नवीन लेखन...

मध्यमहेश्वर

हिमालय हा भारताच्या सांस्कृतिक भावजीवनातील एक अनन्यसाधारण विभुती आहे. भारताची सस्यशामल भूमी समृद्ध करणाऱ्या पवित्र नद्यांचा हिमालयात उगम झाला आहे. परंपरेने भगवान शंकराचे हिमालयाशी नाते जोडले आहे.

अशा शंकरानी आपल्या कायम वास्तव्यासाठी हिमालयाची निवड केली. पुराणांनी शंकराचे हिमालयाशी आलेले कोमल संबंध आल्हादाने उलगडून दाखवले आहेत. अनेक देव-देवतांचे क्रीडास्थान, निवासस्थान म्हणून हिमालय पुराण प्रसिद्ध आहे. कालिदासाने आपल्या कुमारसंभवाच्या आरंभीच हिमालयाला ‘देवतात्मा’ म्हणून गौरवले आहे. प्राचीन काळापासून स्वर्ग व पृथ्वी यांच्यातील मध्यस्थाची भूमिका हिमालयाने बजावली आहे. इथला निसर्ग, पावित्र्य, शांतता अनुभवण्यासाठी मुमुक्ष लोक जगाकडे पाठ फिरवून हिमालयाच्या आश्रयाला येतात व इथे सांडलेल्या स्वर्गीय तेजाच्या प्रभेमध्ये न्हाऊन लौकिक जीवनातील अंधाराचे शाप सुसह्य करायला समर्थ ठरतात. अशा या हिमालयात असेच एक पवित्र स्थान आहे ‘मद्महेश्वर’. कोणी या स्थानाला मध्यमहेश्वर असेही म्हणतात. मद्महेश्वर पंचकेदारातील दुसरे केदारस्थान समजले जाते. गढवाल हिमालयातील या स्थानाला निसर्ग सौंदर्याने भरभरून दिले आहे. हिमालयाच्या स्वर्गीय सौंदर्याचा एक अनुपम आविष्कार या ठिकाणी अनुभवायला मिळतो.

स्कंदपुराणाच्या केदारखंडातील ४७ व ४८ च्या अध्यायात या स्थानाचे वर्णन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, “हे मध्यमहेश्वर क्षेत्र केदारपुरीपासून तीन योजने दूर असून हे स्थान गुप्त ठेवावे पण जर कोणी मध्यमहेश्वराचे नुसते दर्शन जरी घेतले तरी तो सदैव स्वर्ग लोकात वास करेल.”

गुप्तकाशीपासून एक रस्ता केदारनाथकडे व एक रस्ता कालीमठकडे जातो. कालीमठला बस प्रवास संपतो व पदभ्रमंती सुरू होते.

‘कालीमठ’, सर्व बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेले हे स्थान. या स्थानाचे मूळ नाव ‘काविलथा’. हे स्थान एक सिद्धपीठ, महापीठ म्हणून ओळखले जाते. असे सांगतात की, रक्तबीजाचा वध केल्यावर कालिमातेने स्वत:चा शिरच्छेद करून घेतला व या स्थळी ती समाधिस्त झाली. या ठिकाणी कालिमातेचे मंदिर आहे. पण मंदिरात कोणतीही मूर्ती नसून श्रीयंत्र आहे व ते चांदीच्या आवरणाने झाकलेले आहे. वर्षातून एकदा मध्यरात्री हे यंत्र उघडले जाते. त्याची मंत्रघोषात श्रद्धेने पूजा केली जाते व परत यंत्र झाकले जाते. कालिमठला महालक्ष्मी व महासरस्वतीची पण मंदिरे आहेत व त्यांची पण नित्यनेमाने पूजाअर्चा होत असते. सर्वसाधारण या तिन्ही देवतांची मंदिरे एका ठिकाणी पहायला मिळत नाहीत व त्यांची पूजा होत नाही. पण कालिमठला मात्र हे पहायला मिळते. नवरात्रात येथे खूप मोठा उत्सव होतो. परिसरातील अनेक भाविक श्रद्धेने या ठिकाणी येतात. पूर्वी हे स्थान तांत्रिक विद्यासाधनेचे केन्द्र असावे, असा एक अंदाज आहे. कालिमातेच्या मंदिराची स्थापना आदिशंकराचार्यांनी केली असेही सांगितले जाते. परिसरात आणखीही छोटी मंदिरे आहेत. मंदिराजवळूनच सरस्वती नदीचा प्रवाह खळाळत आपल्या आवाजाने इथल्या शांततेला पावित्र्याची झालर चढवत असतो.

कालीमठ येथील शिव मंदिरात शंकर-पार्वतीची वैशिष्ट्यपूर्ण अप्रतिम मूर्ती आहे. चतुर्भूज शंकराच्या हातात धोत्र्याचे फूल व त्रिशूल आहे तर उजव्या मांडीवर पार्वती विराजमान आहे. ही मूर्ती आठव्या शतकातील असावी असा अंदाज आहे.

महाकवी कालिदासाचा जन्म या ठिकाणी झाला असावा असे काही तज्ज्ञ लोकांचे मत आहे.

कालीमठ ते रौलिक हे अंतर साधारण ८ कि.मी. आहे. पहिली काही थोडी चढणीची वाट संपल्यावर पुढचा रस्ता बराचसा सपाटीचा आहे. आजूबाजूला उंच पर्वतशिखरे. वाटेवर चीड पाईन वृक्षांची दाटी, मधेच पायात-पायात येणारे झरे, परिसरात उगवलेली फुले, पक्ष्यांचे गोड कुंजन, बघता बघता तीन साडेतीन तास कधी संपतात हेच कळत नाही. मग येते रौलिक, रौलिकला जाण्यासाठी उखीमठहून जीपसुद्धा उपलब्ध होतात.

रौलिक ही १००-१२५ घरांची वस्ती आहे. गावात पोस्ट, लाईट इ. सुविधा आहेत. या ठिकाणी राहण्याची जेवणाची व्यवस्था होते. आपल्याकडचे जादा सामान रौलिकला ठेवून गरजेपुरते सामान बरोबर घेतल्यास पुढे सोईचे ठरते.

रौलिक ते रांसी हे अंतर साधारण ६ कि.मी. आहे. पहिला १ कि.मी. रस्ता बराचसा सपाटीचा आहे. मग मात्र रस्ता चढावाचा आहे. पण उभी चढण अशी कुठेच नाही. रस्ता पूर्ण सुरक्षित व प्रशस्त आहे. पण उजाड आहे. त्यामुळे या मार्गावर थोडी दमछाक होते.

रांसीसुद्धा ५०-६० घरांचे गाव आहे. पण हे गाव प्रसिद्ध आहे तेथील राकेश्वरी देवीच्या मंदिरामुळे. गावातच राकेश्वरी देवीचे मंदिर आहे. नवरात्रात येथे खूप मोठा उत्सव होतो. या मंदिरात अखंड धुनी प्रज्वलित असते. त्यासाठी परिसरातील ग्रामस्थ लाकडे पुरवतात. ही धुनी कधी प्रज्वलित केली हे मात्र कोणालाही माहित नाही. मात्र खूप वर्षांपासून ती प्रज्वलित आहे, असे सर्वजण सांगतात. चंद्राला क्षय रोग झाला असता त्याने या ठिकाणी राकेश्वरी देवीची आराधना केली व देवीच्या आशीर्वादाने तो रोगमुक्त झाला, अशी आख्यायिका सांगितली जाते.

रांसी गावात राहण्याची, खाण्याची व्यवस्था होते. रांसी ते गौंडर हे अंतर साधारण ६ कि.मी. आहे. रांसीनंतर जवळजवळ ४ कि.मी. अंतराचा रस्ता खूपसा उताराचा आहे. रस्त्यावर झाडीपण आहे. त्यामुळे रस्त्यावर सावली असते. ऊन जाणवत नाही. मधूनच येणारी वाऱ्याची झुळूक सुखावत असते. शेवटचा २ कि.मी. रस्ता काहीसा चढणीचा-सपाटीचा आहे.

गौंडर हे मदमहेश्वरी नदीच्या काठावर वसलेले १००-१२५ घरांचे हे छोटेसे गाव आहे. या ठिकाणी राहण्याची-जेवणाची सोय होते. गौंडर परिसरात ‘बिच्छुकाटा’ नावाची झुडपे बऱ्याच प्रमाणात दिसतात. उघड्या अंगाला या वनस्पतीचा स्पर्श झाला की स्पर्श झालेल्या ठिकाणी भयंकर आग होते. तो भाग लाल होतो. २-३ तास तरी आग होत राहते. विशेष म्हणजे या वनस्पतीजवळ आणखी एक वनस्पती उगवते. झेंडुसारखी त्या वनस्पतीची पाने असतात. ही पाने आग होणाऱ्या जागेवर चोळली तर आग खूप प्रमाणात कमी होते. त्यामुळे या परिसरात फिरताना आजूबाजूला नजर ठेवून फिरावे लागते, सावधानी घ्यावी लागते.

गौंडर ते मदमहेश्वर हे अंतर साधारण १२ कि.मी. आहे. डोंगरात फिरताना अंतराचा नक्की अंदाज येत नाही. कोणी सांगेल तेच खरे मानायचे.

मदमहेश्वर हे स्थान एक उंच पहाडावर आहे. या स्थानाची उंची आहे ३२८९ मीटर्स. (१०,८५० फूट). ही वाट मात्र उभ्या चढणीची आहे. गौंडरपासून साधारण १ कि.मी. रस्ता उताराचा आहे. मदमहेश्वर पर्वताच्या पायथ्यापाशी मदमहेश्वरी नदी वाहते. या नदीवरील पूल ओलांडला की चढावाचा रस्ता सुरू होतो. साधारण २ कि.मी. अंतरावर खटरा ही वस्ती लागते व मग पुढे २ कि.मी. अंतरावर नानु ही वस्ती.

नानुची उंची आहे २९०० मीटर्स (९,५७० फूट). नानु ही वस्ती १०-१५ घरांचीच आहे. पण या ठिकाणीसुद्धा राहण्याची-खाण्याची सोय होते. या ठिकाणी एका फलकावर लिहिले आहे, ‘चढाईला घाबरू नका, अनुपम दृश्ये तुमची वाट पहात आहेत.’

मद्महेश्वराचा निसर्ग आता मात्र खुलायला लागतो. सभोवताली उंच पर्वतशिखरे, खोल दऱ्या, पर्वतशिखरावरून दरीकडे झेपावणारे पांढरे शुभ्र प्रपात. पर्वतशिखरावरील पांढराशुभ्र बर्फ उन्हाने चमकत असतो. निळ्याभोर आकाशात ढग आरामात पहुडलेले असतात तर काही ढग पर्वतशिखरांच्या गळ्यात हात घालून बसलेले असतात. प्रत्येक पावलावर निसर्गाचे वेगळे मोहक रूप समोर येत असते.

नानुनंतर साधारण ४ कि.मी. अंतरावर येते ‘कुद’ ही वस्ती. हा रस्ता चढाचा तर काही ठिकाणी सपाटीचा आहे. वाटेवर बऱ्यापैकी झाडी आहे. पानगळीमुळे रस्त्यावर वाळलेल्या पानांचा सडा पडलेला असतो. त्यामुळे पावले सांभाळून टाकावी लागतात. नाहीतर घसरण्याची भीती असते. तसा हा रस्ता पूर्ण सुरक्षित आहे. प्रशस्त आहे. एक चढ सोडला तर अवघडपणा, धोका असा या रस्त्यावर कुठेच नाही. कुद ही सुद्धा १०-१२ घरांची वस्ती आहे. कुदहून मद्महेश्वर हे अंतर साधारण २ कि.मी. आहे. हा रस्ता मात्र जवळजवळ सपाटीचा आहे.

हिरव्यागार कुरणावर मद्महेश्वराचे मंदिर उभे आहे. या कुरणातून स्फटिक जलाने एक झरा कायम वहात असतो. कुरणावर निळ्या, जांभळ्या, पांढऱ्या, लाल रंगाची चिमुकली फुले बहरलेली असतात. सर्वत्र हिरवाई चीड-पाईन व इतर वृक्षराजीने नटलेला हा परिसर जुलै ऑगस्ट महिन्यात निरनिराळ्या फुलांनी बहरून जातो. जवळ असलेले हिमाच्छादित चौखंबा पर्वतशिखर या सर्वावर नजर ठेऊन बसलेले! जणूकाही या स्थानाच्या रक्षणाची जबाबदारी या पर्वतशिखरावर दिली आहे आणि त्याला सोबत करत असतात आसमंतात पसरलेली आदिअनादीअनंत शाश्वत हिमालयाची पर्वतशिखरे! हे निसर्गाचे वैभव पाहिल्यावर वाटू लागते की परमेश्वराने जेव्हा हिमालयाची निर्मिती केली तेव्हा त्याला सौंदर्य पाहावयाचे वेड लागले असावे.

सर्व हिमालय सुंदर आहे. पण मध्यमहेश्वर व गंगोत्रीच्या वाटेवरील हरसिल या ठिकाणी निसर्ग उधळला आहे. या दोन स्थानांचे वर्णन शब्दात करणे. खूप अवघड आहे.

आकाशात मेघमाला विहरत असतात. बर्फाच्छादित शिखरे चमकत असतात. कुरणात चिमुकली फुले माना डोलावत आपल्याकडे लक्ष वेधून घेत असतात. पायाखालची हिरवळ आपल्या मखमली स्पर्शाने पाय गोंजारत असते तर शेजारच्या निर्झराची खळखळ या सौंदर्याचे वर्णन करत असते. पाहता पाहता अचानक सर्व धुरकट होऊ लागते व धुक्यात सर्व काही अदृश्य होते. शरीराला ओलावा जाणवू लागतो. वाऱ्याची एखादी झुळूक अंगावर शिरशिरी आणते. मध्येच पाण्याचे थेंब उडू लागतात तर मधेच बर्फाचे साबुदाण्यासारखे बारीक कण! वातावरणात निस्तब्ध शांतता पसरते. सर्व परिसर ढगात लपेटून जातो.

हळूच एखादी प्रकाश शलाका या धुक्याला भेदत जमिनीचा वेध घेऊ लागते. तिचा मागोवा घेत प्रकाशकिरण धुके भेदू लागतात. आजूबाजूचा परिसर दृश्य होऊ लागतो. धुक्यात हरवलेले मध्यमहेश्वराचे मंदीर हळूहळू दिसू लागते. वाऱ्याबरोबर धुके दूर पळू लागते व बघता बघता आसमंतातला निसर्ग हसू लागतो. दूर काळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवर हिमाच्छादित पर्वतशिखरे, सर्व परिसर संध्याकाळच्या सूर्यकिरणांची झालर घेऊन झळाळू लागतो. हळूच एखाद्या पर्वतशिखरावर हिमज्वाळा पसरते. तर मध्येच अचानक काळ्या ढगावर वीजेची रेषा तेजाळते. या सर्वात आकाशात इंद्रधनुष्याची कमान कधी उभी राहते हे कळतच नाही. अवर्णनीय हिमालयाचे एक अनुपम रूप समोर उभे असते. आणि मग कवी सुमित्रानंदन पंत यांच्या काव्याच्या ओळींची आठवण येते.

रवि की किरणे जिसे स्पर्श कर ।
हो उठती आलोक निनादित ||
जिस पर उषा संध्या की छबि ।
आदि सृष्टी सी हो स्वर्णांकित ||

अशी श्रद्धा आहे की मद्महेश्वरचे मंदिर भीमाने बांधले. असेही सांगतात की, केदारनाथ, मद्महेश्वर व तुंगनाथ ही मंदिरे पांडवांनी बांधली पण काही कारणाने रूद्रनाथ व कल्पेश्वरची मंदिरे ते बांधू शकले नाहीत. आजही केदारनाथ, मद्महेश्वर व तुंगनाथ या ठिकाणी मंदिरे आहेत पण रूद्रनाथ व कल्पेश्वर या ठिकाणी मंदिरे नाहीत.

पुरातत्त्व खात्याच्या अनुमानानुसार या ठिकाणी एक प्राचीन मंदिर होते. १४-१५ च्या शतकात त्या मंदिराची पुर्नबांधणी किंवा जीर्णोद्धार केला असावा तर काहींचे सांगणे आहे की आदिशंकराचार्यांनी या स्थानाला भेट दिली होती व त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. पण आज जे मंदिर उभे आहे ते कोणी व कधी निर्माण केले याबद्दल काहीच माहिती नाही. ते काहीही असो हे मंदिर पाहताना “त्याकाळी कोणत्याही प्रवासी सोयी-सुविधा, साधने उपलब्ध नसताना अशा दुर्गम जागी प्रतिकूल वातावरणात हे मंदिर बांधलेच कसे, हाच प्रश्न उभा राहतो.

कत्युरी शैलीतील, हिरवाईच्या पार्श्वभूमीवरील हे मंदिर खूप शोभिवंत दिसते. मंदिर छोटेसेच आहे. मंदिरात पाषाण शिवलिंग असून, चांदीची उत्सवमूर्ती आहे. जवळच पार्वतीचे व अर्धनारी नटेश्वराचे मंदिर आहे. मंदिरापासून साधारण १ कि.मी. अंतरावर कालभैरवाचे मंदिर आहे. कालभैरव हा या परिसराचा क्षेत्रपाल मानला जातो व या क्षेत्राचे पावित्र्य व रक्षण करण्याची जबाबदारी कालभैरव सांभाळत असतो अशी श्रद्धा आहे. या मंदिरात एका भांड्यात खूप जुनी-नवी नाणी ठेवली आहेत. विशेष म्हणजे ही नाणी कोणीही घेत नाही उलट येणारा या नाण्यात आपली भरच घालतो.

मद्महेश्वरचे मुख्य पुजारी कर्नाटकातील लिंगायत समाजाचे आहेत. उत्तराखंडात फिरताना ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. केदारनाथचे मुख्य पुजारी आंध्र प्रदेशातील आहेत. बद्रीनाथचे पुजारी केरळचे नंबुद्री ब्राह्मण आहेत तर पाताळभुवनेश्वरचे मुख्य पुजारी काशीचे भंडारी लोक आहेत. भारताच्या निरनिराळ्या प्रांतातील लोकांना येथे पौरोहित्य करण्याचा मान त्या काळच्या सत्ताधिशांनी दिला आहे. त्या लोकांना इथे बोलावून त्यांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देऊन त्यांना वंशपरंपरेने पूजेचे हक्क दिले आहेत व आजही ही परंपरा हे लोक सांभाळत आहेत, मग कारण काहीही असेल.

येथून जवळच पांडवदरा म्हणून एक पर्वतशृंखला दाखवली जाते. पण इकडे जाणारा मार्ग अवघड आहे. त्यामुळे सहसा तिकडे कोणी जात नाही. असे सांगतात की, पांडवांनी आपल्या शेवटच्या प्रवासात आपली शस्त्रास्त्रे येथील एका गुहेत ठेवली व निशस्त्र होऊन त्यांनी आपला पुढील प्रवास सुरू केला.

हिवाळ्यात इथे फार मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होते. सर्व रस्ते, वाटा बंद होतात. त्यामुळे दिवाळीनंतर हे मंदिर बंद केले जाते व देवाची उत्सवमूर्ती उखीमठला नेली जाते तेथे देवाची पूजाअर्चा होते. साधारण मार्च-एप्रिलपासून बर्फ वितळू लागते. मे महिन्यात सर्व रस्ते मोकळे होतात व मग एका शुभ दिनी वाजत-गाजत, जयजयकार करत उत्सवमूर्तीच्या रूपात देवाचे आगमन आपल्या मूळ स्थानी म्हणजे मद्महेश्वरला होते.

देवस्थानने येथे एक धर्मशाळा बांधली आहे. तसेच स्थानिक लोकांनी २-४ दुकाने थाटली आहेत. त्यामुळे येथे राहण्याची- जेवणाची सोय होते. या सर्व परिसराचा केदारनाथ अभयारण्यात समावेश केला आहे. निरनिराळे पक्षी इथे दर्शन देतात पण मुख्य आकर्षण म्हणजे ‘मोनाल’ हा पक्षी ! अद्वितीय सौंदर्य या पक्ष्याला लाभले आहे. हा पक्षी उत्तराखंड राज्याचा राज्यपक्षी आहे. एखादे वेळेस कस्तुरीमृग सुद्धा नजरेस पडतो.

मदमहेश्वरहून हिमालयाच्या पर्वतराजीचे फार सुंदर दर्शन होते. हिमालयाच्या अफाट पर्वत रांगा काही उघड्या तर काही हिमाच्छादित. ही पर्वतशिखरे एका मधूनच एक अशी बाहेर पडलेली दिसतात. कधी एकमेकाला समांतर तर कधी निरनिराळे कोन केलेली. पर्वताचे एका पाठीमागे एक असे स्तर असे किती स्तर आहेत व त्या पलिकडे काय आहे याचा अंदाजच येत नाही. एखादवेळेस एखाद्या हिमाच्छादित पर्वत शिखरावर धुरासारखी उंच रेष दिसते. ह्याला ‘हिमज्वाला’ म्हणतात. पर्वतशिखरावरील हिमकण पर्वत शिखरावरील वेगाने चक्राकार वाहणाऱ्या वान्यामुळे आकाशात फेकले जातात. अशा कणांचा एक स्तंभच निर्माण होतो. काही वेळा हे कण मर्यादित जागेत पसरतात व आता हे रूप पिसाऱ्यासारखे होते. सकाळची किंवा संध्याकाळची सूर्यकिरणे अशा हिमज्वालावर पडतात तेव्हा तर त्याचे सौंदर्य काही वेगळेच दिसते.

मंदिरापासून साधारण २ कि.मी. अंतरावर साधारण ३००-४०० फूट चढून गेल्यावर वृद्ध मद्महेश्वराचे मंदिर आहे. मंदिर फक्त सांगण्यापुरते! खरं तर ही एक छोटीशी घुमटीच आहे. कदाचित पूर्वी मद्महेश्वरचे मंदिर या ठिकाणी असावे. नंतरच्या काळात आताच्या मंदिराची उभारणी केली असावी. इथे पोहचण्यासाठी रस्ता असा नाही. अंदाजानेच जायचे. वाटेवर सर्वत्र हिरवळ व त्यावर उमललेली चिमुकली सुंदर फुले. ही फुले पायाखाली येतील म्हणून पाऊल उचलावे असे वाटतसुद्धा नाही. पण किती फुले चुकवणार? पायाला हिरवळीचा मखमली स्पर्श जाणवत असतो.

वृद्ध मद्महेश्वराचे मुख्य आकर्षण म्हणजे इथून होणारे चौखंबा पर्वतशिखराचे व इतर पर्वतशिखरांचे तसेच विस्तृत प्रदेशाचे दर्शन. चौखंबा हे उत्तराखंड राज्यातील उंचीने पाचव्या क्रमांकाचे शिखर आहे. सदैव हिमाच्छादित अशा या पर्वतशिखराची उंची आहे ७१३८ मीटर्स (२३,५५५ फूट). या पर्वतशिखराचा माथा सपाट असून त्याची चारही टोके उंचावलेली आहेत.

वृद्ध मदमहेश्वराला पोहचल्यावर सर्वप्रथम नजर जाते ती या चौखंब्याकडे. आपल्या समोर उंच अतिभव्य पांढरीशुभ्र हिमाची भिंत उभी असल्यासारखी दिसते. ऋषीमुनींनी म्हटले आहे, ‘यद वाचा न अभ्युदितम’, खरोखरच अशा भव्यतेचे मूर्तिमंत रूप म्हणजे येथून दिसणारा चौखंबा.

जमिनीवर सर्वत्र पसरलेली हिरवाई व त्या पार्श्वभूमीवर आसमंतात पसरलेली केदारनाथ मॅसीफा, निळकंठ, त्रिशूल, कामेट इ. अनेक ज्ञात-अज्ञात हिमशिखरे. खोल दऱ्या, दऱ्यात तरळणारे धुक्याचे पट्टे, गर्द झाडी, निळ्या आकाशात विहार करणाऱ्या, पर्वतशिखरांना बिलगलेल्या मेघमाला. मधेच जंगली फुलांचा सुगंध पसरवणारी गार वाऱ्याची झुळूक. हे सर्व अनुभवताना वाटू लागते, हे वैभव परमेश्वराने माझ्यासाठीच निर्माण केले आहे. हे हिमालयाचे, निसर्गाचे रूप नसून साक्षात परमेश्वराचे रूप आहे असे वाटू लागते आणि मग योगी पुरुषांनी, ऋषीमुनींनी, महात्म्यांनी, संतांनी हिमालयाकडे का धाव घेतली या प्रश्नाचे आपोआप उत्तर मिळते ते शोधावे लागत नाही.

-प्रकाश लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..