नवीन लेखन...

धक धक गर्ल माधुरी दीक्षित

‘सुंदरता’, ‘नृत्य’ आणि ‘अभिनय’ यांचा सुरेख त्रिवेणी मिलाफ म्हणजे माधुरी दीक्षित. तिचा जन्म १५ मे १९६७ रोजी झाला. पूर्वाश्रमीची माधुरी शंकर दीक्षित आणि आजच्या माधुरी श्रीराम नेने.

माधुरी ही ख-या अर्थाने सौंदर्य, अभिनय आणि नृत्य यांचा अभूतपूर्व एकत्रित संगम आहे. तिच्या आधीच्या सर्व सुपरस्टार या कुठे ना कुठे कमी होत्या. अपवाद फक्त रेखाचा. मधुबालाला नृत्यात मास्टरी नव्हती तर हेमा मालिनी सौंदर्यवती असली तरी अभिनयात डावी होती. श्रीदेवी नृत्यात काही प्रमाणात कमजोर होती आणि तिचे सौंदर्य हे काही परिपूर्ण नव्हते. माधुरी मात्र पहिली परिपूर्ण सुपरस्टार होती.

माधुरी दीक्षित यांनी १७ वर्षांची असताना पहिला चित्रपट राजश्री प्राँडक्शनचा ‘अबोध’ केला. ‘अबोध’ कुणी फारसा पाहिला नाही. पुढे माधुरी दीक्षित यांनी ‘मोहरे’, ‘मानवहत्या’ असे ‘बी’ ग्रेडचे चित्रपट केले. मीनाक्षी शेषाद्री प्रमुख भुमिकेमध्ये असतांना ‘स्वाती’ आणि ‘आवाराबाप’ या चित्रपटांमध्ये माधुरी यांनी सहाय्यक भूमिका केल्या. ‘उत्तर दक्षिण’ हा माधुरी दीक्षित यांचा पहिला व्यावसायिक चित्रपट. ज्या माधुरी यांनी मीनाक्षी सोबत सुरवातीला चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या त्याच ‘घई कॅम्प’ मध्ये माधुरीने दिमाखदार प्रवेश करून मीनाक्षीचीही ‘छुट्टी’ केली. त्यावेळी मराठी मुली फारश्या हिंदी चित्रपटात यशस्वी होत नव्हत्या, अपवाद फक्त नूतन, स्मिता पाटील आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा. पण ‘तेजाब’च्या आधी ओळीने ८ अपयशी चित्रपट देऊन ‘एक दो तीन ..’ असे म्हणत माधुरीने घवघवीत यश मिळवले.

नंबर १ च्या पदावर विराजमान होणारी माधुरी ही पहिली मराठी अभिनेत्री ठरली. जे निर्माते तिला ‘फिजीक’ नाही असे म्हणायचे त्यांनाच तिच्यात कमालीचे ‘सेक्स अपील’ दिसू लागले. तिच्या दिलखेचक अदांनी तर संपूर्ण सिनेसृष्टीला दिवाणे केले. तिची ‘हम आपके है कौन’ मधील काम कमालीचे हिट ठरले. माधुरीच्या नावाचे ‘गाणे’ (माधुरी दीक्षित मिली रस्ते में..) आणि ‘चित्रपट’ (मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ) देखील आले. तिने २ चित्रपटात (धारावी, बड़े मियां छोटे मियां) ‘माधुरी दीक्षित’चीच भूमिका केली. माधुरी दीक्षितची जोडी अभिनेता अनिल कपूरसोबत खूपच फेमस झाली होती.

अनिल-माधुरीच्या जोडीने त्याकाळी `तेजाब`, परिंदा`, `राम-लखन`, `किशन कन्हैया`, `जीवन एक संघर्ष`, `जमाई राजा`, `खेल` `बेटा`, `जिंदगी एक जुआ`, `राजकुमार`, `पुकार` हे हिट सिनेमे केले. त्यांनी केलेल्या जवळपास ५७ चित्रपटांपैकी १६ चित्रपटांतील भूमिकांसाठी त्यांना निरनिराळ्या पुरस्कारांसाठी ‘नामांकन’ मिळाले, तर ५ वेळा त्यांनी प्रतिष्ठेचा ‘फिल्म फेअर’ पुरस्कार दिल, बेटा, हम आपके हैं कौन, दिल तो पागल है, देवदास या चित्रपटांसाठी पटकावला. ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटानंतर तर माधुरी दीक्षित या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. मात्र त्यानंतर आलेले राजकुमार, प्रेमग्रंथ, कोयला, मृत्युदंड, महानता असे चित्रपट न चालल्याने ‘माधुरीची जादू संपली..’ अशा शब्दात समीक्षकांनी त्यांच्यावर टीका करणे सुरु केले. ‘दिल तो पागल है’ प्रदर्शित झाल्यावर सुरवातीला समीक्षकांनी करिष्मा कपूरचेच अधिक कौतुक केले होते. मात्र सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘दिल तो पागल है’ साठी मिळाल्यानंतर याच समीक्षकांचे माधुरीने आभार मानले. कारण त्यांच्याचमुळे अधिक मेहनत करायची प्रेरणा मिळाली असल्याचे माधुरी दीक्षित यांनी नमूद करून आपल्या समीक्षकांच्या टीकेला चोख उत्तर दिले.

प्रसिध्द चित्रकार एम.एफ.हुसेन माधुरीवर अत्यंत फिदा असल्याने त्यांना एम.एफ.हुसेन ऐवजी एम.एफ. म्हणजे ‘माधुरी’ ‘फिदा’ हुसेन असे गमतीने संबोधले जायचे. माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित सर्वच नृत्यगीतं आज देखील लोकप्रिय आहेत. माधुरी दीक्षित यांची क्रेझ अजून देखील कायम आहे. माधुरी दीक्षित यांनी आपल्या सिने करियरमध्ये ७० सिनेमातून काम केले आहे. छोट्या पडद्यावर देखील त्यांनी ‘झलक दिखला जा’ द्वारे परीक्षक म्हणून रंगत आणली होती. माधुरी आणि संजय हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात होते, ते लग्नही करणार असल्याची चर्चा होती.

माधुरी दीक्षितने फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर काहीच वर्षांत आपले बस्तान बसवले. संजय दत्तही त्याकाळात एक प्रसिद्ध अभिनेता होता. दोघांच्या प्रसिद्धीचा विचार करून त्यांना साजन या चित्रपटासाठी साईन केले गेले. हा चित्रपट आणि त्यातील गाणी प्रचंड गाजली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान माधुरी आणि संजय एकमेकांच्या प्रेमात पडले, असे म्हटले जाते. साजन हा चित्रपट हिट झाल्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये संजय आणि माधुरी यांची जोडी झळकली. खलनायक या चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत माधुरी आणि संजयच्या अफेअरची चर्चा सगळीकडेच सुरू झाली होती. माधुरीच्या कुटुंबीयांनी संजय आणि तिच्या नात्याला विरोध केला होता असेही म्हटले जाते.

संजयच्या आयुष्यात माधुरी येण्याआधी त्याचे लग्न झालेले होते. आज माधुरी दीक्षित या अमेरिकेमध्ये अनेकवर्षे स्थायिक होऊन देखील आपल्या दोन मुलांना पाश्चिमात्य संस्कृती ऐवजी भारतीय संस्कृतीत वाढवत आहे. लग्नानंतर माधुरी दीक्षित यांनी `गुलाब गॅंग` आणि `डेढ़ इश्किया` या सिनेमातून कमबॅक केले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

माधुरी दीक्षित यांची गाणी

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..