाली?” समोरचा त्यांच्या फोन मुळे चांगलाच घाबरल्याचे त्यांना जाणवले.
“काही विशेष नाही. फक्त एकच विचारायचे होते, ते वारले तेव्हा त्यांची स्मरण शक्ती कशी होती?”
“अहो, कशाची स्मरणशक्ती? ते सापडले तेव्हाच टोटली ब्लॅंक होते! ते शेवट पर्यंत!”
“थँक्स!” माधवरावांनी फोन कट केला.
त्यांनी दुसरा फोन नंबर फिरवला.
०००
एखादी गोष्ट डोक्यात घेतली कि माधव झपाटल्या सारखे कामाला लागत. त्यांनी संपतरावांचा शेवटचा दिवस ट्रेस करायला घेतला. आणि ते त्या बागेपाशी येऊन ठेपले, जेथे संपतराव रोज संध्याकाळी येऊन बसत असत. त्या बागेत रोमिओंचा त्रास वाचवण्यासाठी त्यांनीच cctv गेल्या वर्षी बसवले होते. त्यात संपतराव हरवले त्या दिवशीची रेकॉर्डिंग असणार होती!
०००
शामकांतच्या दारावरली बेल वाजली. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. कारण या वेळेस कोणीच अपेक्षित नव्हते. कोण असेल? त्यांनी दार उघडले. दारात एक रुबाबदार पोलीस अधिकारी उभा होता.
“मी इन्स्पे. माधव!”
रिमलेस ग्लासेस मधून दोन किंचित हिरवट झाक असलेले शामकांतचे डोळे माधवरावांनवर रोखलेले होते.
“माझ्याकडे?”
“हो! या बाजूला आलो होतो, थोडे काम होते. आणि थोडी सवड पण होती. एक महान कादंबरीकार याच भागात असल्याचे समजले. म्हणून आलोय!” इन्स्पे.माधव दारात आडवे उभे असलेल्या शामकांताना किंचित बाजूला सारून घरात घुसले. अर्थात शामकांताना ते खटकले. शेवटी खाकी वर्दीचा माज!
तोवर इन्स्पे.माधव सोफ्यात विसावले होते.
“बोला, ऑफिसर!” त्यांच्या समोरच्या आसनावर बसत शामकांतानी विचारले.
“गेल्या बाबाविस तारखेस जवळच्याच बागेतून, एक वृद्ध गृहस्थ, संपतराव हरवले, आणि स्मृतीभृंश झालेल्या आवस्तेत सापडले!”
“वार्धक्यामुळे होत असं कधी कधी! असं माझ्या वाचण्यात आलाय! पण त्याच काय?”
“काही नाही! पण या आधी हि अशाच चार केसेस घडून गेल्यात!”
“असतील. पण त्याचा माझा काही संबंध आहे का?”
“तेच तर पहायला आलोय! संपतरावं केस मध्ये, तुम्ही त्याच बागेत त्याच वेळीस होता!”
“अहो, ते सार्वजनिक ठिकाण आहे, माझ्या सारखे अनेक जण तेथे होते! आणि तुम्हाला काय सुचवायचंय?” शामकांताचा आवाज थोडा कठोर झाला.
“फार लांब कशाला तुमच्या शेजारचे शंकरकाका, असेच रात्रीतून स्मरणशक्ती गमावून बसले! खरे तर मी त्यांच्या कडेच आलो होतो. आणि शेजारी म्हणून तुमच्याकडे चौकशी करावीशी वाटली.”
“त्याला दोन वर्ष झालीत!”
“लेखक महाराज, मला या साऱ्या केसेस मध्ये तुमचा कोठे तरी संबंध आहे असं वाटतंय!” आपल्या बेदरकार स्वभावानुसार माधवराव आरोप लावून मोकळे झाले.
आणि अचानक शामकांताना ‘तो’ जवळपास असल्याचा भास झाला. त्यांनी इन्स्पे.माधव बसले होते, त्यांच्या पाठीमागच्या आरश्यात नजर टाकली. ‘तो’ माधवरावांच्या पाठमोऱ्या प्रतिबिंबाच्या मागेच उभा होता! याला न स्मरण करता कसा काय टपकला?
“तुमच्या ‘वाटण्याचा’ माझा काही संबंध नाही! आपलीकडे योग्य पुरावा असेल तर कायदेशीर कारवाई करा! आणि आता माझी लेखनाची वेळ झाली आहे. तेव्हा —- ”
“मी हि मोकळा नाही! फक्त शेवटचा प्रश्न! आज तुमच्या नवीन कादंबरीची प्रमोशन ऍड पहिली. कादंबरीचे नाव ‘संतापी संपत!’ बरोबर? दोन वर्षा पूर्वीची कादंबरी होती, — शंकरा, तुझ्या साठीच!— हा योगायोग कसा जुळून आला!”
“ऑफिसर, हा तुमचा भ्रम आहे! पुरावे गोळा करा आणि या वॉरंट घेऊन!”
“ते तर करीनच! तो वर सावध रहा! बाय लेखक महाशय!”
इन्स्पेक्टर माधव शामकांतच्या फ्लॅट बाहेर पडले.
तसा ‘तो’ आरशातून बाहेर आला आणि शामकांतच्या शरीरात विलीन झाला. आणि ते बाहेर पडले.
०००
शामकांतांच्या स्टडीरूम मध्ये ते नवीन कादंबरीची रूपरेषा पक्की करत होते. आज पुन्हा ‘त्याने’ त्यांना मदत केली होती. नुस्ते कथाबिजच नाहीतर कथेतील सगळे प्रसंग सुचवले होते. प्रत्येक माणूस एक ‘कादंबरी’ जगात असतो, फक्त त्याच्या मेंदूतील आठवणींचा कप्पा पाहता आला पाहिजे, चोरून का होईना! पण ‘हा’ मारुती सारखा त्या माणसाचा सगळा मेंदूच रिकामा करून आपल्या पुढे रिता करतो! तरीही ‘त्याचे’ आभार मानणे गरजेचे होते.
०००
‘त्याचे’ आभार मानण्याच्या विचार मनात आला तसा, त्यांना ‘त्याची’ पहिली भेट आठवली. जेव्हा त्यांना ‘लेखक’ म्हणून थोडि फार प्रसिद्धी मिळत होती. नेमके तेव्हा, त्यांना कथा बीजांची चणचण जाणवू लागली. त्याने लिखाण त्यामुळे आडून पडू लागले होते. ‘कोणी तरी हि बीज सुचवली तर?’ हा विचार त्यांच्या मनात रुंजी घालू लागला. एके रात्री, अचानक त्यांना जाग आली. कशाने जाग आली असेल? काही तरी आवाज झाला होता. कोणीतरी काहीतरी खुसपुसल्या सारखे बोलत असल्याचा त्यांना भास झाला. त्यांनी कान टवकारले.
“मी येवू का? तुला ‘गोष्टी’ कोठे मिळतात सांगायला!” याखेपेस त्यांना स्पष्ट ऐकू आले. त्यांची भीतीने चांगलीच गाळण उडाली. आवाज त्या आरशातून येतोय का? तो आरसा त्यांनी गेल्या महिन्यात एका जुन्या वस्तू संग्रहालयातून घेतला होता.
कोण असेल? भूत? कि भास?
येऊ देत. परवानगी मागताय म्हणजे सोबर असावं.
“मी येऊ का ?” पुन्हा विचारणा झाली. हा आवाज त्या डेकोरेटिव्ह आरशातूनच येत होता!
“कोण आहे? लपून काय विचारतोय्स? समोर ये!”
आरसा आतून फिकट निळ्या रंगात उजळला. एक मानवाकृती काळीछाया, खिडकीतून उतरावी तशी त्या आरशातून उतरली आणि त्यांच्या समोर उभी राहिली.
“धन्यवाद. मला या आरश्याच्या बंधनातून सोडवल्या बद्दल!” ती आकृती म्हणाली.
शामकांताना एव्हाना धीर आला होता. जे काय समोर होते ते घातक दिसत नव्हते.
“ते कथेचं काय म्हणत होतास?”
“हा, कथा! काय कि प्रत्यक्ष सजीव हि एक कथा असते. मला ती वाचता येते. पण मला ती सांगता येणार नाही! तशी माझ्यावर बंधन आहेत.”
“मग? काय उपयोग तुझा?”
“आहे! करून घेतलास तर आहे!”
“कसे?”
“मी तुझ्या शरीरात प्रवेश करीन, मग तू तुझे दोन्ही हात त्या व्यक्तीच्या कानावर ठेव. त्या व्यक्तीच्या आजवरच्या सगळ्या स्मृती तुझ्या मेंदूत जमा होतील! आणि निसर्गनियमा प्रमाणे कालांतराने विस्मरणात जातील. तोवर तुझे लेखनाचे काम होऊन जाईल! पण हे फुकट नसेल!”
“फुकट नसेल म्हणजे? या बदल्यात तुला काय अपेक्षा आहे?
“एक सावज तुलाच पहावे लागेल, दोन प्रत्यकवेळी मला तुझ्या देहात प्रवेशाची अनुमती द्यावी लागेल, त्या नंतर तुझ्या देहावर माझी हुकूमत असेल. मी ते वापरीन. अर्थात त्या सावजाच्या स्मृती तुझ्या मेंदूत जमा होई पर्यंतच! मग मी परत या आरश्यात राहीन.”
“पण तुला बोलवाचे कसे?”
“सोपंय! मला आवाहन करायचे.-हे, कथादात्या अस्तित्वा! मदत करा! प्रगट व्हा!- मग मी येतो!”
शामकांताना पहाटे कधीतरी झोप लागली.
सकाळी ते घाईत विसरूनही गेले. पण संध्याकाळी शेजारचे शंकरकाका नेहमी प्रमाणे गप्पा मारायला आले. या पंचाहत्तरीच्या म्हाताऱ्याच्या आठवणींचा साठा धुंडाळावा का? किती आणि कसा स्ट्रगल केला असेल? त्यांनी त्या कथादात्या अस्तित्वाला आवाहन केले. तो आला. त्यांच्या शरीरात सामावला. शंकरकाकांच्या स्मृती त्यांच्या मेंदूत जमा झाल्या!
प्रयोग यशस्वी झाला होता! या पुढे त्यांना कधीच कथा बीजांचा तुटवडा पडणार नव्हता!
०००
त्यांनी कथेचा मथळा लिहला.– जांबाज इन्स्पे. माधव!
तेव्हा सायरन वाजवत पोलीसची पेट्रोल व्हॅन बारा नंबरच्या लेनकडे धावत होती.
“एक पोलीस अधिकारी विमनस्क स्थितीत बारा नंबरच्या लेन मध्ये फिरतोय!” कोणीतरी पोलीस कंट्रोलला फोन केला होता!

— सु र कुलकर्णी.

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..