काही वर्षांपूर्वी विक्रमला एका अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. त्याच्या कनिष्ठाबद्दल त्या व्यक्तीला विक्रमला काही सांगायचे होते, आणि ते फारसे सुखद, रुचणारे नव्हते. अर्थात त्या अनोळखी व्यक्तीला विक्रमच्या सहकाऱ्याला अडचणीत आणायचे नव्हते. पण एका कॉन्फरन्स मध्ये म्हणे विक्रमच्या त्या सहकाऱ्याने त्या व्यक्तीला असभ्य भाषेत संबोधून विक्रमच्या कंपनीचे एक उत्पादन विकायचा प्रयत्न केला होता. विक्रमच्या कंपनीचे बाजारात चांगले नांव असल्याने त्याला विक्रमच्या कनिष्ठाचे वर्तन चांगलेच खटकले होते आणि त्यामुळे विक्रमच्या कंपनीचे नांव बदनाम होईल असे वाटले असल्याने त्याने विक्रमशी संपर्क साधला होता.
साहजिकच विक्रम भडकला होता तो फोन झाल्यावर ! मात्र भावनिक प्रसंगांमध्ये तात्कालिक प्रतिक्रिया द्यायची नसते हे अनुभवाने शिकलेल्या विक्रमला थोडा वेळ थांबायचे होते. दुसऱ्या दिवशी विक्रमने आपल्या कर्मचाऱ्याला बोलावून घेतले. त्याला वाटले होते की सगळं ऐकल्यावर तो कर्मचारी पटकन आपली चूक मान्य करून माफी मागेल. आश्चर्य म्हणजे सगळं झाल्यावर कर्मचारी म्हणाला- ” आमचे तर त्या दिवशी सकारात्मक बोलणे झाले होते. कोठलाही वाद -विवाद झाला नव्हता.”
विक्रम गोंधळला आणि त्याला काहीतरी गल्लत झाल्याची जाणीव झाली. आयुष्यात एकाच प्रसंगाबद्दल दोन माणसे परस्परविरोधी बोलत असतात आणि त्याची कारणे आपापली असू शकतात. मुख्य म्हणजे ते स्वाभाविक असते.
धडा पहिला- काहीही सांगताना माणसे स्वतःला ” चांगल्या प्रकाशात ” दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. इतकेच नव्हे तर समोरच्याला काळे फासून दाखविण्याचा प्रयत्न करतात. याला COGNITIVE DISSONANCE म्हणतात. आपण जर चांगले असू तर मग आपल्या हातून काही चुकीचे कसं घडेल या विचारांशी माणसे झुंजत राहतात.
गंमत म्हणजे या चुकीच्या कृत्याचे माणसे कालांतराने समर्थन करू लागतात आणि ते सत्य कधी समोरच येत नाही.
दुसरा धडा- नेतृत्व, पालक, वरिष्ठ म्हणून आपण कायम प्राथमिक आणि पहिल्यांदा कानी आलेल्या (फर्स्ट इन्फॉर्मशनने) वाहवत जातो आणि समोरची / दुसरी बाजू ऐकूनच न घेता सरळ न्यायाधीशाच्या खुर्चीत बसून फैसले /न्यायनिवाडे करतो, जे चुकीचे असू शकतात कारण ते अर्धवट, एकांगी माहितीवर आधारित असू शकतात. हा COGNITIVE BIAS चा प्रकार असतो. (माहितीच्या पहिल्या तुकडयावर विसंबून राहणे,आंधळा विश्वास ठेवणे)
आपले मेंदू त्या प्रथम कानी पडलेल्या व्हर्शन वरून आपली मते, निर्णय घ्यायला आपल्याला भाग पाडतात. हे अन्यायकारी असू शकते कारण नाण्याची दुसरी बाजू ऐकून घेणे आपण टाळतो किंवा ती बाजू OBJECTIVELY स्वीकारत नाही. पहिली छाप/इम्प्रेशन सहजी पुसता येत नाही. विशेषतः दुसऱ्या बाजूच्या सांगण्यातील सत्य बघायचे असेल तर हे आवश्यक असते.
सत्य या दोहोंमध्ये कोठेतरी दडलेले असते. म्हणून निर्णयापूर्वी थोडा श्वास घेऊन मग जजमेंट वाचावे. दरवेळी पहिले कथन बरोबरच असेल असे नसते.
मध्यम मार्ग सदैव भला !
“We all tend to tell the version of the story that makes us look good.”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply