नवीन लेखन...

” मधल्या सुट्टीतील डबा “

या लेखाला खरेतर मी “पाणवठे ” असे नांव ठरविले होते. सहवासासाठी तहानलेले जीव एखादा पाणवठा हेरून/ठरवून भेटतात आणि तृप्त होऊन परततात असं काहीसं माझ्या डोक्यात होतं. पण आज अचानक मित्र #सुनीलकुलकर्णीने कालच्या आमच्या छोटेखानी भेटीवर अभिप्राय देताना “मधल्या सुट्टीतील डबा ” हा उत्स्फूर्त शब्द लिहिला आणि मी म्हणालो- वाहवा ! पर्फेक्ट

मागे वळून बघण्याच्या वयात आल्यानंतर सगळ्यांनाच स्नेहमेळाव्याची/बालपण भेटण्याची ओढ लागते. आम्ही त्याला अपवाद नाही. माझ्याकडे भेटीचे असे तीन पर्याय आहेत- भुसावळचे शाळूसोबती, सोलापूर हदे चे मित्र आणि सांगलीच्या वालचंदचे स्नेहगडी ! संधी मिळेल तशी मी प्रत्येक पाणवठ्यावर हजेरी लावत असतो.

या आठवड्यात दोनदा मधली सुट्टी झाली-

६ जुलैला शाम्याचा फोन आला- ” शिरीष पुण्यात आलाय. संध्याकाळी भेटायचे का?” दिवसभर जमवाजमवीत गेला आणि सायंकाळी सात वाजता कोथरूडच्या हॉटेल पृथ्वीत जेवायला भेटायचे ठरले. पाचजण तेवढ्या पावसात जमलो, एक मित्र रहदारी+पाऊस+वाहतूक मुरांब्याला कंटाळून अर्ध्या वाटेतून परतला. पावसाळी मेनू (चहा+कांदा भजी ) फॉलोड बाय मस्त जेवण. सोबतीला न संपणाऱ्या गप्पा, सेल्फी आणि निघताना सप्टेंबर अखेरी दोन दिवस अलिबाग अथवा लोणावळा अशी दोन दिवसांची तजवीज करून निघालो.

घरी येऊन पत्नीला सांगितले- “आता नऊ तारखेला सोलापूरची मधली सुट्टी- चिंचवडला राजन च्या घरी ! ” तिने (स्वतःच्या) कपाळावर हात मारून घेतला.

काल सकाळी ११ पासून सायंकाळी सहा पर्यंत आम्ही वीसेकजण एकत्र होतो. सोलापूरहून चक्क एक मित्र आलेला. दोन-तीन नवे चेहेरे ( पूर्वी न जमवू शकलेले) आणि आयत्या वेळचे दोन-तीन ड्रॉप आउटस (अपरिहार्य कौटुंबिक/व्यक्तिगत कारणाने आणि नंतर हळहळणारे) अशी गोळाबेरीज झाली.

समृद्ध बाल्याच्या आठवणींचे भेंडोळे गुंतवून ठेवत होतेच. राजेशाही सरबराई दिमतीला होती. राजनच्या घरातील दोन अन्नपूर्णा (पत्नी आणि मुलगी) यजमानपद भूषवीत होत्या. भक्कम नाष्टा आणि नंतर पिठले(झुणका)भाकरी (पर्याय पोळीचा), मसाला वांगी आणि चवीला शेवयाची खीर हा मनसोक्त बेत होता. सोबतीला सोलापुरी शेंगा चटणी !

आणि नंतर राजू मोहोळकरची एकटाकी अडीच तासांची मैफिल ! सुरुवातीला आषाढी असल्याने दोन विठ्ठल भक्तीपर अभंग झाल्यावर तो नेहेमीप्रमाणे “आपकी फर्माईशपर ” उतरला. अतिशय हळुवार,तरल गाण्यांची झड लागली-बाहेरच्या पावसावर मात करणारी !

” रात फुलोंकी ” (बाजार), “ओ मेरी ” (वक्त), ” जलते हैं जिसके लिये ” ( रेशमी तलत -सुजाता), डोळ्यांत पाणी आणणारा बलराज- “तुझे सूरज कहू या चंदा ” (एक फुल, दो माली) या स्थानकांवरून आम्हांला फिरवून आणत राजूने मैफिल थांबवली – ” या जन्मावर, या जगण्यावर” च्या प्लॅटफॉर्मवर ! वाटेत “हत्या ” (गोविंदा) मधील एक अपरिचित अंगाई चालीचे गाणे त्याने आवर्जून ऐकविले- लताच्या दोन ओळींसाठी ( येसूदासने प्रामुख्याने गायलेले- ” जिंदगी महक जाती हैं ! “) आणि फेब्रुवारीनंतर लताच्या आठवणीने डोळे पुन्हा गहिवरले.चंदनदासच्या दोन सुंदर गझलही झाल्या. सरींवर सरी !!

निघताना पुन्हा भेळ/चहा असे आदरातिथ्य आणि फोटोसेशन !

शाळेत असताना मुलींच्या वाऱ्यालाही उभे न राहणारे (काही सन्माननीय अपवाद वगळता, जे काल आलेले नव्हते) आता ” अरे,तुरे आणि बिनधास्त एकमेकांवर शेरेबाजी करणारे ” असा हा सत्तेचाळीस वर्षांचा प्रवास नकळत होऊन गेला.

काहीजण मधल्या सुट्टीच्या आधीच जग सोडून निघून गेलेले, त्यांच्या आठवणी निघत गेल्या. ” दो घडी जीनेकी मोहलत मिली हैं सबको ” यावरचा विश्वास नव्याने भेटला. फक्त मेडिकोन्नाच कळू शकेल अशा क्वचित आजारांना मिरविणाऱ्यांचा जिक्र झाला तर बरीच मंडळी आजी-आजोबा या पदवीवर आता बऱ्यापैकी स्थिरावली असताना एकीने चक्क मी “पणजी ” झालेय असे वृत्त दिले.

शाळेत दोन दिवसांचा मोठ्या प्रमाणावरील स्नेहमेळावा होत असतोच, पण त्याचे असे ” लघू ” रूप आजकाल आमच्या पचनी पडले आहे. शक्य असेल त्यांनी जमायचे आणि ” थोडा हैं, थोडे की जरुरत हैं ” या गाण्यातील मधली जागा भरून काढण्यासाठी भेटायचे.

ऑगस्ट अखेरी “गोकुळ ” रिसॉर्ट ला एक-दिवसीय सहल ठरवून आम्ही पांगलो.

दरम्यान मध्ये मध्ये भुसावळकर /सोलापूरकर डेक्कनच्या हॉटेल “सुभद्रा “वर भेटतीलच आणि मधली सुट्टी संपल्याची घंटा व्हायच्या आत डबा खाऊन आपापल्या तुकडीत परततीलही!

मित्रा राजन , नेहेमी माझ्या पोस्टमध्ये सोलापूरपेक्षा भुसावळ जास्त असते असे निरीक्षण तू एकदा नोंदविले होतेस, आज अंशतः भरपाई !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..