नवीन लेखन...

जादू

आपल्या एकुलत्या एक लेकीचा पाचवा वाढदिवस त्याला अगदी जंगी साजरा करायचा होता. एका हॉल मध्ये सगळ्याचं कंत्राटच दिलं होतं. रंगीबेरंगी फुगे, कार्टूनची सजावट, एका कोपऱ्यात टॅटू काढणारा, एक जण वेगवेगळे मास्क वाटणारा वगैरे वगैरे जय्यत तयारी केली होती. हळूहळू पाहुणे येऊ लागले. भेटीगाठी-गप्पा सुरू झाल्या. थोड्यावेळाने बहुतांश निमंत्रित आले आणि त्याने तिथल्या व्यवस्थापन करणाऱ्याला कार्यक्रम सुरू करायला सांगितलं.

“ चलो बच्चे लोग तैय्यार हो जाओ ssss जादू देखने के लिये !” .
जादूगाराचा आवाज ऐकताच इकडे तिकडे फिरणारे पटापट खुर्च्यांवर जाऊन बसले. जादूच्या प्रयोगांनी त्या संध्याकाळची सुरुवात झाली. दोन तीन जादू दाखवल्यावर त्याने एक गाणं लावलं आणि सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगितलं. गाणं सुरू असेपर्यंत त्याने त्या उत्सवमूर्ती मुलीला थोडं मागच्या बाजूला नेऊन एक सोपीशी पत्त्यांची जादू शिकवली .
“ बघा इकडे बघा …आता आपल्याला बर्थडे गर्ल एक मस्त जादू दाखवणार .. बजाओ ताली ! “

असं म्हणत त्याच्या मदतीने त्या गोड निरागस लहानगीने हातातला पत्ता गायब करून दाखवला. सगळे टाळ्या वाजवायला लागले इतक्यात पुढे बसलेल्या एका मोठ्या मुलाने पुढे जाऊन तिने हातामागे हळूच लपवलेला पत्ता काढला आणि जोरजोरात हसत सगळ्यांना दाखवला. इतर मुलं सुद्धा हसायला लागली.
झालं .. तिने लगेच भोकाडच पसरलं. साहजिकच होतं म्हणा. आपण जादू दाखवल्याचा आनंद काही क्षण सुद्धा तिला घेता आला नाही . उलट सगळ्यांसामोर हसं झालं. बाकी काही नसलं तरीही अपमान, इज्जत का फालूदा वगैरे गोष्टी या वयाच्या लहान मुलांना बरोबर अवगत झालेल्या असतात. सगळी यंत्रणा त्या रागावरचं औषध शोधण्यात गुंतली. वेगवेगळ्या प्रकराने समजावलं तरीही उपयोग झाला नाही. आपल्या मुलीचा असा हिरमोड झालेला पाहून बाबाला खूप वाईट वाटलं . त्याने सुद्धा विनवण्या केल्या … पण सगळं व्यर्थ.
शेवटी तो जादूगार आला . कसबसं तिला आणि तिच्या आईला घेऊन बाजूच्या खोलीत गेला. कोणाला उघडकीस आणता येणार नाहीत अशा दोन छान जादू शिकवल्या आणि सगळे बाहेर आले.

“ अब देखिये.. एकदम बढीया जादू !!” ..
आणि मग आईच्या मदतीने तिने दोन्ही जादू व्यवस्थित दाखवल्या. सगळ्यांनी उभं राहून जोरदार टाळ्या वाजवल्या. त्या चिमूकलीच्या चेहऱ्यावर खुदकन हसू आलं. सगळं वातावरण पूर्ववत झालं आणि जादूगार पुढचे प्रयोग दाखवू लागला.

लेकीच्या चेहऱ्यावरचा परतलेला आनंद बघून बाबा सुद्धा हसला पण पुढच्या क्षणी एकदम त्याच्या महाविद्यालयीन दिवसात पोचला. तेव्हाचा एक प्रसंग डोळ्यासमोर दिसू लागला. त्यांच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कुठल्यातरी छोटेखानी कार्यक्रमात असंच एक जादूगार त्याचं अफलातून कौशल्य दाखवत होता आणि उपस्थितांची दाद मिळवत होता. एका जादूत तर त्याने चक्क दोन माणसांना हवेत तरंगत ठेवलं होतं . हे साहेब तेव्हा एकदम हुशार, हरहुन्नरी , वेगवेगळ्या विषयांची माहिती असणारे होते. भरीला सळसळतं तारुण्य. त्या तरंगणाऱ्या माणसांना बघून हा उठून झरझर चालत त्या व्यासपीठावर चढला आणि त्या जादूगाराच्या जवळच्या पेटीला काहीतरी करून त्याच्या हातचलाखीचं रहस्य सगळ्यांसमोर उघडं पाडलं. त्याचं हे असं वागणं काही मोजक्या लोकांना आवडलं नसलं तरी बऱ्याचश्या विद्यार्थ्यांनी जादूगाराच्या फजितीवर हसत यथेच्छ टिंगल केली. जादूगाराला खूप ओशाळल्यासारखं झालं. पण हा मात्र आपण काहीतरी मोठं केल्याच्या अविर्भावात एकदम छाती फुगवून वावरत होता. काही जण हवा भरायला होतेच.

आज आपल्या लेकीची झालेली अवस्था बघून त्याला त्या जादूगाराच्या त्यावेळच्या मनस्थितीची जाणीव झाली. चूक लक्षात आली आणि खूप अपराधी वाटू लागलं. त्याच तंद्रीत तो बराच वेळ होता. नजर समोर असली तरी तिथे काय चालू आहे याकडे त्याचं लक्षच नव्हतं. तो कशावरच प्रतिक्रिया देत नाही , हसत नाही, टाळ्या वाजवत नाही हे बघून बायकोने हळूच पाठीवर दोन-तीन वेळा थाप मारली तेव्हा तो भानावर आला.
“ अरे काss य ? लक्ष कुठे आहे तुझं ? मनू किती मस्त एंजॉय करते बघ आता !! “
“ हो हो .. जरा वेगळ्याच विचारात होतो “
तेवढ्यात जादूगार म्हणाला
“ चलो दोस्तो .. अभी मॅजिक खतम और आगे के गेम्स शूरु !! आता मी तुमची रजा घेतो! ”
असं म्हणून त्यानी सुरुवातीपासून घातलेला छोटा मुखवटा काढला आणि जाता जाता सगळ्यांना वाकून अभिवादन केलं. त्याचा चेहरा बघून हा खुर्चीवरून ताडकन उठला आणि त्याला जाऊन चक्क मिठीच मारली. हाच होता तो त्याच्या कॉलेजमध्ये आलेला जादूगार. त्याचा या योगायोगावर विश्वासच बसत नव्हता.

“ काका ओळखलंत का मला ??”
“ अहो म्हणजे काय ? मगाशी बघितल्या बघितल्या लगेच ओळखलं. तुम्ही अजूनसुद्धा कॉलेजातल्या सारखेच हँडसम दिसता बरका ? म्हणून ओळखू शकलो.”
“अहो काय काका ??”
त्याने बोलता बोलता शेजारचा माईक घेतला आणि सगळ्यांना सांगू लागला “ मंडळी … तुम्हाला काही लक्षात येत नसेल ना ? . सांगतो ss .. सगळं सांगतो ss पण त्या आधी तुम्हा सर्वांसमोर मी या जादूगार काकांची अगदी मनापासून जाहीर माफी मागतो !”.
“ अहो दादा .. हे काय करताय सगळ्यांसमोर ??” जादूगार म्हणाला
“ अहो मी अपमान सगळ्यांसमोर केला होता ना मग माफी सगळ्यांसमोर नको का मागायला ? तेच प्रायश्चित्त असेल माझं . तर मंडळी त्याचं झालं असं .. मी कॉलेजमध्ये असताना ss …. !!”
त्याने सर्वांना ती घटना संगितली. आज आपल्या मुलीवर तशीच परिस्थिती आली ते बघून त्या जुन्या घटनेसाठी आज वाटणारी खंत, योगायोगाने तेच काका आज समोर असणं असं सगळं पाहुण्यांना कथन केलं. आपलं मन मोकळं केलं आणि पुन्हा पुन्हा माफी मागितली. त्याला झालेलं दुःख आणि पश्चात्ताप त्याच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होता.

“ तेव्हा मुलांनो माझ्या चुकीवरून तुम्ही धडा घ्या आणि कधीच अशी चूक करू नका. जादूगार काका मी तुमच्याशी इतका वाईट वागूनही माझ्या मुलीशी इतके चांगले वागलात. ती रडत असताना तिला तिच्या परीने समजावून हसवलंत . खूप खूप आभार तुमचे !!”
“ दादा …. कदाचित ते घडलं म्हणूनच तिच्याशी मी असं वागू शकलो कारण मी त्यावेळेस तरणा ताठा गडी असूनही मला इतकं वाईट वाटलं होतं तर त्या बिचाऱ्या निरागस छकुलीच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना मलाच येऊ शकते. आता अजून माफी वगैरे मागून अजून लाजवू नका हो पण आता विषय निघालाय म्हणून सांगतो. तुम्ही माझ्या जादूची पोल खोल केलीत आणि आमच्या सगळ्या जादूगार ग्रुपमध्ये बातमी पसरली होती. कोणीतरी व्हीडियो काढलेला तो फिरत होता. सगळ्यांचा चेष्टेचा विषय झालो होतो मी. पण त्या सगळ्यापेक्षाही मला भीती वाटत होती ते माझं करियर संपतंय की काय याची!. पुढे दोनेक वर्ष पुरलं मला ते सगळं. त्यानंतर मात्र मी खूप मेहनत करून वेगवेगळ्या जादू शिकलो आणि मग ईश्वर कृपेने हळूहळू पुन्हा या व्यवसायात आपला जम बसवला. अहो आम्ही जादूगार आहोत हो ss .. जादू दाखवतो .. चमत्कार नाही. सगळ्यांनाच माहिती असतं की हे खोटं आहे , हातचलाखी आहे . . आम्ही तुमचं मनोरंजन करतो तुम्ही त्याचा आनंद घ्यायचा इतकंच. आणि हो तेव्हा पासून माझ्या प्रत्येक प्रयोगात मी प्रेक्षकातल्या एकाला तरी एखादी जादू शिकवतो आणि करायला लावतो. जादू शिकवण्याचे क्लासेस सुद्धा घेतो. आम्हा जादूगारांच्या चरितार्थाचं साधन आहे ही जादू !! “
आता या सगळ्याला त्याने जे पेरले तेच उगवले म्हणा , पूर्वायुष्यात तो जे वागला तीच वेळ त्याच्यावर आली असं गणित मांडा किंवा आजकालच्या मीम्सच्या भाषेत कर्मा रिटर्न्स वगैरे म्हणा पण एका छोट्याश्या गोष्टीमुळे त्या जादूगाराची गेलेली काही वर्ष आणि त्याला झालेला मनस्ताप तर परत येणार नव्हता.

या सगळ्यात बराच वेळ गेल्याचं त्या जादूगाराच्या लक्षात आलं. “ चला sss . लोक आमचं रडगाणं ऐकायला थोडीच आले आहेत. सगळे म्हणतील सेलिब्रेशन कुठे आहे ? पार्टी कुठे आहे ? हाहाहा sss . चलो बच्चे लोग …. आता आधी आपण केक कापूया ….. मग गेम्स खेळू … फिर मै जाऊंगा आपको बाय बाय करके !” त्या नंतर पुढचा वाढदिवस अगदी नेहमीसारखा दणक्यात पार पडला . केक, कल्ला , खेळ, मजामस्करी, हास्यविनोद, भेटवस्तू , जेवण सगळं यथासांग झालं पण निघता निघता प्रत्येकाच्या मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी तो जादूगार होताच. खरं तर त्या प्रसंगांशी इतरांचा काहीच संबंध नव्हता पण तरीही प्रत्येकाला आपण त्या घटनेचे साक्षीदार असल्यासारखं वाटत होतं. जादूच्या प्रयोगापेक्षा त्या जादूगाराचं बोलणं, त्या चिमूकलीशी वागणं , त्याचा स्वभाव या सगळ्यांनी उपस्थित प्रत्येकाच्या मनावर खरीखुरी जादू केली होती. कुठल्याही हातचलाखी विरहित नितळ “जादू”.

-क्षितिज दाते , ठाणे

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..